प्रस्तावना

हिंदुधर्म-विश्वधर्म

पुस्तकाचे नाव: हिंदुधर्म-विश्वधर्म

लेखक: गणपतराव जांबोटकर, बेळगाव

प्रस्तावना: न्यायरत्न धुं.गो.विनोद

संस्कृतीच्या परिणतीला मानवी मनोवृत्तीचे व कर्मप्रवृत्तीचे प्रामाणिक प्रकटीकरण नेहमी उपकारक ठरते.

परिवतर्नशील समष्टिचक्राला मूलसत्यांच्या स्थायि केंद्राचा विरोध संभवत नाही; इतकेच नव्हे तर तो सनातन तत्त्व बिंदु प्रगतिपर परिवर्तनाचे स्थिर अधिष्ठान होय.

मानवी प्रगतीचा खरा हितशत्रू म्हणजे मिथ्याचार ! विचार, उच्चार व आचार यांची संगति हेच श्रेष्ठ नीतीचे सहज स्वरूप होय. 

शास्त्रसंस्काराने ही नैसर्गिक नीतीची स्वयंभू शिवमूर्ति अधिक आकर्षक व दैदीप्यमान झाली पाहिजे. तर्क हा अनुभूतीचा अनुयायी असावा.

अंधश्रद्धा अनुभवाच्या क्षेत्राचा संकोच करिते, त्यास विकसनक्षम ठेवीत नाही; पण निरनुभव तर्काच्या क्षितिजाची रेषा अमर्यादित, अतएव निराकार असल्यामुळे तर्कचक्षूही अनुभवाचे नेतृत्व एकाकीपणे स्वीकारू शकत नाही.

श्रद्धा व तर्क हे मानवी व्यक्तित्वाच्या चंडोलाचे दोन पंख आहेत; जीवनाच्या अनंत अंतरिक्षात त्या दोन पंखांच्या साहाय्याने व्यक्तिमात्राने सुखसंचार करावयाचा आहे. 

सनातन हिंदुसंस्कृतीबद्दल आपली आजची वृत्ति ज्याप्रमाणे, तर्कावर व वृद्धियोगावर सुप्रतिष्ठित असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे, आपण आधुनिक विज्ञानाबद्दल अंधश्रद्ध होता कामा नये. प्रमादाची शक्यता दोन्ही दिशेने आहे, ही जागृती हिंदुसमाजाने स्थिर राखली पाहिजे. 

श्रद्धावंत व्यक्ती ही तर्कहीन असली पाहिजे हे अनुमान दुष्ट आहे. फार काय, प्रतिष्ठित तर्कप्रवण होणे अशक्य आहे असे नव्हे. 

भारतीय तर्कशास्त्रातील सोज्वल बुद्धिवादाबद्दल काहीच बोलावयास नको. ‘कुमरिल भट्टा’सारख्या कर्मठ मीमांसिकांनीही बुद्धिवाद हा नैसर्गिक व संग्राह्य ठरविला आहे. 

‘बुद्धिपूर्व कारिणोहि पुरूषा यावत्प्रशस्तोऽयमिति नावबुध्यन्ते तावन्न प्रवर्तन्ते।’ - तन्त्र वार्तिक 

‘प्रशस्तता बुद्धिला पटल्याशिवाय पुरुष प्रवृत्तिक्षम होत नाही’, असे कबुल करणारा कुमारिल भट्ट तर्काच्या उपयुक्ततेविषयी अज्ञ नव्हता. 

व्यक्तिस्वातंत्र्याचेही खरे रहस्य प्राचीन भारतीय तत्त्वज्ञांना पूर्णपणे समजले होते. ‘हृदयेनाभ्यनुज्ञात:’ किंवा ‘स्वस्य च प्रिय मात्मन:’ अशी धर्म लक्षणे करणारा ‘मनू’ व्यक्तिच्या ‘स्व’भावाकडे किती आदरवृत्तीने पहात होता. हे अधिक स्पष्ट करण्याची जरूरी नाही. महत्त्वाचा मुद्दा एवढाच की, हिंदू जनतेने आपल्या नवयुगचाराकरिता आवश्यक असणारी स्फूर्ति, भारतीय धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान यामधूनच घेतली तर ती अधिक फलक्षम होईल.

