पुस्तकाचे नाव: श्री मौनी-चरित्रामृत
अनुवादक: श्री.रामदत्त देशपांडे
प्रस्तावना: भारतवर्षांतील विद्वन्मान्य कवि-तत्त्वज्ञ न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद, एम्.ए. यांचा तात्त्विक पुरस्कार
अंतर्मुख जीवन अंधश्रद्धेचे अपत्य नसून परिणत आणि प्रफुल्ल प्रज्ञेचे ते क्रमप्राप्त फलित आहे. सत्पुरुषांच्या स्थितप्रज्ञेत विचारणा, वासना आणि भावना यांचा त्रिवेणीसंगम सहजसिद्ध असतो. मौन हे निष्क्रियतेचे किंवा प्रतिकार्य (Passive) अवस्थेचे गमक नव्हे; ‘परमगती’ने व परम अर्थाने रसरसलेले असे सहजावस्थेतील ऊर्जस्वल चैतन्यचेष्ठित म्हणजे मौन. पराभूमिकेवरील ज्योतिर्मयी वाणीच्या स्फुल्लिंगप्रवाहाचा धारावाही साक्षात्कार अनुभविणे ही मुनींची मौनसाधना होय. ‘मैत्री’ उपनिषदात वर्णिल्याप्रमाणे ही अशब्दसाधना इतर सर्व प्रकारच्या नाद-साधनेपेक्षा श्रेष्ठतर आहे. श्री मौनीमहाराज हे अध्यात्मानुभूतीच्या उत्कट कोटीवर अधिष्ठित झालेले सत्पुरुष होते.
‘जे जे जाणितले! ते ते निरसिले। निरसोनी ठरले । ज्ञान ते तू’
- प्रमाता, प्रमाण व प्रमेय या त्रिपुटीच्या निरासावस्थेत त्यांची वृत्ति स्थिरमूल झाली होती.
‘चित्सुखी’त सांगितल्याप्रमाणे आत्मतत्त्वाचा साक्षित्वनिर्देश हा देखील जीवभाव व जगद्भाव यांच्या साक्षिभास्यत्वामुळेच उपस्थित होतो.
‘जड वर्गाचे तुजला ज्ञान।
म्हणोनि साक्षी हे अभिधान।
दृश्य निरासी साक्षीपण।
विरे तुझेचि तुजमाजी,’ त्याचप्रमाणे ‘दृश्यापेक्षा हे द्रष्टत्व, साक्ष्यापेक्षा हे साक्षित्व’, असल्या ‘कूटस्थाच्या कूटांचा’ मौनीमहाराजांच्या तात्त्विक लेखनात जागोजाग आढळ होतो.
यावरून त्यांच्या वाग्देवतेचे सिंहासन समाधिभावाच्या गर्भागारात सुसंस्थित झाले होते हे स्पष्ट आहे.
ह.भ.प. रामदत्तबुवा देशपांडे यांनी आपल्या प्राकृत नवनेपथ्यात नटविलेली, त्यांच्या पूज्यपाद पितामहांनी स्वत:च्या सुसंस्कृत व सालंकृत मानसमंदिरात प्रथमत: प्राणप्रतिष्ठेलेली व ह.भ.प. लक्ष्मणरावजी पांगारकर यांच्या भक्तिवत्सल शब्दहस्तांनी महाराष्ट्रीय जनतेच्या अंकावर निक्षेपिलेली, तीर्थनिर्विशेष मौनी मुनींची ही चरित्रमूर्ती माझ्याप्रमाणेच, सर्व जिज्ञासू-मुमुक्षूंना संग्राह्य, आदरणीय व वंद्य वाटेल यात शंका नाही.
- धुं. गो. विनोद
ॐ ॐ ॐ