-५-
श्रीज्ञानेश्वरीचा नित्यपाठ प्रत्येक महाराष्ट्रीय जीवमात्राला वैदिक, औपनिषद, दार्शनिक व गीतानिर्दिष्ट जीवनपरंपरेशी परिचित ठेवील - त्याची प्रज्ञा, प्रखर व प्रसन्न करील.
सोज्ज्वळ बुध्दिनिष्ठेला, शास्त्रीय दृष्टी्कोनाला डोळस अध्यात्माला श्रीज्ञानेश्वरी हे एक प्रकट आवाहन आहे.
बौद्धिक कूटप्रश्नांच्या सहस्रकांना संगीत व समाधान देण्याचे सामर्थ्य श्रीज्ञानेश्वरीच्या नित्यपाठात आहे.
अंतर्मुख जीवन सुरू झाले की मनोवितानांत संशयपिशाच्चांचे सैतानी थैमान सुरू होते - होणे नैसर्गिक व आवश्यकही आहे.
‘ज्ञानशक्ती’ धर्मयु्द्धाचे नियम आदरून, अज्ञानाशी झगडत असते.
सुप्त संस्कारांची, निद्रिस्त अज्ञवृ्त्तींची हत्या ज्ञानाला करवत नाही. उठवून, जाग देऊन, समोर उभे करून, ज्ञानशक्ती त्यांना पराजित करू पाहते.
‘केवलं ज्ञानरूपम्’ असे श्रीसदगुरूदेव, आपल्या शिष्याचे, शिष्योत्तमाचे संशय व विपर्यय त्यांना केवळ वरदहस्ताने सहसा शांत करीत नसतात.
राजकारणात, ज्याप्रमाणे युद्धाशिवाय स्वातंत्र्य नाही, त्याप्रमाणे, धर्मकारणात स्वत:च्या अज्ञानाशी, अंतरविरोधाशी, कश्मल कर्माशयाशी झुंज घेतल्याशिवाय मोक्ष नाही - अंत:शांति नाही.
ज्ञानेश्वरीची नित्यसंगति, प्रथमवास्थेत संशयपिशाच्चांचे रान उठवील, अध्यात्माचे वैयर्थ्य भासवील, महापुरूषांच्या आचरणात भेसूर विसंगतीचे उठाव दिसतील, गुरूद्रोह निष्पन्न करून ‘अहंकार’ आपले क्षुद्र समाधान साधील. पण - पण ज्या अर्धस्फुट ज्ञानशक्तीने ही भूते उठविलेली असतात - तीच ती ज्ञानशक्ती स्फुटतर, पक्वतर होऊ लागली की ही भूते आपोआपच गाडली जातात - संशय फिरत जातात, महापुरूषांचे आचरण निष्कलंक व सुसंगत वाटू लागते - त्यांची साक्षित्वाची व नि:संगतेची दुर्ज्ञेय भूमिका स्पष्टतर होऊ लागते.
स्वत:च्या मर्यादेत, निमुळत्या निकषांनी विभूतींचे लोकोत्तर चारित्र्य मापण्याची लाज वाटू लागते, अहं-विशेषत: लुळी पडते.
‘नरश्रेष्ठ’ अर्जुनाला या संशयात्म-अवस्थेतून जावे लागले - त्या अवस्थांचे शब्दचित्रण श्रीज्ञानेश्वरांनी किती हळुवार पद्धतीने केले आहे हे, श्रीज्ञानेश्वरीच्या नित्यपाठकांच्या सहज लक्षात येईल.
साधकावस्थेत पहिले दुसरे पाऊल पडल्याबरोबर आपण ‘सिद्ध’ आहोत - साधक नाही, असा आभास अहंविशिष्ट जीवांना उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही.
या सर्व आभासांचा, संशयांचा, विपर्यांचा निरास करण्यास ज्ञात्यांची संगति, महापुरूषसंश्रय हा एकच उपाय आहे.