३
सर्व मानव वंशांत व वंशविशेषांत मंत्रतंत्रांचा आढळ होतो. भारतवर्ष तर मंत्रविद्येचे माहेरघरच आहे. भारतीय संस्कृतीत विस्तारलेला ‘मंत्रमहार्णव’ असीम व अथांग आहे. मानवी अनुभवाची सूक्ष्मतम रहस्यमौक्तिके न्याहाळणारे द्रष्टे या महार्णवांत सहस्रावधि वर्षे एका मागून एक डुबक्या घेत आहेत. त्या सर्वांची समन्वित साक्ष ही आहे की, ‘मंत्रशास्त्र हे अभ्युदयाचे कारक आहे, सामर्थ्याचे निष्पादक आहे, सौभाग्याचे प्रापक आहे.’ या मंत्रमहार्णवाच्या गंभीर आवाहक निनादाला भारतीय तरूणांच्या विवेचक बुद्धीचे प्रत्युत्तर गेले पाहिजे; त्यांच्या उत्तुंग लहरींच्या लीलाविलास शास्त्रीय प्रज्ञाचक्षूने न्याहाळला पाहिजे.