-१०-
भोगप्रवण, इंद्रियनिष्ठ, बहिर्मुख जगण्याला जो जीव उबगला असेल, विटला असेल; परम, अंतिम ‘अर्थाच्या’ ध्रुव तार्यांची लुकलुक ज्या जीवाच्या चित्तचक्षूला खुणावू लागली असेल; उच्चोत्तुंग केदार शैलाकडे, मानवी जीवनातल्या शिव’ सर्वस्वाकडे, ‘ज्ञान’ स्पर्शाने लाधणार्या अमृतानुभवाकडे जाणारी व नेणारी पाऊलवाट ज्या जीवाला सामोरली असेल; त्याच्यासाठी केवळ त्या भाग्यवानासाठी, या आत्मविद्येचा अवतार व आविष्कार आहे.
दूर, सुंदर, झंकारलेल्या, निनादलेल्या, स्वरबीजांचे तरलते तरंग ऐकून सभोवतालच्या निकटवर्ती जगाचा एखाद्या जीवास अचानक वीट यावा, त्याच त्या स्वैर व संदिग्ध उग्दीथाकडे त्या एकाकी जीवाने आपले पाख पालवीत राहावे, तदितरत्र विस्तारलेल्या विश्वसर्वस्वाचा त्याला पुरेपूर विसर पडावा, अशी काहीशी ‘अवस्था’ आत्मविद्येच्या या नागिणीचा बुद्धिदेहाला अमृतडंख झाल्यावर एखाद्या एकाग्रलेल्या महाभाग साधकाला अनुभवण्यास मिळते.
स्वार्थोन्मुख सुखासक्तांच्या सायंकाळच्या करमणुकीसाठी, वैभवांध विलासभक्तांच्या विनोदनासाठी, अहंकारजड अल्पज्ञांच्या काव्यशास्त्रचर्चेसाठी, श्री ज्ञानेश्वरी खचित अवतरलेली नाही.
आत्मविद्या, गुरुमार्ग, मंत्रसाधना, श्री ज्ञानेश्वरीचा अनुभवाभ्यास, ही महान मूल्ये आहेत, हे गहनगंभीर अर्थ आहेत.
परम कोटीची एकाग्रता, सर्वस्वनिवेदनाची तयारी असल्याशिवाय त्या गहनगंभीर अर्थांची, महान मूल्यांची फलसिद्धी कशी शक्य असेल?