पुस्तकाचे नाव: चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकराचे आत्मचरित्र
लेखक: लक्ष्मण रामचंद्र पांगारकर
प्रस्तावना: न्यायरत्न धुं.गो. विनोद. एम्.ए.पी.एच्.डी., दर्शनालंकार
आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाला आनंदमेघ लेखण्याची, प्रत्येक घटनेला प्रमोदाची पयस्विनी बनविण्याची दृक्सिद्धी, विवेकशील व्यक्तीलाच दीर्घ प्रयत्नाने प्राप्त होते. श्री.पांगारकरांनी विवेकाच्या उदंड तपस्येने ही दृक्सिद्धी कमाविली आहे. त्याच वैयक्तिक तत्त्वमान तेजाळ आशावादावर आधारलेले आहे. पत्थरांतून पय:पीयूष, सोमलांतून संजीवनी व दु:खाश्रूंतून सुखोष्णभाव विवेकिणे हे बुद्धिनिष्ठ आशावादाचे स्वरूपलक्षण होय. श्री. पांगारकरांचा पौर्वदैहिक बुद्धिसंयोग व इहस्थ व्यासंग हा आशावाद आत्मसात् करण्याइतका बलिष्ठ आहे. श्री.पांगारकर हे उन्मत्त भक्त आहेत. त्यांचा लौकिकाचार म्हणजे भक्तीच्या उन्मादात त्यांच्या चित्ताने केलेले स्वैर पदक्षेप! त्या पदक्षेपात सुहृदय वृत्तीला उदात्त कलेचा साक्षात्कार होईल तर काकदृष्टीला तेथेच बेढब पाऊलफेक दिसेल. भक्तिजाह्नवीत यथेष्ट डुंबणार्या तत्त्वानुभवाची मौक्तिके जीवनाच्या तळाशी भिडून निरखणार्या, पारखणार्या व पारखून ती मौक्तिके तटस्थांकरिता बेभानपणे भिरकाविणार्या, श्री.पांगारकरांच्या भक्तीरंगेल जीवात्म्याला बाह्य व्यवहाराचा आठव बळेच ठेवावा लागतो. अकिंचन राहण्याचा व अकिंचन होण्याचा ते स्मरणपूर्वक प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या तीव्र स्मरणशक्तीला, लाजविणारी त्यांची तीव्रतर विस्मरणशक्ती या कामी त्यांना सदैव साहाय्यक होते. कित्येक बहुमोल वस्तू तपकिरीच्या चांदीच्या डब्या तर त्यांनी शेकड्यांनी हरविल्या आहेत व हरविल्याबद्दल त्यांना झालेला आनंद, त्या मिळाल्याबद्दल झालेल्या विषादाचाच स्मारक असे! त्यांच्या स्वत:च्या शिरोवेषाबद्दल ते जितके बेफिकीर तितकेच आपल्या वाङ्मयबालेकरिता कृत्रिम अलंकार घडविण्याबद्दल! पण ती जातीची सुंदर व मधुराकृती असल्यामुळे कृत्रिम मंडने तिला न भूषविता असलीच तर तिच्या सान्निध्याने स्वत:लाच भूषित करतात. आपले लेखन परिणामकारक व्हावे म्हणून श्री.पांगारकर बुद्ध्या प्रयत्न कधीच करीत नाहीत. सकृत्लिखिताचे पुन:संस्करण त्यांना सर्वथैव अशक्य. उपचाराचे त्यांना वावडे. लेखनात वैयक्तिक संबंधांत, एकंदर जीवनातच कृत्रिमतेचा अभाव. त्यांचे लेखन व वक्तृत्व इतके रसगर्भ व विलोभक आहे - पण त्याचे कारण जीवनाशी जगताशी व जगदीश्वराशी त्यांचा असलेला जिव्हाळा, त्यांची उद्यमशीलता किंवा दक्षता नव्हे. जिव्हाळा हे त्यांच्या शब्दसरस्वतीचे सौभाग्यलेणे व या जिव्हाळयामुळे त्यांच्या लेखनातील अश्लिष्टता, शिथिलता क्षम्य व क्वचित् भूषणभूतहि झाली आहे. अस्ताव्यस्त माहितीच्या श्रोणीभारामुळे त्यांची शब्दसुंदरी अलसगमना दिसते; पण अंतस्थ जिव्हाळयामुळे व मुद्रेवर बिंबलेल्या पवित्र अंतरभावामुळे त्या प्रौढेच्या अलसगमनातहि एक प्रकारचे मादक आकर्षण प्रतीत होते. श्री.पांगारकर ही एक महाराष्ट्राची रत्नमंजुषा आहे. पैठण, आळंदी, देहू, सज्जनगड व पंढरपूर या पंचपेठेतील पाच विविध घाटांचे रत्नालंकार या मंजुषेत आहेत. त्यांचा साहित्यसमुद्र या पाच ठिकाणी उगम पावलेल्या साहित्यनदांनी संघटला आहे. विपुल संपत्ति मिळून देखील, अनास्थेमुळे स्वत:च्या संसाराची, सांपत्तिकदृष्ट्या त्यांनी होळी करून घेतली आहे पण वरील पंचामृताने, स्वत:च्या आत्मनंदाची रंगपंचमी, जगाला झुलवीत-भुलवीत, त्यांनी अव्याहतपणे साजरी केली आहे. आत्मरति हेच त्यांच्या जीवनातील मध्यकेंद्र तेथून त्यांच्या विविध कर्तृत्वाच्या त्रिज्या उद्भूत होतात. ग्रंथरचना, प्रवचने, संभाषणे सर्व काही आत्मसुखाकरिता संतवाङ्मयाचे पाईकपण पत्करून श्री.