(२)
मॅडम ब्लॅव्हॅटस्कीने इ.स.१८८८ साली आपला ‘The Secret Doctrine’ हा महान ग्रंथ प्रसिद्ध केला; तेव्हापासून भारतीय ब्रह्मविद्येकडे पाश्चात्य जगातील पंडितांचे व सामान्य जनतेचेही लक्ष वेधले. ही रशियन विदुषी थिऑसफी या संस्थेची प्रस्थापिका.
ऍनी बेझंट या महनीय व्यक्तीने ‘The Secret Doctrine’ हा ग्रंथ वाचून थिऑसफी आत्मसात केली व थिऑसफी बरोबरच भारतवर्ष, भारतीय संस्कृती, भारतीय अध्यात्म आणि भारतीय राजकारण या चतु:सूत्रीशी ती पूर्णत: तादात्म्य पावली.
विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकात भारतीय ब्रह्मविद्येला व योग विद्येला भारतात व भारताबाहेर लक्षावधी अभ्यासक लाभले. योग विद्येविषयी व अतींद्रिय ज्ञानाबद्दल पाश्चात्य विचारवंतांमध्ये प्रखर जागृति व जिज्ञासा उत्पन्न झाली.
लंडन येथील ‘सायकिकल रिसर्च सोसायटी’ या संस्थेने अनेक अतींद्रिय व अलौकिक अनुभवांचे पृथक्करण व परीक्षण सुरू केले.
तर ऑलिव्हर लॉज यांच्यासारख्या जगद्विख्यात पदार्थविज्ञान शास्त्रज्ञाने या विषयात लक्ष घातल्यापासून तर या संशोधनाला विलक्षण प्रतिष्ठा प्राप्त झाली.