-११-
श्री ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाने, नित्यपाठाने, जीवनातले उदात्त अर्थ उमगू लागतात. त्या परम अर्थांबद्दल जिव्हाळा वाटू लागतो.
महाराष्ट्रीय जनतेला या उदात्त अर्थांची ओढणी अधिकाधिक लागावी, श्री ज्ञानेश्वरीचे नित्यपाठ अधिकाधिक सुरु व्हावेत या हेतूने पं. महादेवशास्त्री जोशी यांनी हा ग्रंथ प्रसिद्धिला आहे. ते स्वत: श्रीज्ञानेश्वरीचे निष्ठावान् अभ्यासक व डोळस उपासक आहेत. त्यांनी लहानमोठी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांची भाषापद्धती ललितगंभीर व सहजसालंकृत आहे. विद्याव्यासंगाची व अंतर्मुख जीवनाची त्यांना स्वाभाविक आवड आहे.
या ‘प्रवेशिकेत’ त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये विवेचिलेल्या अधिकरणांची, विषयांची निवड व गुंफण मोठ्या मार्मिकतेने व चोखंदळ बुद्धीने केली आहे. अभ्यासकांच्या अधिकारभेदाप्रमाणे त्यांना ही प्रवेशिका उपयुक्त व प्रकाशक वाटेल. अनेकविध विवरणातून सुसंगत वठणारे असेच विषय खुडणे हे अभिजात मालाकाराचे कौशल्य या गुंफणीत ठळकपणे प्रत्ययास येते.
विषयांची सजावट करताना त्यांनी विविध वाचकांच्या गरजा व अडचणी पूर्णपणे लक्षात घेतलेल्या दिसतात.
एकंदर ग्रंथाच्या विवेचनाची समग्रता-स्वयंपूर्णता अविछिन्न ठेवून शिवाय प्रत्येक अधिकृत विषय स्वतंत्र व स्वयंपूर्ण राखण्यात लेखकाची विशेष कलादृष्टी दिसून येते.
सानथोर वाचकांना या ग्रंथाच्या अवलोकनाने उद्बोध व आनंद लाधेल.
महाराष्ट्रीय जनतेत ज्ञानेश्वरीचा नित्यपाठ प्रसृत व्हावा, महाराष्ट्राचे जीवन ‘ज्ञान’निष्ठ व्हावे - हे उद्दिष्ट ठेवून त्यांनी श्री ज्ञानेश्वरीच्या अंतरंगाचा हा आकर्षक व प्रबोधक परिचय करून दिला आहे. श्रीज्ञानेश्वरीच्या नित्यपाठकांची संख्या वृद्धिंगत होण्यातच पं.जोशी यांचे खरे श्रमसाफल्य आहे.
या त्यांच्या पवित्र आंतर वृत्तीचे व प्रसन्न वाङ्मय-कृतीचे सादर आतिथ्य करून त्याचप्रमाणे या एकंदर उपक्रमाचे प्रोत्साहक माझे ‘ज्ञान’प्रेमी स्नेही, मद्रासचे श्री.बाबूराव फडके व पुण्याचे श्री.ना.ग.रानडे, यांचे सप्रेम अभिनंदन करून, ही प्रस्तावना संपवितो.
-धुं. गो. विनोद
कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १८६९,
ता. - १०-१२-१९४७
८६४, सदाशिव पेठ, पुणे २.
ॐ ॐ ॐ