पुस्तकाचे नाव: ब्रह्मयोग विद्या शिक्षक (आवृत्ती २ री)
लेखक: कै. ल. ना. जोशी
प्रस्तावना: न्यायरत्न धुं.गो. विनोद एम्.ए.पी.एच्.डी., दर्शनालंकार
(१)
ब्रह्म-योग विद्येच्या या ‘शिक्षका’चा परिचय करून देण्याचे गोड काम प्रकाशकांनी माझ्यावर सोपविले आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती इ.स.१९२१ साली निघाली; तेव्हाच हे पुस्तक माझ्या पाहण्यात आले होते. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, अतींद्रिय अनुभवांच्या शास्त्राचा परामर्श सुलभ व सूचक पद्धतीने येथे घेण्यात आला आहे. योग-विद्या हा शब्द अनंत अर्थांचा व्यापक आहे. जगातील बहुतेक भाषात व देशात, या एका शब्दाचा, भारतीय धर्माचा व तत्त्वज्ञानाचा प्रतिनिधी म्हणून, संचार झालेला आहे. भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे योग; भारत म्हणजे योगविद्येची मातृभूमी; कोठलाही आध्यात्मिक अभ्यास म्हणजे योग; अध्यात्म म्हणजे योग - इत्यादी अनेक कल्पना पाश्चात्य देशात ‘योग’ या शब्दाने प्रसृत केल्या आहेत.