पुस्तकाचे नाव: भारतीय तत्त्वज्ञानसार
लेखक: लक्ष्मण गणेश बापट
प्रस्तावना: डॉ. धुंडिराजशास्त्री विनोद
(१)
श्री. लक्ष्मण गणेश बापट यांचा माझा प्रत्यक्ष परिचय अलीकडचा आहे. त्यांचे दोन ग्रंथ मी भेटीपूर्वी अवलोकिले होते व त्यामुळे वैचारिक परिचय कित्येक वर्षांचा आहे. अक्कलकोटचे श्रीस्वामीमहाराज ही गेल्या शतकातील एक अलौकिक विभूती होय. इ.स. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा पुरस्कार त्यांनी अत्यंत तळमळीने व अद्भुत प्रमाणात प्रत्यक्ष द्रव्यसाहाय्य देऊन केला होता. त्यांनी केलेल्या महान राष्ट्रकार्याची ओळख विद्यमान इतिहासाला अजून व्हावयाची आहे आध्यात्मिक जागृतीचे त्यांचे कार्यदेखील अजून अंशज्ञातच आहे. श्रीरामानंद बिडकरमहाराज यांनी अक्कलकोटच्या स्वामी महाराजांच्या पुण्यपरंपरेचे अंतस्तेज आत्मसात केले होते. श्री. नानासाहेब बापट यांनी त्याच नंदादीपाच्या अखंड प्रकाशात स्वत:चे जीवन पुनीत व प्रकाशित केले आहे. त्यांची आध्यात्मिक भूमिका श्रेष्ठ श्रेणीचा असून त्यांचे तात्विक विवेचन प्रकाशगर्भ व प्रसन्न असते. त्यांच्या ‘विचार-जागृति’ (१९३६) या ग्रंथांत अनेक तात्त्विक अधिकरणांच डोळस चर्चा आढळून येते. विशेषत: ‘अद्वैतसिद्धि व प्राप्ती’ आणि ‘उपसंहार’ या दोन प्रकरणात अद्वैततत्त्व-शास्त्राची तेजाळ मीमांसा त्यांनी केली आहे. तिचे अवलोकन प्रत्येक साधकाने अवश्य करावे. जिज्ञासूंच्या विचारशक्तीला जाग देणारा एक नाजूक ध्वनि या ग्रंथाच्या अध्ययनाने उदित होतो. श्रीरामानंद बीडकरमहाराज यांचे चरित्र (१९५१) म्हणजे अध्यात्म शास्त्रातील एक प्रत्यक्ष वस्तुपाठ आहे. श्रीरामानंदांच्या जीवनात परमार्थाचा पारिजात कसा बहरला, त्यांचे ठिकाणी वैराग्य कसे निष्पन्न झाले, त्यांना गुरूदीक्षा कशी प्राप्त झाली, त्यांनी नर्मदाप्रदक्षिणा किती कष्ट सोसून केली, शिष्यांचे त्यांनी केलेले मार्गदर्शन किती मूलगामी, परिणामकारक व साक्षात अनुभव देणारे आहे. या सर्व अंगोपांगांचे मार्मिक चित्रण श्री. नानासाहेब बापट यांनी आपल्या ‘गुरू-चरित्रात’ केले आहे. या ‘गुरूचरित्रात’ जीवनाच्या अध्यात्मिक विकासक्रमाचा आलेख हळुवारपणे रेखाटण्यास आला आहे. महाराष्ट्राच्या संतचरित्रवाङ्मयात या प्रासादिक ग्रंथाचे स्थान अढळ आहे.