प्रस्तावना

देशभक्त बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांचे जीवनचरित्र

पुस्तकाचे नाव: देशभक्त बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांचे जीवनचरित्र

लेखक: शंकर धोंडो सार्दळ, वाङ्मय विशारद

परामर्श : ले. न्यायरत्न धुं.गो. विनोद

इ.स.१९१५ ते १९२५ पर्यंत माझा अनेक क्रांतिकारक व क्रांतिकारी संघटना यांच्याशी घनिष्ट संबंध असे. १९१७ साली अमृतसर येथील एका बैठकीत बॅ. के.यांचे कर्तृत्व प्रथम माझ्या कानी आले. ‘भवानी मंदिर’ या चळवळीचे प्रणेते म्हणून क्रांतिकारकांमध्ये त्यांच्याबद्दल अतीव आदर असे. भवानी मंदिराची योजना बाह्यत: राष्ट्रीय शिक्षणाची वेशभूषा पेहरून होती; पण तिचे अंत:स्वरूप अत्यंत जहाल होते. क्षितिनाथ बॅनर्जी नावाच्या एका बंगाली क्रांतिकारकाने अमृतसरच्या एका गुप्त बैठकीत भवानी मंदिराच्या गाभार्‍यात असलेल्या ज्वलंत महाज्वालेचे स्वरूप विशद करून सांगितले होते. सप्तशतीचे सातशे श्लोक आहेत. प्रत्येक श्लोकाचा एक प्रतिनिधी अशा सातशे शाक्त सैनिकांचा एक संघ सर्व भारतवर्षाला व्यापून गुप्तपणे शस्त्रास्त्रे पुरविणार होता. बी.के.डे. म्हणजे बॅ. केशवराव देशपांडे हे बंगालमधील कार्यकर्त्यांसाठी धारण केलेले त्यांचे गुप्त नाव होते. या सहीचे एक पत्र देखील क्षितिनाथ बॅनर्जी यांनी मला दाखविले होते. इ.स.१९३५ सालचा सप्टेंबर महिना. बडोद्यातील कार्यकर्ते श्री.बाबूराव आपटे यांच्या आमंत्रणावरून गणपति उत्सवांतील व्याख्यानासाठी मी बडोद्याला गेलो होतो. तेव्हा ब्राह्मणसभेत न्यायदर्शनावर माझे व्याख्यान झाले होते. त्या व्याख्यानास ‘बी.के.डे.’ आलेले होते. त्यांच्या व माझ्या प्रत्यक्ष भेटीचा हाच पहिला प्रसंग. त्यांनी आपल्या घरी चर्चेसाठी मला अगत्याचे आमंत्रण दिले. त्यांच्या कर्तृत्वाशी व कीर्तीशी तत्पूर्वी माझा १८ वर्षे परिचय होता. त्यांची अशी अचानक भेट ज्या सुवर्णक्षणी झाली त्या क्षणाच्या स्मृतीचा सुगंध अजून देखील अनेक वेळा अंत:करणात दरवळत असतो. प्रथम त्यांच्या घरी गेलो तेव्हा सायंकाळी पाचचा सुमार होता. पहिल्या भेटीत त्यांनी स्वत:बद्दल बोलण्याचे सर्वस्वी टाळले. माझ्याबद्दलच सर्व प्रकारची प्रेमाने व आस्थापूर्वक चौकशी केली. १९२९ साली मी प्रथम पाँडिचेरीला अरविंद बाबूंच्या आश्रमात गेलो. त्यावेळचे अरविंदबाबूंचे जिव्हाळयाचे स्नेही, अनुयायी व मद्रास ‘बार’चे अग्रगण्य एडव्होकेट श्रीमान् दोरायस्वामी हे स्वत: मला पाँडिचेरीस घेऊन गेले. बॅ.केशवराव यांच्या बुद्धिवैभवाचा आदरपूर्वक उल्लेख त्यांनी केला होता. बॅ.