(२)
श्री आऊबाइंचे जीवन म्हणजे भारतीय स्त्रीत्वाचा एक उत्कृष्ट आदर्श. भारतीय स्त्रीला त्यागाचे, आस्तिक्याचे, लीनतेचे वस्तुपाठ अनादि परंपरेने लाधलेले असतात.
श्री आऊबाई यांच्या देहाचे रज:कण व मनाचे रजतकरण (Astral atoms) सोज्वल परंपरेच्या गंगाजलात न्हालेले होते. त्यांचा जन्मच शिवरायांच्या भोसले कुळात! त्यांच्या रक्तात, नसानसात कुलधर्म, राष्ट्रधर्म, विश्वधर्म या विषयीचे प्रेम सळसळत होते.
जत संस्थानचे मूळपुरूष डफळापूरचे पाटील सटवाजीराव हे होत. त्यांच्यावर चिनगीसाहेब नावाच्या म्लेंच्छ महात्म्याचा कृपाप्रसाद होता.
हिंदूधर्माची सहिष्णु व संग्राहक वृत्ति परधर्मातील परम तत्त्वाचाच काय पण परधर्मीय पुण्यश्लोकांचाही प्रेमादरच करते.
परमार्थाच्या परमश्रेष्ठ भूमिकेवर जातीभेदादि क्षुद्र भावनांची अर्थवत्ता नष्ट होत असते.
सटवाजीराव व अवलिया दोघेही विशुद्ध आध्यात्मिक आकर्षणाने आकृष्ट झाले होते. अवलियाची अंतर्मुख वृत्ति, निरपेक्षता, ऋजुता, आधिदैविक श्रेष्ठता व सिद्धी यांची ओळख सटवाजीला पटली व गुरूभाव जागृत झाला. त्याचप्रमाणे, सटवाजीचे अलौकिक धैर्य, सूक्ष्म बुद्धिमत्ता, प्रखर धर्मनिष्ठा यांच्याविषयी अवलीयाला कौतुक वाटले व त्याने सटवाजीला आपला कृपाविषय करून त्याला वैभवाला चढविले.
सटवाजीला अवलीयाच्या ठिकाणी मंत्रदृष्ट्या वैदिक ऋषिचेच स्वरूप प्रतीत होई. ‘ऋषिवत्तेऽपि पूज्यते’ असे तत्त्वजिज्ञासू यवनांविषयी वराहमिहिराने म्हटले आहे.