पुस्तकाचे नाव: श्रीचौंडेमहाराज यांचे चरित्र (खंड १ - ५)
लेखक: श्री. अनंत रामदासी (गिरडमर्षाधपति), श्री.धेनुदास डोळे (कार्याध्यक्ष - गोवर्धनसंस्था)
प्रस्तावना: सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद, एम्.ए.यांचा तात्त्विक पुरस्कार
सामुदायिक जीवनाशी समरस होणे म्हणजे समष्टिनिष्ठा. मानवी व्यक्तित्वाचा विकास समष्टिनिष्ठा जीवनानेच होत असतो. हृदयस्थाच्या दर्शनाकरिता, परमेष्टीच्या केंद्रावर अधिष्ठित होण्यासाठी, व्यष्टीला समष्टीच्या परिघाची केंद्रावर अधिष्ठित होण्यासाठी, व्यष्टीला समष्टीच्या परिघाची प्रदक्षिणा करावी लागते. समष्टिनिष्ठेची वृद्धी हा मानवी व्यक्तित्वाचा आंतर विकास, ज्ञान-कर्मेंद्रियांचा, स्मृतिबुद्ध्यादिविशेषांचा प्रकर्ष हा मानवी व्यक्तित्वाचा बाह्य फुलोरा. आंतर विकासाशिवाय, समष्टिनिष्ठेच्या प्रकर्षाशिवाय, बाह्य फुलोरा उपलब्ध होत नाही, पण बाह्य फुलोर्याशिवाय आंतर विकास शक्य असतो. बाह्य विकास आंतर विकासाला उपकारक असला तरी आवश्यक नाही म्हणून, बाह्य फुलोर्याचा अभाव असताना देखील अनेक श्रेष्ठ विभूति केवळ समष्टिनिष्ठेच्या आंतर विकासाच्या जोरावर अलौकिक कार्य करू शकतात. आंतर विकसनाच्या एका उच्च अवस्थेत, मानवी व्यक्तित्व, विश्वाच्या परमेष्टिरुप प्रेरक व प्रकाशक शक्तींशी, परंज्योतीशी संबद्ध होते. “परंज्योतिरुपसंपद्य स्वेन रुपेण अभिनिष्पद्यते ।।” - (अद्वैतसिद्धी: व्यावहारिक भेद परत्वोपपत्तौ अवतरणम् तद्भाष्यंच।) या संबद्धतेत, संस्पर्शात, त्या व्यक्ति-व्यक्तीत्वामध्ये जेव्हा हे नवजीवन अवतरते, तेव्हा व तदुत्तर, ती व्यक्ती परमेष्टितत्त्वाचे साधन म्हणून, यदृच्छेच्या आविष्कृतीचे उपकरण म्हणून, आपले जीवन कंठू लागते. अहंकर्तृबुद्धीचा निरास, मर्यादित व्यक्तित्वाचा विसर हे पुनर्जीवनाचे - द्विजत्वाचे, ब्राह्मण्याचे व्यवच्छेदक लक्षण. ‘निवेदन’ (Dedication) हा, या साम्यसंस्थित जीवनाचा दीक्षाविधी. श्रीचौंडेमहाराज यांचे जीवन ‘निवेदित’ आहे. रामनामाचा आलंब घेऊन मागा आलेले कार्य (तुकाराम) ते निरहंकारवृत्तीने करीत असतात. “जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त” (ज्ञानेश्वर), असेल ते ते कार्य, “गुणागुणेषु वर्तंत इति” भूमिकेवरून करणे हे त्यांच्या ‘निवेदित’ जीवनाचे ध्येय. या प्रवृत्तिधर्माच्या, राष्ट्रीय कर्मयोगाच्या सिद्धीकरीताच केवळ इंद्रियग्रामाचे रक्षण, ‘गो’रक्षण करावयाचे व देहभावाची जागृति बळेच ठेवावयाची. त्यांच्या तत्त्वनिष्ठेचे स्वरूप असे - गोवंश हे राष्ट्रपुरुषाचे श्रेष्ठतम कर्मेंद्रिय आहे - या इंद्रियाची संरक्षा व परिपोष राष्ट्रपुरुषाच्या निरामयतेस, स्वास्थ्यास अतीव आवश्यक आहे, म्हणून त्या अवसरप्राप्त ध्येयाची उपासना, स्वत:स परमेष्टीचे उपकरण समजून करावयाची. कारण ‘राष्ट्रोद्धारका’च्या अभिनिविष्ट भूमिकेवरून झालेले परमोच्च देशकार्यदेखील समष्टिसेवा किंवा परमेष्टिपूजा होत नाही - उज्ज्वल समष्टिनिष्टेने परमेष्टीशी संतुष्ट झालेल्या ‘निवेदित’ जीवनाच्या प्रकट कार्यापेक्षा व प्रत्यक्ष परिणामांपेक्षा त्या जीवनाचे अदृष्ट अधिष्ठान अधिक महत्त्वाचे असते, त्या जीवनाचा अलक्षित पार्श्व अधिक अर्थदायी असतो. श्रीचौंडेमहाराज यांनी आपल्या निवेदित चारित्र्यात - शेकडो गोशाळा स्थापिल्या; समष्टि देवतेपुढे कीर्तनरूप बोटवातीचे लक्ष वाहिले; कोट्यवधी नामसंख्येचे जपयज्ञ उरकले; आसेतुहिमाचल गोब्राह्मण्याचा आधुनिक व राष्ट्रोपकारक पद्धतीने प्रचार केला; पण या प्रचंड राष्ट्रकार्याच्या सभामंडपांतून, त्यांच्या व्यक्तित्वाच्या गर्भागारात गेल्यावर तेथील जागत्या परमेष्टितत्त्वाच्या परिसरात निवातस्थ तेवत असलेला, त्यांच्या समष्टिनिष्ठ स्थितप्रज्ञ वृत्तीचा नंदादीप, जेव्हा दिसू लागतो, तेव्हा त्यांच्या स्वत:च्या तत्त्वज्ञानाचे व आचारशास्त्राचे मूलस्वरूप स्पष्ट लक्षात येते. त्यांचा क्रियायोग निरहंकार व निर्मल वृत्तीचा आहे; त्या क्रियायोगाचा पार्श्व, निवेदन व परमेष्टिपूजन हा आहे. श्रुतिवाक्याच्या अवतरणाने हा विनम्र पुरस्कार संपवितो. आत्मक्रीड आत्मरति: क्रियावान। एष ब्रह्मदिवान् वरिष्ठ:।।
- धुं. गो. विनोद
ता. २९-११-३७ ६२९,
शनिवार, पुणे २.
ॐ ॐ ॐ