पुस्तकाचे नाव: श्री आऊबाई चरित्र
लेखक: श्री दासगणू महाराज
भारतवर्षातील अग्रेसर तर्कशास्त्रज्ञ व तत्वज्ञ न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद, एम्.ए.यांचा पुरस्कार
(१)
श्री आऊबाईसाहेब जतकर यांचे चरित्र ही एक अद्भुतरम्य नवलकथा आहे. दारिद्र्य व वैभव, यौवन व तपस्या, भोग व विराग, कर्म व संन्यास, शौर्य व शालीनता, श्रद्धा व प्रज्ञा - अशा अनेक विषम द्वंद्वाचा समन्वय या नवलकथेत उपलब्ध होतो. श्री दासगणूंच्या प्रसन्न शब्दशलाकेने निर्मिलेले श्री आऊबाईसाहेब हे पुरस्कृत शब्दचित्र तर इतके सहजसुगम, रंजक व उठावदार झाले आहे की, त्याचे रंगलालित्य कालाच्या कराल करालाही पुसवणार नाही! विशेषत: त्यांनी केलेले बाबाजीरावाच्या वाढदिवस-प्रसंगाचे वर्णन तर फारच बहारीचे आहे. कलम, तलवार, तराजू व सारंगी- ही चातुर्वण्याची प्रतीके व त्याचे गुणदोष श्री दासगणूंनी मार्मिकपणे वर्णिले आहेत. वाढदिवसाच्या समारंभाचा प्रसंग हे मात्र कवीच्या कल्पकतेचे बाळसेदार अपत्य आहे! श्री आऊसाहेबांच्या आयुष्यातील इतर सर्व घटना ऐतिहासिक असल्याविषयी प्रत्यक्ष प्रमाणे मिळतात.