(४)
अमेरिकेतल्या विश्वविद्यालयीन प्रयोगशाळांमध्ये अद्ययावत् विज्ञान शास्त्राच्या न्याय निष्ठुर पद्धतींचा अवलंब करून अतींद्रिय ज्ञानाची प्रायोगिक मीमांसा सुरू असल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले.
अमेरिकेत नॉर्थ करोलायना या प्रांतांमध्ये असलेल्या ‘ड्यूक युनिव्हर्सिटी’मध्ये डॉ. र्हाईन या प्रसिद्ध संशोधकाने गेली २५ वर्षे अत्यंत एकाग्रतेने अतींद्रिय ज्ञानाबद्दल सहस्रावधी प्रयोग केले. त्यांच्या पत्नी मिसेस र्हाईन, डॉ.प्रॅट व डॉ.ओलिस ही मंडळी डॉ. र्हाईन यांना उत्कृष्ट सहकार्य देत आहे. डॉ. र्हाईन यांच्या प्रयोग शाळेत चाललेले मूलगामी संशोधन मी स्वत: पाहिलेले असून त्यांच्या संस्थेशी माझे वैचारिक सहकार्य व पत्रव्यवहार या क्षणापर्यंत अखंड चालू आहे.
अमेरिकेतील मेन (Maine) या संस्थानात ग्लेनकोव्ह येथे (रॉकलंड नजीक) ‘राऊंड टेबल फौंडेशन’ या नावाची एक अतींद्रिय संशोधनाची भव्य संस्था आहे. डॉ. पुहारीच हे युगोस्लाव्ह शास्त्रज्ञ संस्थेचे डायरेक्टर आहेत. या संस्थेने मला ६ महिने रिसर्च कन्सलंट (Research Consultant) म्हणून नेमले होते.
तिबेटातील व हिमालयातील काही ठिकाणी सुरू असलेल्या तंत्र पद्धती व मंत्र पद्धती विचारात घेऊन मी या संस्थेच्या प्रयोग शाळेमध्ये सहा महिन्यात अनेक प्रयोग केले.
डॉ.पुहारीच यांचेबरोबर ‘हॅलीकॉप्टर’चे संशोधन आर्थर यंग, हेन्री जेक्सन, कार्ल बेटज हे कार्य करीत होते. डॉ. मेरियन, एलिनॉर बाँड या व्यक्तींचे ठिकाणी काही अतींद्रिय शक्ती प्रगल्भ अवस्थेत प्रकट असलेल्या या संस्थेत मी पाहिल्या. या सिद्धी त्यांनी स्वत: अनेक प्रयोग करून मिळविल्या आहेत. एलिनॉर बाँड यांचे डोळे पूर्णपणे बांधले असतानाही कोणत्याही नकाशावरील स्थळांची नावे त्या वाचू शकतात. डॉ. मेरियन नुसत्या हस्ताक्षराच्या स्पर्शाने ते हस्ताक्षर असलेल्या व्यक्तीच्या जीवनातील काही घटना अचूकपणे सांगू शकतात.
डॉ.रसेल व त्यांच्या पत्नी लाओ हे दांपत्य अशाच प्रकारचे प्रयोग करीत आहेत. त्यांच्या स्वत:चाच एक फाऊंडेशन आहे. ते शिल्पकार व महान शास्त्रज्ञ आहेत.
न्यूयॉर्कपासून ४० मैलांवर स्प्रिंग व्हॅलीमध्ये डॉ.फायफर नावाचे एक जर्मन शास्त्रज्ञ मनाच्या शक्तीबद्दल अनेक अयशस्वी प्रयोग करून राहिले आहेत. ते मुख्यत: रसायन शास्त्रज्ञ आहेत.
आयलीन गॅरेट या विदुषीने परलोक विद्येविषयक अनेक प्रयोग केले असून या विषयांत तिचा फार मोठा अधिकार आहे. इ.स.१९५३ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी अतिमानसशास्त्रज्ञांची एक भव्य जागतिक परिषद भरविली होती. या ग्लेनकोव्ह येथील राऊंड टेबल फौंडेशनमध्ये अनेक वेळा जात येत असतात. या न्यूयॉर्कमध्ये राहतात. यांचे घरीच माझी डॉ.पुहरीच यांच्याशी प्रथम ओळख झाली.
आल्बर्ट आइन स्टाईन व डॉ.मिलिकन हे दोघे आजच्या युगातले अग्रगण्य गणितज्ञ व पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञ, अतींद्रिय ज्ञानाच्या शक्यतेबद्दल व प्रायोगिक उपक्रमांच्या आवश्यकतेबद्दल मोठ्या तळमळीने व आस्थेने माझेपाशी बोलले व स्वतंत्र भारतात व शास्त्राची अभूतपूर्व प्रगति झाली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आलडस् हक्स्ले व जोराल्ड हर्ड हेही अतींद्रिय ज्ञानाचे प्रयोग स्वत: करीत असल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले.
वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, कोलंबिया व क्रॅलिफोर्निया येथील विश्वविद्यालयात व टोकियो येथील चार विश्वविद्यालयांमध्येही या शास्त्रातील अनेक प्रयोग मोठ्या दक्षतेने केले जात आहेत.
अमेरिकेतील प्रयोग शास्त्रज्ञांनी या विषयात उच्चांक गाठला आहे.
त्यांची वैज्ञानिक पद्धती, नवनवीन उपकरणे व भारतात असलेली या विषयावरील आगाध विचारसामुग्री, ग्रंथ संपत्ती व प्रत्यक्ष अनुभव घेणारे सहस्रावधी साधक या दोहोंचा संगम झाला तर अनेक अतींद्रिय शक्ती व सिद्धी मानवमात्रांस उपलब्ध होतील.