२
मंत्रसिद्धी हा जर प्रत्यक्ष अनुभव असेल, मांत्रिक चमत्कार जर खरोखर घडत असतील, मंत्रशक्तीने जर रोग बरे होत असतील, अभ्युदय होत असेल, अनिष्टाचा निरास होत असेल तर या अनुभवांचा, घटनांचा योग्य अन्वयार्थ लावलाच पाहिजे. जिज्ञासेने, शोधक बुद्धीने, आस्थेने या विषयाचा कसून अभ्यास झाला पाहिजे. वस्तुस्थितीचा अन्वयार्थ लावण्याची शिकस्त करणे, पराकाष्ठा करणे हे आधुनिक विज्ञानवेत्त्याचे मुख्य कर्तव्य आहे असे सुप्रसिद्ध पदार्थशास्त्रज्ञ आइनस्टाइन म्हणतो. कार्यकारण भावाच्या शृंखलेचा प्रत्येक दुवा समजावून घेणे, प्राप्त परिस्थितीची कारक तत्त्वे हुडकून काढणे हा तत्त्वसंशोधकांचा धर्मच होय. उपलब्ध असलेल्या facts चा, वस्तुभावांचा परामर्श शास्त्रज्ञ, संशोधक व विवेचक घेणार नाहीत तर दुसरे कोण घेईल? मंत्रविद्येने, मंत्रयोग शक्तीने जे जे चमत्कार होतात, जे जे अनुभव येतात त्यांच्याकडे बौद्धिक, शैक्षणिक अहंकाराने दुर्लक्ष करणे हे वैज्ञानिक, शास्त्रीय दृष्टीच्या अभावाचे द्योतक नव्हे काय?