(३)
श्री. नानासाहेब बापट यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे ‘सार’ म्हणून प्रस्तुत निबंधांत अद्वैतसिद्धान्ताची मांडणी केली आहे. दर्शन ग्रंथांशी त्यांचा परिचय असून अद्वैतसिद्धान्त हाच सर्वोकृष्ट कसा, हे त्यांनी भगवतगीतादि ग्रंथांच्या आधारवचनांनी सिद्ध केले आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचे रहस्य प्रकटविणारा हा प्रबंध ‘सारभूत’ व सार-सर्वस्व अशा तऱ्हेचा वठला आहे. आधुनिक विचारांचे प्रवाह लक्षात ठेवून व तत्त्वज्ञानाच्या प्रत्यक्ष अनुभवाची आवश्यकता ध्यानात बाळगून त्यांनी आपले विवेचन केले आहे. धर्म, तत्त्वज्ञान व वेदान्त यांचे मूलार्थ मी थोडक्यात विशद केले आहेत. या प्रबंधाचा पार्श्व किती शास्त्रशुद्ध आहे, हे वाचकांच्या सहज लक्षात यावे म्हणून हे प्रास्ताविक विवेचन केले आहे. श्री.नानासाहेब म्हणजे सद्गुरूनिष्ठेचे एक तेज:पुंज प्रतीक आहे. एकाग्र श्रद्धेने मानवी व्यक्तित्वाचा आंतर-विकास कसा पराकोटीला पोचू शकतो, हे श्री.बापट यांच्या जीवनक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हा प्रबंध विद्वताप्रचुर आहे. शिवाय गुरूकृपेच्या उष्णतेमुळे ती विद्वता वितळून सहज स्फूर्तीच्या स्वच्छ झर्यासारखी दुडदुड नाचून राहिली आहे. अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासकाला या प्रबंधाच्या वाचनाने चांगलेच मार्गदर्शन होईल. तात्त्विक दृष्टी दैनंदिन जीवनाला उजाळा देत राहिली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने आपली आंतर अवस्था व अध्यात्मिक भूमिका विचारपूर्वक व चोखंदळपणे निश्चित करावयास हवी. महाराष्ट्रीय मुमुक्षुला हा प्रबंध म्हणजे अनुभवनिष्ठ ज्ञानयोगाचा साहाय्यहस्तच होय. श्री.नानासाहेब यांच्या जीवात्म्यावर सद्गुरूकृपेच्या उदकशांतीचा संततभिषेक सुरू आहे. त्यांना दीर्घतम आयुष्य चिंतून हे चार शब्द संपवितो.
- धुं. गो. विनोद
ललित पंचमी
अश्विन शु. ५ शके १८७६
२ ऑक्टोबर १९५४
ॐ ॐ ॐ