-८-
श्री गुरुदेवांना कर्तव्यबुद्धी व कर्तव्यक्षेत्र नसते. स्वभावसहज आचार हाच त्यांचा परमोच्च नीतिधर्म.
बाह्य जगातल्या अनेक उत्तेजक प्रसंगांमुळे ज्या प्रेरणा मिळतील त्यांना प्रत्युत्तर म्हणून श्री गुरुदेवांचे, श्री अवधूतांचे व जीवन्मुक्त लोकसेवकांचे आचार घटत असतात.
पूर्वकर्मार्जित अहंकेंद्राचा, जीवात्मभावाचा काही अवधूतांचे ठिकाणी पूर्णत: अभाव असतो.
भारतीय तत्त्वदर्शनातील अवतार कल्पना व अवतारप्रक्रिया यांना मूलभूत असणारा सिद्धांत हा आहे - कर्मजनित अहंकेंद्राशिवाय जगद्व्यापार व जगदुद्धार या प्राकृतिक ध्येयासाठी शुद्ध चैतन्य मानवी जीवनाचे आकारात अवतरून कार्यक्षम होऊ शकते. कर्मबंधाच्या पार्श्वभूमीशिवाय शुद्ध चैतन्याचा प्रकृतिपटावरील आविष्कार म्हणजे अवतार. काही महानुभावांचे ठिकाणी, कर्मबंधाने देहप्राप्ती झाल्यानंतरही शुद्ध चैतन्याची पूर्णानुभूति झाल्यावर अवतारक्रिया सिद्ध होऊ शकते.
श्रीराम-कृष्णादि अवताराचे लौकिक कार्य व सिद्ध सद्गुरुंचे लौकिक व्यवहार तत्त्वत: एकाच आंतर रचनेचे असतात.
काही श्री सद्गुरुंच्या जीवनाला पूर्वकर्माचा पार्श्व नसतो. काहींच्या जीवनाला तो असला तरी पूर्णत: अस्तमित झालेला असतो. हे सत्य, हा सिद्धांत काहीसा वैचित्र्यपूर्ण वाटला तरी अवतारप्रधान आर्यसंस्कृतीत वाढलेल्या व्यक्तीला त्याचे ग्रहण होणे फारसे कठीण नाही.
श्री गुरुंना ‘देव’ ही संज्ञा कर्मबंधाचे अतीतत्व दर्शविण्यासाठीच लावली जाते. देवाने माणसाचा ‘अवतार’ घेणे व माणसाने देवामध्ये स्वत:चा ‘उर्ध्वतार’ करणे या दोन्हीही प्रक्रिया स्वभावत: व फलत: एकच आहेत.
सिद्ध चैतन्याला कर्तव्यप्रधान नीतिमत्तेची बंधने नसतात; केवळ बहि:प्रेरणांनी त्याच्या आचरणाचा आविष्कार सिद्ध होत असतो.
श्री गुरुदेवांना कर्मजन्य अहंकेंद्र जन्मत:च नसते किंवा असले तरी लुप्त झालेले असते; त्यामुळे त्याचे आचरणात पुष्कळ वेळा लौकिक एकसूत्रतेचा अभाव आढळतो. त्यांचे हेतू व कृति, विचार व आचार यामध्ये लौकिक विसंगति भासू शकते.
निरहंकृत जीवनाचे नीतिशास्त्र सर्वसामान्य, लौकिक व वासनाप्रधान नैतिक ध्येयांचे कक्षेबाहेरचे असते.
सिद्ध सद्गुरुंचे आचार व बद्ध साधकांचे आचार यांचे बाह्य स्वरुप सारखेच असते. भेद असतो तो त्या आचारांच्या कारक तत्त्वांत, मूल हेतूत व अंत:करणाच्या पार्श्वस्पंदांत.
बहिर्मुख दृष्टीला, लौकिक दृष्टीच्या मीमांसकाला अहंकाराने अंध झालेल्या उन्मत्त शिष्यसाधकाला सिद्ध सद्गुरुंचे अलौकिक हेतू, आंतरस्पंद कसे ओळखणार?