फिरोजशहा मेहता (मुंबईचे सिंह) यांच्याशी झालेल्या सामन्यांत बॅ.केशवराव यांनी मिळविलेला ऐतिहासिक विजय एडव्होकेट दोरायस्वामी यांच्या बोलण्यात ओघाने आला होता. भवानी मंदिराच्या प्रतिष्ठापनेची व तत्त्वप्रणालीची श्री.दोरायस्वामींना पूर्ण कल्पना होती. इ.स.१९२९ साली पाँडिचरी येथील आश्रमात अनेक व्यक्तींना बॅ.केशवराव यांच्या पूर्वायुष्याबद्दल व असामान्य कर्तृत्वाबद्दल पुष्कळच माहिती होती. त्यावेळी ‘मदर’ (Mother) जवळ माझी अनेक विषयांवर पुष्कळ चर्चा झाली. पण त्यांनी मात्र बॅ.केशवरावजींचा उल्लेख केल्याचे स्मरणात येत नाही. बडोद्यात त्यांच्या व माझ्या एकंदर सात बैठकी झाल्या. अद्वैत हा त्यांच्या तात्त्विक भूमिकेचा मध्यबिंदू होता. त्यामुळे ‘समन्वय’ हे त्यांच्या विचार, उच्चार व आचार या तिन्ही क्षेत्रांतील कार्य पद्धतीचे उपकरण तंत्र होते. वैयक्तिक व राष्ट्रीय जीवनाच्या सर्व अंगोपांगात समन्वय दृष्टीने पाहण्याची दृक्सिद्धी काही प्रमाणात त्यांना जन्मसिद्ध होती; स्वाध्याय व संयम, ज्ञान व भक्ती यांचा पुरुषार्थपूर्वक विकास करून त्यांनी त्या जन्मजात दृक्सिद्धीला सहस्रगुणित केले होते. न्यायमूर्ती रानडे व श्री.गोखले यांच्यासारखे मध्यमक्रम अवलंबिणारे राष्ट्रसेवक, अरविंदबाबू व लो.टिळक यांच्यासारखे तेजाळ व जहाल क्रांतिवीर; महात्मा गांधींसारखा मनस्वी व ब्रह्मवर्चस्वी कार्यकर्ता नवभारताच्या या पंचविध पंच प्राणांशी पूर्णत: समरस होण्याची शक्ती बॅ. केशवरावजी यांस जन्मजात व पुरुषार्थपूर्वक कमावलेल्या समन्वय दृष्टीमुळेच लाभली. समन्वय दृष्टी ही शांतिमय सहजीवनाची कारक व धारक शक्ती होय. Peaceful Co-existence म्हणजे शांतिमय सहजीवन ही कल्पना व ही शब्दपंक्ती आजकालच्या जागतिक राजकारणात विशेषत्वाने निर्देशिली जात आहे. जगातल्या बहुतेक राष्ट्रांत गेले एक वर्ष या घोषवाक्याची उच्चारणा व विचारणा अत्यंत तळमळीने केली जात आहे. युरोप-अमेरिका, त्याचप्रमाणे अतिपूर्व व आग्नेय आशियामधली राष्ट्रे या सर्व ठिकाणी अनेक राजकीय पुढारी व तत्वज्ञ यांच्याशी विचारविनिमय करताना विश्वशांति व शांतिमय सहजीवन या ध्येयांचे ध्वनिप्रतिध्वनी प्रत्येक ठिकाणी मला ऐकू आले. कै. साहेब यांच्या वैयक्तिक जीवनात दोन प्रकाश किरणे नेहमी खेळताना दिसत एक शांतीचे व दुसरे सहजीवनाचे. सर्वांना सर्व प्रकारचे सहकार्य देत राहणे व शांतिमय सहजीवन निर्माण करणे ही ‘साहेबांच्या’ जीवनातली एक ‘तहान’ म्हणजे तृष्णाच होती. स्वराज्य व