‘हिंदूधर्म-विश्वधर्म’ या ग्रंथांतील शिकवण प्राचीन भारतीय धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान यामधून उद्धृत केली आहे. हिंदूधर्माचे सत्यस्वरूप कसे आहे व त्याचा आधुनिक काळात एकंदर मानव समाजाला कसा व किती उपयोग शक्य आहे, याचे साधारण विवेचन या ग्रंथात झाले आहे. विशेषत: हिंदुसमाजाने आज कसे वागले पाहिजे याचे दिग्दर्शन ग्रंथकाराने कळकळीने केले आहे. धर्मशास्त्र विषयक आजकाल प्रसिद्ध झालेल्या वाङ्मयात प्रस्तुत ग्रंथाइतका, संग्राहक व विशेषत: सुबोध ग्रंथ दुसरा नाही असे म्हणण्यास हरकत नाही.

श्री.जांबोटकर हे एक भारतीय संस्कृतीचे अभ्यासू व विचारवंत उपासक आहेत. मंत्रविद्येत त्यांची चांगली गति असून विद्याविशिष्ट विनयाने, त्यांनी गेली १० वर्षे त्या गूढविद्येचे यशस्वितेने संशोधन चालविले आहे. या पुस्तकांतील ‘अभ्युदयासाठी केलेल्या योजना’ हे प्रकरण ‘आधुनिक’, म्हणजे तर्कप्रधान दृष्टीने व उपयुक्तता वादाच्या भूमिकेवरून लिहिले गेले आहे. परिवर्तन ते आवश्यक मानतात. पण त्यांची तत्त्वनिष्ठाही अढळ आहे.

माझे स्वत:चे त्यांच्याशी पूर्ण मतैक्य नाही. पण मतभेद - प्रामाणिक मतभेद - श्री.जांबोटकर यांस नेहमीच आवडतात, अशी त्यांच्या अल्प सहवासानेही माझी खात्री झाली आहे. 

मायदेशाची सर्वांगीण उन्नती व्हावी अशी त्यांच्या अंत:करणात तळमळ आहे व त्यामुळे श्री.जांबोटकर यांचा हा ग्रंथ अत्यंत प्रसन्न व सुबोध वठला आहे.

हिंदूधर्म हा विश्वधर्म आहे, हिंदूधर्मशास्त्राचे क्षितिज सर्वसंग्राहक आहे. मानवतेच्या सर्व प्रकारच्या विविध व विसंवादी सहजप्रवृत्तींना समन्वित व सफल करण्याचे सामर्थ्य हिंदू तत्त्वज्ञानामध्ये स्वयंसिद्ध आहे. असा या ग्रंथाचा तेजस्वी संदेश आहे व तो श्री. जांबोटकर यांनी सामान्य जनतेच्या हृदयस्पर्शी सुबोधपणे भिडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. 

या ग्रंथाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, श्री.जांबोटकर यांनी गुरुदक्षिणा म्हणून आपल्या सद्गुरूंच्या चरणी समर्पिला आहे. मानवी जीवनाचे यज्ञस्वरूप वर्णन करताना छांदोग्यकारांनी गुरुदक्षिणेच्या परमोच्च प्रतीकाचे वर्णन, ‘अथ यत्तपो दानमार्जवमहिंसा सत्यवचन मितिता अस्य दक्षिणा:।’, या सुंदर संकल्पाने केले आहे.

ग्रंथातील विचारांचा सोज्वळ व सु-‘वर्ण’ लक्षात घेताल श्री.जांबोटकर यांची ही भूयसी महादक्षिणा सर्व प्रकारे ‘वैदिक’ व ‘ब्रह्मवर्चस्वी’ आहे यात शंका नाही. त्यांनी हे कार्य ‘विद्यया, श्रद्धया च उपनिषदा’ असे केले असून त्याचा जनतेने स्वीकार व सत्कार करावा अशी विनंती आहे. 

ॐ तत्सत्।

- धुं.गो.विनोद 

ॐ ॐ ॐ

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search