लोकोत्तर चेतोव्यवहार, अलौकिक पुरुषांचे मनोव्यापार सिद्ध सद्गुरुंचे संकेत कोण ओळखू शकेल? - असा मार्मिक प्रश्न भवभूतीने उपस्थित करून त्याचे नकारार्थी उत्तर स्वत:च सूचित केले नाही काय?
गुरु-शिष्यसंबंधांत, श्री गुरुदेवांच्या आचरणातील कारक तत्त्वे नजरेआड झाल्यामुळे, प्रामाणिक पण अल्पज्ञ शिष्यसाधकापुढे महान पेचप्रसंग उपस्थित होतात. श्री गुरुदेवांच्या आचरणाचा अन्वयार्थ पुष्कळ वेळा लागत नाही. त्यांचे अभिप्राय व हेतू सुस्पष्ट होत नाहीत व त्यामुळे आदरवृत्तीत एकेक मात्रा कमी होऊ लागते. अहंकारजड साधकाला वाटते की, “मला दिसत नसलेली, कळत नसलेली गोष्ट असणे शक्यच नाही. मला ज्या गोष्टींचे विलोभन आहे, आकर्षण आहे त्या गोष्टींचे विलोभन व आकर्षण श्री गुरुदेवांनाही असलेच पाहिजे. माझी वैगुण्ये, माझे दोष, माझे प्रमाद, माझे ठिकाणी आहेत त्याअर्थी श्रीगुरुदेवांचे ठिकाणीही ते असलेच पाहिजेत.” असल्या रोचक व वंचक अनुमानांची प्रमाणे म्हणून तो शिष्य स्वत:च्या व श्री गुरुदेवांच्या आचरणातही केवळ बाह्य अंगे तुलनेसाठी विचारात घेतो.
“मी इंद्रियतृप्ती साधीत आहे - श्री गुरुदेवही इंद्रियनिष्ठ जीवन जगताना दिसतातच, मग मी बद्ध का व ते मुक्त कसे?”, ही त्याची समस्या!
श्री गुरुदेवांचे हेतू, कारक तत्त्वे निराळी असतात, त्यांचे आचरण अहंकेंद्राने निर्णीत होत नाही - बाह्य उत्तेजके (Stimuli) त्यांच्या इंद्रियग्रामाला कार्यप्रवृत्त करीत असतात. विशुद्ध चैतन्याच्या प्रकाशाने उद्दीप्त झालेला त्यांचा देह, बाह्य प्रकृतीच्या उत्क्रांतीला पोषक अशा केवळ प्रतिक्रिया देत असतो. या प्रतिक्रियांत अहंकार, बुद्धी, मन व चित्त हा अंत:करणात्मक कर्माशय जागृत नसतो व म्हणून बाह्यत: तेच व तसेच दिसणारे आचार, स्वभावात अगदी वेगळे म्हणजे अनासक्त व निष्काम असतात. या वस्तुस्थितीचे प्रमाण म्हणून एक ठळक लक्षण सांगता येईल.
श्री गुरुदेवांच्या सर्व वासना, मंद, अ-तीव्र असतात. त्यांच्या वासनांना ‘आग्रह’ नसतो. सफल झाल्या किंवा निष्फल झाल्या तरी त्यांना हर्ष-विषाद बाधत नाहीत. स्थितप्रज्ञांच्या प्रज्ञेचे, बुद्धीचे लक्षण भगवान व्यासांनी ‘अनाग्रह’ असे दिले आहे. सिद्ध सद्गुरुंना वासनाच नसते असे नव्हे. वासनेचा ‘अभाव’ ही मुक्ती नव्हे - वासनेतले बंधक बीज दग्ध होणे ही मुक्ती होय. त्यांना काही वासना असतात, पण त्या स्वेच्छा प्रारब्धातल्या नसतात - प्राकृतिक, समष्टिक उत्क्रांतीच्या उत्तेजकांनी निर्माण केलेल्या असतात.