पांगारकरांनी स्वत:च्या जीवनास अखंड धर्मकीर्तनाचे स्वरूप दिले आहे. त्यांच्या वाग्यज्ञाने संतुष्ट होऊन विश्वात्मके देवे त्यांना मोक्षश्रीची आभरणे देऊ केली आहेत. ईश्वरनिष्ठांच्या सनातन मांदियाळीत श्री.पांगारकरांना मनाचे स्थान लाभणार आहे. पीयूषाच्या या बोलत्या अर्णवाकडे चित्त वेधले की, त्यांच्या शब्दसरस्वतीला पंडित जगन्नाथरायाच्या गंगालहरीतील खालील पंक्तींनी संबोधावे असे वाटते -
अथं हि न्यक्करो जननि मनुजस्य श्रवणयो:।
ययोर्नान्तर्यास्तव लहरीलीलाकलकल:।।
श्री.पांगारकरांचे जीवन हे महाराष्ट्रीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण निदर्शन आहे. महाराष्ट्राच्या पुनरुज्जीवनात परिणामत: श्री.पांगारकर ही एक प्रचंड बौद्धिकशक्ती ठरली आहे. अंधश्रद्धेच्या कर्दमात रुतलेली महाराष्ट्र संतांची वाग्रत्ने, पांगारकरांनी त्यावर बुद्धिसंस्कार करून बहुजनसमाजाला ग्राह्य व पंडितांना संग्राह्य केली आहेत; बुरसलेल्या संतवाङ्मयाचे स्वाभाविक अन्तस्तेज व बुद्धिवैभव श्री.पांगारकरांच्या शोधक स्पर्शाने अभिव्यक्त होऊन त्याला श्रेष्ठ दर्जाची बौद्धिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. महाराष्ट्राच्या नवयुगतेजाला श्री.पांगारकरांच्या ग्रंथनिर्मितीने एक सत्वगंभीर झाक दिली आहे. क्वचित त्यांचे लिखाण गढूळ झाले आहे. अंधश्रद्धेला पोषक असा ध्वनि त्यातून निघतो, पण याचे प्रमुख कारण त्यांच्या स्वभावसिद्ध अ-जागर (Unwakefulness) वाङ्मयव्यवहारात ते दंडेली करतात. बेफिकीरपणे, सुस्त बेपर्वाईने ते संदर्भतंतूला वाटेल तसा छेडतात. पण या दुर्गुणाची त्यांना स्वत:ला, त्यांच्या टीकाकारांपेक्षाही अधिक तीव्र जाणीव आहे. त्यांच्या स्वैरिणी कल्पनेला, जणू काय, तेहि पायबंद घालू शकत नाहीत! त्यांच्या आत्मरत वृत्तीला असल्या प्रमादांची कदरच वाटत नाही. तापलेल्या जगावर सात्त्विक प्रेमाच्या शीतल चांदण्याची पाखर घालण्यास अवतरलेल्या या चरित्रचंद्राचे दर्शन घेण्याकरिता प्रत्येक खरेखुरे मर्हाठी हृदय सप्तसागरातल्या संयुक्तशक्तीने सदैव उंच उंच हेलावत राहील. महात्माजींनी आपले ‘सत्याचे प्रयोग’ जगाला विदित केले. श्री.पांगारकरांनी आपल्या चरित्रचंद्राच्या या लघुकौमुदीत ‘प्रेमाची योगसिद्धी’ - प्रयोगकृति नव्हे - विशद केली आहे. म्हणूनच श्री.पांगारकर गृहधर्माला आत्मचिंतनाचे एक विधान समजतात. मुलांचे-गृहरत्नांचे - ते रत्नरसिक आहेत. त्यांच्या मते संसार हेच जीवनाचे सम्यक् सार आहे. प्रत्येक विनाशधर्म विषयात व व्यक्तींत ध्रुव पण जविष्ठ - मनापेक्षाही अधिक गतिमान - अशी एकमात्र परंज्योति अधिष्ठित आहे. या परमसत्याचा अखंड आठव हीच प्रेमसमाधि. गृहधर्माच्या आसनावर हा प्रेमसमाधि सुखेनैव अनुभविता येतो व श्री.पांगारकर याच दृढश्रद्धेने आपले जीवन व्यतीत करीत आहेत. त्यांना प्रदीर्घ आयुर्दाय चिंतून या तात्त्विक पुरस्कारापुढे माझ्या आवडत्या ऋग्वेदीय मंत्रार्धाचा पूर्णविराम ठेवतो.
ध्रुवं ज्योतिर्निहितं दृशयेऽकं मनोजविष्ठ पतयत्स्वन्त:।
- धुं.गो.विनोद, २२-५-३८, ६२९, शनिवार पेठ, पुणे.
ॐ ॐ ॐ