प्रस्तावना

शिष्याची स्वसमर्पणाची कोटी व गुरूदेवांच्या प्रबोधक व विमोचक ज्ञानकृपेची कोटि

-६-

श्रीनाथ संप्रदायांत गुरूशिष्यसंबंधाचे एक उत्क्रांत, विकसित स्वरूप आढळून येते.

मानवी संस्कृ्तीच्या इतिहासात गुरूशिष्य-संबंधाशिवाय, उज्ज्वलोत्तम घटना संभवल्याच नाहीत.

श्री आदिनाथ, मत्स्येंद्रनाथांपासून निवृत्तिनाथ-ज्ञाननाथांपर्यंत अविच्छिन्नपणे प्रसृत व प्रगत झालेल्या श्री नाथपंथातील राजगुह्ये व विद्याबीजे यांचा प्रफुल्ल फुलोरा श्रीज्ञानेश्वरीत प्रकट झाला आहे.

अर्थात या प्रकटनांत काही संकेत आहेत. उदाहरणार्थ, ज्ञाननाथांनी श्री ज्ञानेश्वरीच्या काही अध्यायांच्या प्रारंभी जी भव्य-सुंदर गुरूपूजा बांधली आहे त्या गुरूपूजेत नाथपंथातील श्री गुरूमार्गाचे, उपासनांचे व उपासकांचे नाथपंथांतील गुरूशिष्यसंबंधाचे, रहस्यविशेष प्रकट केले आहेत.

शिष्याची स्वसमर्पणाची कोटी व गुरूदेवांच्या प्रबोधक व विमोचक ज्ञानकृपेची कोटि - हे दोन बिंदू दोन समांतर रेषांवर अगदी समान अंतराने सरकत असतात.

श्री गुरूमार्गांत शिष्याने स्वत:च्या नामरूपाचे, देहाचे, अंत:करणाचे व अंत:करण चतुष्टयाचे - अहंकार, बुद्धि, मन व चित्त यांचे सर्वस्व समर्पण करणे आवश्यक असते.

बुद्धीचे व अहंभावाचे समर्पण करताना शिष्याच्या जीवभावाला कमालीचे क्लेश होतात. या अवस्थेत आत्मवंचना अत्यंत प्रभावी ठरत असते.

शिष्याला आपल्या तत्त्वनिष्ठेची व साधनेच्या यथासांगतेची इतकी नि:शंकता वाटते की, अद्यापि अंतिम फलश्रुतीचा अभाव असावा, हे श्री गुरूंचेच दौर्बल्य होय किंवा असूया, लोभ, ममत्व इत्यादी क्षुद्र भाव श्री गुरुंना देखील सुटले नाहीत - असे आत्मवंचक दरा्ग्रह त्या शिष्याला पदच्युत करू पाहतात. गुरूभावनेचा, गुरूसंपर्काचा संपूर्ण त्याग करावा, अशा मन:स्थितीतही त्याचे मन आंदोलू लागते.

अंशसाधनेने सतेजलेल्या बुद्धीचे अस्त्र अहंकाराच्या हातात मिळाल्यामुळे आत्मवंचक, आत्मरोचक आभास उत्पन्न करणे अहंकाराला सहज शक्य होते.

आपण कुणी अनन्यसाधारण साधक, असामान्य अभ्यासक आहोत म्हणजे आपण जागतिक सार्वत्रिक नियमांना केवळ अपवादभूत आहोत, आपल्या ठिकाणी काही अपूर्व, अनुपमेय गुणसंपत्ति आहे - असे बहुधा प्रत्येक साधकाला वाटते. वस्तुत: सर्वसामान्यच असणाऱ्या साधकाला तर, स्वत:च्या असामान्यतेबद्दल अविचल निश्चिति असते - स्वत:च्या लोकविलक्षण अधिकाराबद्दल तो सर्वथैव नि:शंक असतो.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search