श्री गुरुदेव वासनाहीन नसतात व त्यामुळे शिष्याची सहज दिशाभूल होते. त्यांच्या वासना तीव्र असतात, निष्केंद्र असतात, पण त्या ‘असतात’ व म्हणून शिष्याला स्वत:चा आचार व श्री गुरुदेवांचा आचार यातला भेद प्रतीत होत नाही. हा भेद प्रतीत होण्यास खरी अडचण बौध्दिक अधिकाराचा अभाव ही नव्हे. अहंकाराचा अतिरेक हीच खरी अडचण श्री गुरुदेवांच्या स्वस्वरूपाचे आकलन होण्याचे आड येत असते.
काही वासना अ-तीव्र, मंद, रुपात तरी का असाव्या याचे कारण कुशाग्र व अनुभवनिष्ठ बुद्धीला सहज ओळखता येईल. सर्व वासनांचे निर्मूलन करावयाचे झाल्यास ती एक स्वतंत्र वासना होईल व ती तीव्रतम झाली तरच सर्व ‘इतर’ वासनांचे निर्मूलन होऊ शकेल. एकही वासना तीव्रतम झाली की त्यात ‘बंधन’ आलेच. म्हणून स्वभावत: सिद्ध असलेल्या काही वासना असू देणे हाच खरा ‘वासनाजय’ होय, हा सिद्धांत अनुभवोन्मुख व साधनाव्यग्र शिष्याला आत्मसात होईल. अंतर्मुख दृष्टीने स्वत:च्या अनुभवाचे निरीक्षण करण्याची थोडी सवय असली तर श्री गुरुमार्गातले सिद्धांत स्वयंस्पष्टतेने तळपू लागतात.
श्री गुरुंच्या ठायी असलेल्या एखाद्या ठळक गुणोत्कर्षापुढे अहंकाराला नमविणे खरोखर कितीतरी सोपे कार्य आहे. त्यांच्या ठिकाणचे विश्वप्रेम, त्यांच्या बुद्धिमत्तेचे सर्वंकषत्व, त्यांच्या स्वत:च्या साधनेतील प्रखरता, त्यांची सेवावृत्ती - त्यांचे व्यक्तिमत्त्वाचा असला कोणताही एक प्रकाशमय पैलू निवडून, त्यांचे चरणी एकदाच आपल्या अहंकाराचा पूर्णपणे होम करावा.
स्वत:चे ठिकाणी असलेल्या त्या गुणांपेक्षा श्रेष्ठतर कोटीचा गुण श्रीगुरुंचे ठायी असला की पुरे आहे. व्यास-वाल्मीकींनाही लाजवितील असे प्रतिभासंपन्न सद्गुरु आढळेपर्यंत स्वस्थ बसणार्या महाभागाला अध्यात्माची खरी आच लागलेली नसते - ती लागल्यावर सद्गुरु शेजारच्या घरात असल्याचे आढळते व तेथे नसले तरी साता समुद्रापलीकडून येऊन त्याचे पुढे ते उभे राहतात.
“मी सद्गुरूंचा आहे एवढेच मला समजते - श्रीगुरु माझे पूर्णत: असणे शक्यच नाही - न मामकीनस्त्वम्” - (श्रीशंकराचार्य)
लहान वर्तुळ मोठ्या वर्तुळात बसू शकेल. मोठे वर्तुळ लहान वर्तुळात कसे सामावेल? सिंधूत बिंदू असेल - बिंदूत सिंधु कसा स्थिरावेल? अशी भावना शिष्याचे ठिकाणी पूर्णपणे बिंबली पाहिजे.
गुरुभाव अहंकाराचे निर्मूलन करण्यासाठी आहे व दुसर्या कोणत्याही उपायाने अहंकार नाहीसा होत नाही. गुरुतत्त्वाला क्षुद्रत्व देऊन स्वत:च्या अहंकाराची सूज वाढवीत राहणार्या शिष्याला आंतर शांति कशी लाभणार?