स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीशी पूर्णत: तादात्म्य पावलेले बॅ. केशवरावजी साधन भेदांना अधिष्ठानभूत साध्यावर आपले शक्तिसर्वस्व केंद्रित करीत. त्यामुळे व्यक्तिव्यक्तींमधील व पक्षोपक्षांमधील मतमतांतरे त्यांच्या बुद्धीचा विक्षेप केव्हाही करू शकली नाहीत. राष्ट्रीय स्वातंत्र्य, सामाजिक सुधारणा, आंतरराष्ट्रीय शांति, मानवतेचा विकास, सांस्कृतिक उन्नति, नैतिक जागृती व आध्यात्मिक मोक्ष ही भव्य सप्तश्रृंगी वैयक्तिक जीवनाच्या एका परमाणूवर अधिष्ठित आहे. हे त्रिकाल सत्य बॅ.केशवरावजी यांच्या श्रद्धेचा व जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा मूलाधार होय. कोणतेही तत्त्व त्यांना ग्राह्य वाटले तर स्वत:च्या जीवनात त्याचा ते विनियोग करीत. स्वत:च्या वैयक्तिक संसाराला त्यांनी सामाजिक, राष्ट्रीय व आध्यात्मिक उपपत्तींची व सत्यांची एक सार्वजनिक प्रयोगशाळाच बनविली होती. उलटपक्षी, नर्मदा तटावरच्या गंगानाथ विद्यालयाला, सार्वजनिक संस्थेला त्यांनी स्वत:च्या कुटुंबाचे व संसाराचे स्वरूप दिले होते. काँग्रेसने ध्येयभूत मानलेल्या बहुतेक चळवळींचा उपक्रम बॅ.केशवरावजींनी स्वत:च्या प्रज्ञेने व प्रतिभेने अगोदरच प्रत्यक्षात आणला होता. क्रांतीचे कट व अध्यात्म या व्यतिरिक्त ते स्वत:बद्दल कोणतीही गोष्ट गुप्त ठेवीत नसत. स्वत:ची सांपत्तिक स्थिती व कौटुंबिक जीवन या विषयी ते अगदी मोकळेपणाने बोलत असत. माझ्या व त्यांच्या सात दिवसांच्या मुलाखतीत त्यांना मिळत गेलेले पगार, विवाहादिकांचा खर्च, चि.गोविंदराव यांच्या जर्मनीतील शिक्षणाची केलेली व्यवस्था वगैरे सर्व गोष्टी त्यांनी अत्यंत नि:संकोचपणे व संतसहज मोकळेपणाने मला सांगितल्या. माझी भेट झाली त्यावेळी ते मंत्र शास्त्राचा व विशेषत: तंत्र विद्येचा त्यांचा नेहमीचा अभ्यास काही विशिष्ट हेतूने व तीव्रतेने करीत होते. मला ‘बीजाक्षर’ विद्येबद्दल त्यांनी अनेक प्रश्न विचारले. मला हिमालयात व तिबेटमध्ये मिळालेली माहिती त्यांना मी विदित केली. मी अभ्यासिलेल्या ‘अनामिका विज्ञान’ या शास्त्राबद्दल त्यांना विलक्षण कुतूहल वाटले. करंगळीच्या जवळील बोटाचा मूलभाग हे सूर्यस्थान समजले जाते. व्यक्तिगत व विश्वगत सूर्यतत्त्व हेच आत्मतत्त्व होय. ‘सूर्य आत्मा जगत: तस्थुषश्च’ हे श्रुतिवाक्य प्रसिद्धच आहे. या अंगुलि-विज्ञानाच्या सहाय्याने व्यक्तिमात्राच्या मागील व पुढील ‘सात जन्मांचे’ ज्ञान होते, या विषयाबद्दल ते म्हणाले, “या शास्त्रातले एक तज्ज्ञ श्री.