(३)
सटवाजींना दोन मुलगे झाले - बाबाजी व खानजी. अवलियाच्या पुण्यस्मरणार्थ खानजी हे नाव मुद्दाम ठेवण्यात आले होते. बाबाजी हे थोरले चिरंजीव व आऊबाईसाहेब यांच्या धर्मपत्नी. पुरस्कृत ग्रंथाची चरित्रनायिका हीच होय.
त्यांचे माहेरचे नाव यशोदा. आईबापांची गरीबी फार, तरी घराणे प्रतिष्ठित. यशोदेच्या सात्त्विक पण महत्त्वाकांक्षी मातोश्रीने आपल्या लेकीकरता थेट जतचे महिपीपद हेरले! पूर्वसंस्काराच्या परिपाकाने ऋणानुबंधाच्या अदृष्य पण अमोघ आकर्षणाने, यशोदा ही युवराज बाबाजींची धर्मपत्नी व जयंतीची (जतची) स्वामिनी झाली.
बाबाजी हा अभिमन्यूसारखा मनस्वी, तेजस्वी व वर्चस्वी वीर होता.
यशोदा रूपाने काळीसावळी खरी पण तिच्या नेत्रात साहसी वृत्तीची एक चमक होती. वीरांगनेला शोभणार्या तिच्या डोळयातल्या जादूगिरीने बाबाजीला वेडे केले व त्याने सांगून आलेल्या शेकडो स्वरूपसुंदर बाहुल्या झिडकारून यशोदेचे साहसी पण सात्त्विक साहचर्य स्वीकारले. असल्या तुल्यगुण वधूवरांना एकत्र आणून विधात्याने केलेले हे क्वचितकौतुक डफळयांच्या प्रारब्धस्कंधाला फार वेळ पेलले नाही.
अभिमन्यूप्रमाणे बाबाजीही एक रणधुमाळीच्या चक्रव्यूहात सापडून कालवश झाला. बाबाजी शस्त्रास्त्रांचे खेळ खेळण्यात सदैव गढलेला असे. वीरवृत्तीला विलासाचे वावडेच असते. बाबाजी शिवरायांच्या स्वर्गीय दरबाराचा मानकरी झाला आणि आऊबाईंच्या ललाटींचा सौभाग्यलेख पुसला गेला.
सटवाजींनी आऊबाईसारख्या वीरस्नुषेस व वीरपत्निस कुलकीर्तीचे संरक्षण करण्याची आज्ञा केली.
नंतर, दशरथाप्रमाणे - पुत्रशोकात त्यांचाही अंत झाला.
यदृच्छेचे स्वैर विलास मर्त्यजीवांच्या सोई गैरसोईप्रमाणे थोडेच होतात?
भर्तृहरी म्हणतो त्याप्रमाणे कालभैरव व कालीमाता भुवनपटावर सारीपाटाचा खेळ खेळत आहेत.
काल: काल्या भुवनफलके क्रीडति प्राणिशारै:।
प्राणिमात्र म्हणजे कालाच्या हातातील लाकडाची खेळणी (शार) होत!