(३)
‘ब्रह्म-योग-विद्या’ हे या पुस्तकाचे नाव देखील अनेक विकल्प उत्पन्न करणारे आहे. सामान्यत: ब्रह्मविद्या व योगविद्या या दोन स्वतंत्र विद्या आहेत. ब्रह्मविद्या म्हणजे वेदामध्ये व उपनिषदामध्ये वर्णिलेल्या ब्रह्म-तत्त्वाचा अनुभव करून देणारे शास्त्र अर्थात वेदांत. योग विद्या म्हणजे प्रामुख्याने पातंजल योगावर आधारलेले आत्मविकासाचे अनेक प्रकार. प्रत्येक ब्रह्मविद योगमार्गी असेल असे नाही; व प्रत्येक योगमार्गी ब्रह्मविद् होईल असेही नाही.
‘ब्रह्म-योग-विद्या’ या शीर्षकाचा अर्थ आपणास असा लावावा लागेल - ब्रह्मतत्त्वापर्यंत नेणारी योग-विद्या; ज्या योगाभ्यासाने मनुष्य अनेक साधनांचा व सिद्धीचा आश्रय घेऊन शेवटी ब्रह्मतत्त्वात विलीन होतो ती योगविद्या म्हणजे ब्रह्म-योग-विद्या.
ग्रंथाचे नाव सदोष आहे असे नव्हे, पण काहीसे गूढ व अपेक्षाभंजक आहे. प्रस्तुत ग्रंथांतील चर्चा थिऑसफीमधील योगविद्येच्या चर्चेवर आधारलेली आहे. थिऑसफी या शब्दाचे भाषांतर पुष्कळ वेळा ब्रह्मविद्या असे करण्यात येते. Theo म्हणजे देव किंवा ब्रह्म; व Sophy म्हणजे विद्या. Theosophy म्हणजे ब्रह्म-विद्या म्हणजे उपनिषदातील किंवा श्रीशंकराचार्य प्रणीत वेदांत किंवा ब्रह्म-विद्या नव्हे.
थिऑसफी ही जगातील अनेक धर्मांच्या मूल तत्त्वांचे संकलन आहे. त्यामध्ये केवळ भारतीय ब्रह्मविद्या किंवा वेदांत एवढाच विषय नसून दुसर्या अनेक विचार प्रवाहांचा त्यामध्ये अंतर्भाव होतो.
मॅडम ब्लॅव्हॅटस्की, ए.पी. सिन्नेट, कर्नल ऑलकॉट, लेड बीटर, अनी बेझंट, डब्ल्यू. क्यू. जज्ज इत्यादी प्रतिभावान व प्रभावी व्यक्तीनी या धर्ममतांच्या संकलनाला तेजस्वी स्वरूप दिले आहे.
आधुनिक विज्ञान दृष्टीने अतींद्रिय, ज्ञानाचे विश्लेषण, वर्गीकरण व विवेचन करण्याचा थिऑसफीने उपक्रम केला. पण गेल्या २५ वर्षांमध्ये आधुनिक विज्ञान पद्धतीत महत्त्वपूर्ण क्रांति व प्रगति झाली आहे आणि थिऑसफी त्या दृष्टीने गेल्या २५ वर्षांत अस्तमान होत आहे असे वाटते.
-धुं.गो.विनोद