(५)
सर ऑलिव्हर लॉज यांचे ग्रंथ वाचल्यामुळे माझे स्वत:चे लक्ष या विषयाकडे १९१७-१८ साली प्रथम वेधळे. प्रत्येक मानवाला असते त्याप्रमाणे या विषयाची जिज्ञासा मलाही पहिल्यापासून होती. आमचे घराजवळ (मु.केतकी, ता.अलिबाग, जि.कुलाबा) असे एक चमत्कृतिपूर्ण ठिकाण आहे. तेथे घडलेल्या काही गोष्टींमुळे लहानपणापासून या विषयाबद्दलची माझी जिज्ञासा तीव्रतर होत राहिली.
भारतातील बहुतेक सर्व तीर्थक्षेत्रे पाहून झाल्यावर पंडित मदनमोहन मालवीय यांच्या कृपेने गूढ विद्यांची गंगोत्री जे तिबेट तेथे जाण्याचा योग आला. तिबेटातील अनेक मठ व गुहा पाहण्याचा हा योग विशेष उपकारक ठरला. तेथे व हिमालयातील अनेक ठिकाणी काही सिद्ध पुरुष व सिद्धीशास्त्रातील रहस्ये यांची ओळख झाली.
या विषयावर संस्कृतमध्ये अनेक ग्रंथ व हस्तलिखिते आहेत. तंजावर व दरभंगा येथील ग्रंथालयात काही बहुमूल्य हस्तलिखिते मला उपलब्ध झाली. त्यातील काही ताडपत्रावर लिहिलेली होती. त्यामुळे अर्थ-संदर्भ लागण्यास फार कठीण गेले. प्रसिद्ध मीमांसक यमुनाचार्य यांच्या ‘सिद्धीत्रय` या ग्रंथात बुद्धिप्रामाण्याच्या भूमिकेवरून अतींद्रिय विज्ञानाबद्दल सोपपत्तिक व सशास्त्र चर्चा केली आहे; तीही माझ्या अवलोकनात आली.
गेली चार वर्षे भूगोलावरील बहुतेक राष्ट्रांत माझा प्रवास झाला. इजिप्तमधील पिरॅमिडच्या अवतीभोवती राहणारे फकीर भेटले. दक्षिण फ्रान्समधील सेंट बर्नाटेड या पाश्चात्य महानुभाविक स्त्रीने जगद्विख्यात केलेल्या ‘लूर्डज’ (Lourdes) येथेही मुद्दाम गेलो; तेथेही अनेक चमत्कार दृष्टोत्पत्तीस आले. स्वीडन व नॉर्वेमधील अशीच काही अद्भूत स्थळे पाहिली. रशियाच्या वायव्य सरहद्दीवरील व प्रत्यक्ष उत्तर धु्वाजवळील प्रदेशात संचार केला, तेथे ‘लॅप लँडर्स’ या आदिवासींच्या जातीतील वीसपंचवीस व्यक्ती भेटल्या. त्यांना सिद्धीशास्त्रांतील पुष्कळ माहिती होती. पण, त्यांची भाषा मला समजत नसे. दुभाषाच्या सहाय्याने जेवढे समजले तेवढ्याचा संग्रह केला.
जपान, फिलीपीना, कंबोडिया, त्याचप्रमाणे सयाम, चीनची न्यू टेरीटरी इत्यादी भाग हाँगकाँग ब्रह्मदेश वगैरे अतिपूर्वेकडील व आग्नेय आशियातील सर्व प्रदेशात संचार केला. तेथे प्रत्येक ठिकाणी बुद्धपूर्व व बुद्धोत्तर संस्कृतीत परिणत झालेल्या अतींद्रिय अनुभव शास्त्राच्या प्रक्रिया आज देखील उपलब्ध आहेत.
रंगून येथे ध्यानधारणा करून अतींद्रिय शक्ती जागृत व वर्धमान करण्यासाठी तेथील आजचे महामंत्री ‘थाकिन नू’ यांनी एक प्रयोगशाळा स्थापिली आहे; तीही त्यांनी मला दाखविली.