अहंकार कुठल्याही एका बिंदूवर नमला तरी त्याची नांगी मोडते, बीज दग्ध होते.
“माझ्या साधना-सामर्थ्याचे बळावर, माझ्या निर्दोष उपासनेतील स्वयंसिद्ध शक्तीनेच मी आत्मशांति, मोक्ष, ईशकृपा मिळवू शकेन - या पद्धतीत मला गुरुभाव सहज डावलता येईल व स्वत:ला नमविण्याचे महान अरिष्ट मी टाळू शकेन.” - हा दुर्दम्य अहंकाराचा अत्यंत हिडीस असा अवतार साधकावस्थेत शिष्याची गाठ घेण्यास व त्याच्या अध्यात्माला मूठमाती देण्यास सदैव खडा असतो.
बिचारा शिष्य! वाट चुकलेले व वारा प्यायलेले पाडस!
त्याच्या कोट्यवधी नमस्कारांनी श्री सद्गुरुंचे गुरुपद उंचावले जात नाही व त्याने एकदाही नमन न केले तर ते गिरकी खाऊन खाली पडत नाही!
त्याच्या स्वत:च्या विकासक्रमात अगदी अटळ, अपरिहार्य असलेल्या अहंकारजयासाठी त्याने ‘गुरुभाव’ उभारावयाचा आहे.
जी साधना, जी उपासना अहंकाराला पुष्टवीत राहिली, तिने दूध पाजून कालसर्प पोसला. तो कालसर्प, त्या साधनेचे, उपासनेचे प्रेत पाडल्याविना राहणार नाही हे नि:संशय.
अहंकाराला ईश्वरापुढे वाकविणे अगदी सोपे आहे. त्याला मानवी सद्गुरुपुढे नमविणे यातच त्याचे खरे निर्मूलन असते.
श्री गुरुमार्गातला हा सिध्दांत साधकावस्थेत सहसा पटत नाही. सिध्द अवस्थेत मात्र त्या सत्याचा स्थिर प्रत्यय अखंडतेने जागृत असतो. ईश्वरापेक्षा सद्गुरुचे साहाय्य याच अर्थाने अधिक मोलाचे होय.
अहंकाराचा अस्त करण्यास सद्गुरुवाचून साधन नाही.पण हे सत्य आकळण्यासच अहंकाराचा पहिला विरोध असतो व ‘श्रीगुरुमार्गा’चा अवलंब अहंकारामुळे केलाच जात नाही! अनेक प्रकारच्या उत्तेजक व तेजोभंजक अवस्था साधकाला, शिष्याला स्वत:च्या विकासक्रमात आवश्यक असतात व या विविध अवस्थेतून शिष्याचे संरक्षण व संवर्धन साधण्यासाठी गुरुत्वाचा उभारा होतो.
श्री गुरुतत्त्वाला - निरवस्था, सिद्ध चैतन्याला - शिष्याची जरुरी नसते. नाथप्रणीत गुरुमार्गात शिष्याला गुरु असतो, पण गुरुला शिष्य नसतो. म्हणजे शिष्य, वेगळा - स्वेतर - नसतो, शिष्याचा पूर्णत: अंतर्भाव श्री गुरुंत सिद्धच असतो.
शिष्याला स्वत:चा समावेश श्री गुरुंमध्ये करून घ्यावयाचा असतो. त्याचा अहंकार या समीकरणाचे आड येत असतो. श्री गुरुमाऊली शिष्याला साहाय्य देते, ते सहजस्वभावाने देत असते - विकाराने, अहंगुरुभावनेने देत नसते.