अरविंदबाबूंना व मला काही वर्षांपूर्वी भेटले होते. पण ते एकाएकी निघून गेले. श्री.अरविंदबाबूंना या विज्ञानाबद्दल अतीव जिज्ञासा होती. तुम्ही त्यांना जाऊन जरूर भेटावे. आपल्याबद्दल त्यांना मी अवश्य कळवितो.” त्यांच्या सहवासात काही काळ गेल्यावर ‘न लगे मुक्ति धनसंपदा। संत संग दे गा सदा।’ असे श्री तुकाराम महाराजांनी का म्हटले असावे त्याचा उलगडा होतो. हा ‘परामर्श’ लिहित असता दिल्लीस जाण्याचा योग आला. आचार्य काकासाहेब कालेलकरांची तेथे भेट झाली. ते स्वत: या ग्रंथास प्रस्तावना लिहित होते. त्यांनी आपल्या बॅ.केशवरावजी यांचेशी असलेल्या गाढ स्नेहसंबंधाचा उल्लेख करून मला आग्रहपूर्वक सुचविले की, मी माझे लेखन ‘विस्तृत-तम’ करून बॅ.केशवरावजींच्या व्यक्तित्वाची व राष्ट्रकार्याची महती शक्य तेवढ्या ‘दीर्घ’ स्वरूपात सांगावी. बॅ.केशवरावजींचे चिरंजीव डॉ. गोविंदराव यांचा प्रथम परिचय केवळ यदृच्छेनेच झाला. त्यांचा आध्यात्मिक विषयांचा व्यासंग हे अर्थातच या परिचयाचे मूळ कारण होय. पुढे त्याचा परिपाक दृढतम स्नेह बंधात झाला. अलीकडे पंधरा वर्षे हे ऋणानुबंध कौटुंबिक स्वरूपाचे झाले आहेत. डॉ.गोविंदराव व सौ.इंदुताई या उभयतांचा संसार म्हणजे बॅ.केशवरावजींच्या उच्चोदात्त आचार-विचारांचे एक जीवमान स्मारकच आहे. सौ.इंदुताईंची समाजसेवा व राष्ट्रकार्य बृहन्महाराष्ट्राला विदित आहे. श्रीयुत शंकर धोंडो सार्दळ यांनी लिहिलेले बॅ. केशवराव देशपांडे यांचे हे ‘जीवन-चरित्र’ महाराष्ट्राच्या चरित्र वाङ्मयाचा एक अमूल्य अलंकार आहे. त्यांची भाषाशैली अर्थगंभीर व रसमधुर असून विवेचन पद्धती उद्बोधक व आल्हादक आहे. श्री. केशवरावजींच्या चरित्राची गुंफण करताना त्यांनी उपयोजिलेला ऐतिहासिक दृष्टीकोन, गेल्या शंभर वर्षांतील सर्व प्रकारच्या राष्ट्रीय आंदोलनांचा अन्वयार्थ व्यक्तविणारा आहे. भारतात व महाराष्ट्रात प्रकट झालेले सर्व प्रकारचे विचारप्रवाह व आचार विशेष यांचे अत्यंत सूक्ष्म बुद्धीने व सत्यान्वेषक वृत्तीने त्यांनी प्रस्तुत चरित्रात विचारप्रवर्तक विश्लेषण केले आहे. बॅ. केशवरावजी यांच्या ध्येयनिष्ठ चारित्र्याबरोबरच भारताच्या व महाराष्ट्राच्या गेल्या शंभर वर्षांतील वैचारिक इतिहासाची ओझरती पण तत्त्वदर्शी ओळख करून देण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे. लेखकाचे मन:पूर्वक अभिनंदन करून हा परामर्श संपवितो.

-धुं.गो. विनोद

२० फेब्रुवारी १९५५,माघ वद्य चतुर्दशी,

‘महाशिवरात्री’, शके १८०६

ॐ ॐ ॐ

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search