जीवचैतन्याची निर्विषय अवस्था म्हणजे ज्ञानवतेची, आत्मरुप ज्ञानशक्तीची, नि:संबंध सहजस्थिती. हीच ‘मुक्ता’ अवस्था; हाच ‘निवृत्ती’ धर्म; हेच ‘ज्ञान’ कैवल्य. विषयांचा, प्रमेयांचा संबंध सुटला तरी स्वरूपसहज ‘ज्ञान’ स्वयंसिद्ध, स्वयंप्रकाशित राहू शकते. यालाच निवृत्तीचे म्हणजे वृत्तिविहीन असे - ज्ञानबिंब म्हणून ओळखावयाचे असते.
गुरुदेव ज्ञानदाते असतात. आत्मज्ञानाचे दर्शक सर्वनाम म्हणजे श्री गुरुज्ञानाव्यतिरिक्त संबंध श्री गुरुतत्त्वाशी घटवताच येत नाहीत. जीवनाचे व जीवनातले इतर सर्व संबंध, शुद्ध, ज्ञाननिष्ठ, ज्ञानैकहेतुक असू शकत नाहीत. साधनेत नियुक्त असताना जीवमात्राला ज्ञाननिष्ठ, ज्ञानहेतुक असा गुरुसंबंध, हा एवढाच संबंध इष्ट व उपकारक असतो.
जीवाच्या ज्ञानवतेला गुरुसंबंधाने - ज्ञानसंबंधाने - विषयनिष्ठा येत नाही.
अल्पज्ञानाचा पूर्ण ज्ञानाशी संबंध - साधकाचा श्री गुरुंशी संबंध, हा प्रमेयाशी, बहिर्विषयाशी संबंध नसतो व म्हणून या संबंधात जडता नसते, कर्मबंध नसतो व मोक्षहानी नसते.
कर्मनियतीने सिद्धवलेले मातृ-पितृ-बंधुसंबंध देखील या गुरु-शिष्य संबंधाइतके सोज्ज्वल नाहीत; कारण ज्ञानासाठी व ज्ञानानेच घटलेले, असे ते संबंध नसतात. गुरुशिष्यसंबंधांत वासना असलीच तर ज्ञानविषयक असते. इतर संबंधांत, ज्ञान कितीही असले तरी त्याचे फलित वासनापूर्ती असते. हा भेद किती महत्त्वाचा आहे?
केवळ एक गुरुसंबंध मानणार्या साधकाला जीवन्मुक्ती सहजसिद्ध असते; कारण, प्रबंधक संबंधांचा त्याने त्याग केलेला असतो. गुरुसंबंधाचा कारक ज्ञानसंबंध हा नि:संबंध अवस्थेला स्थिर ठेवतो.
जीवचैतन्याला विषयसंबंध बहिर्मुख करतात, ज्ञाननिष्ठ गुरुसंबंध अंतर्मुख करतो व ठेवतो म्हणूनच, श्री ज्ञानेश्वरांनी, स्वत:चे हृदयाला चौफाळून गुरुमाऊलीची पाऊले तेथे ठेवली आहेत.
ही सर्व गुरुमाऊलीची रहस्यरत्ने ‘ज्ञाननाथां’नी श्रीज्ञानेश्वरीत प्रकटविली आहेत किंवा लपविली आहेत. अहंकाराचा अखेर अस्त साधल्याशिवाय ईश्वरी शक्तीचा अधिवास, गुरुकृपेचे पसायदान उपलब्ध होत नाही. श्री ज्ञाननाथ पूर्णपणे अस्तंगत होऊन जेव्हा केवळ श्रीगुरू निवृत्तीनाथ उरतात तेव्हाच श्रीज्ञानेश्वरी प्रसवणारी प्रभातरल प्रतिभा उदित होऊ शकते.
श्री ज्ञाननाथ म्हणतात, “अन्न ज्याप्रमाणे मिठाचे वेगळेपण न ठेवता त्याचा स्वरुपांत अंतर्भाव करते, त्याप्रमाणे तुमच्यापुढे मी बसून, तुमच्यात - श्री निवृत्तीत परिपूर्ण झालो - समरस झालो.”
आता आणीन व्यक्ती। गीतार्थ तो ।
आता मला गीतार्थ सांगण्याचे सामर्थ्य आले.