प्रस्तावना

पुरूषसूक्त-प्रणीत समाज-शासन-शास्त्र

पुस्तकाचे नाव: पुरूषसूक्त-प्रणीत समाज-शासन-शास्त्र

लेखक: डॉ. आ. कृ. भागवत

श्री जगद्गुरू न्यायरत्न डॉ. धुं. गो. विनोद यांचा आशीर्वाद

    ‘आहारशुद्धौ सत्वशुद्धि:।’, हे भगवान सनत्कुमारांचे सूत्र, आत्मशोधन प्रक्रियेचा अधिष्ठानभूत सिद्धांत आहे. सत्व-शुद्धी म्हणजे आत्मशुद्धी. आत्मशुद्धी करावयाची तर प्रथम आहाराची शुद्धी करावयास हवी.     आत्मशुद्धी म्हणजे शरीर-शुद्धी, अंत:करण शुद्धी व परिणामत: जीवात्म तत्वाची शुद्धी होय.     शुद्धी म्हणजे काय?     ‘नैर्मल्यसम्पादनम्’ ही धर्मशास्त्रातली व्याख्या प्रसिद्धच आहे.     शुद्धी शब्दाचा न्यायदर्शनातला अर्थतदितरधर्म ‘आनाक्रान्तत्वम्।’ असा आहे. तदितर धर्मामुळे जे आक्रमित झाले नाही ते शुद्ध. ज्या वस्तूत दुसर्‍या वस्तूंचे गुणधर्म प्राप्त झाले नाहीत ती वस्तु शुद्ध होय. उदाहरणार्थ दुधात पाणी घातले नाही तर ते शुद्ध. दुधात पाणी घातल्याने जसे दूध अशुद्ध होते, तसेच पाण्यात दूध घातल्याने पाणीही अशुद्ध होते. प्रत्येक वस्तूच्या सहजसिद्ध गुणांत दुसर्‍या आगंतुक गुणांची भेसळ झाली की ती वस्तु अशुद्ध होते. शरीरात विजातीय द्रव्ये गेली की ते शरीर अशुद्ध, दोष-दुष्ट, त्रिदोष दुष्ट मलसंयुक्त होते. राग म्हणजे शरीराची अशुद्धी किंवा मल. नुसते शरीर शुद्ध केल्याने सत्व-शुद्धी होईल.     पातंजलयोगशास्त्रात सत्व शब्दाचा ‘चित्त’ असा अर्थ आहे.     ‘सत्वे तप्यमाने तत्सक्रान्त: पुरूषोऽपि तप्यते।’ - (पातंजलभाष्य)

    उपनिषत्कारांनी सत्व शब्दाचा अर्थ ‘प्राण’ असा केला आहे.     आहार-शुद्धीने सत्वाची, म्हणजे चित्ताची (योगशास्त्र) व प्राणांचीही (उपनिषद्कार) शुद्धी होते.     मानवी जीवनाची शांतिनिष्ठ अशी पुनर्रचना केली पाहिजे, तरच युद्धनिर्मू्लन होईल व विश्वशांती अवतरेल. या पुनर्रचनेत पहिले पाऊल आहार शुद्धी हे होय. कारण मनाचे व प्राणांचे शोधन, शुद्ध आहाराशिवाय सर्वथैव अशक्य आहे.     छान्दोग्य उपनिषदात, ‘मन अन्नमय आहे’ असे स्पष्ट म्हटले आहे.     ‘अन्नमय हि सोम्य, मन:।’ - (छांदोग्य ६-५-४)

    छांदोग्यांत एक मार्मिक कथा आहे.

    श्वेतकेतूला आरूणि उद्दालक, अन्न व मन याचा संबंध, विशद करून सांगत आहे, “अन्न अशितं त्रेधा विधीयते। तस्य य: स्थविष्ठो धातु: तसुरीषं भवति। यो मध्यम: तन्मांसं। य: अणिष्ठ: तन्मन:।” - “अन्न खाल्ले की, त्याचे तीन विभाग होतात, त्यातला जो अत्यंत स्थूल भाग त्याची विष्ठा होते, जो मध्यम भाग त्याचे मांस होते, व जो अत्यंत सूक्ष्म भाग त्याचे मन होते.”     श्वेतकेतूला हे समजेना. अन्न स्थूल व दृश्य; मन सूक्ष्म व अदृश्य; अन्नापासून मन कसे होणार? म्हणून तो उद्दालकांना म्हणाला, “भूय: एवं मा भगवान विज्ञापयतु।” - “भगवन, मला पुनश्च एकदा नीट समजावून सांगा.”     उद्दालक म्हणाले, “हे सोम्य, दही घुसळले की वर लोणी येते, त्याप्रमाणे अन्नाचे पचन होऊन शेवटी जो अणिमा, म्हणजे सूक्ष्म्रतम अंश येतो तेच मन होय.”     तरीही श्वेतकेतूला बोध होईना. मग, उद्दालक म्हणाले, “तू पंधरा दिवस अन्न न खाता नुसत्या पाण्यावर राहा.”     त्याप्रमाणे उपोषण करून श्वेतकेतू परत उद्दालकांकडे आला. उद्दालक म्हणाले, “आता तू ऋचा, यजु्र्वेद व सामगीते म्हण.”     श्वेतकेतूला काहीही आठवेना. “न वै मा प्रतिभान्ति भो।- मला त्यांचे स्मरण होत नाही”, तो उद्गारला.     उद्दालक म्हणाले, “अशान अथ विज्ञास्यसि” - “तू थोडे खा म्हणजे सर्व तुझ्या लक्षात येईल.”     श्वेतकेतूने भोजन केले व गुरूजवळ येऊन उभा राहिला. नंतर “तं ह यत्कि व प्रपच्छ सर्व ह प्रतिपदे” - गुरूजींनी त्याला जे जे विचारले ते ते सर्व त्याने अचूक म्हणून दाख्रविले.     तेव्हा उद्दालक उद्गारले, “खद्योतमात्र - काजव्याएवढा - परिशिष्ट असलेला अग्नी जसा गवत, लाकडे इत्यादींनी प्रज्वलित होतो, त्याप्रमाणे अन्न खाल्ल्याबरोबर तुझे मन उत्तेजित झाले.” या प्रयोगामुळे श्वेतकेतूचे पूर्ण समाधान झाले. मन अन्नमय आहे. हा सिद्धांत त्याला पटला.     ‘अन्नं ब्रह्म इति व्यजानात्’ - अन्न हेच ब्रह्म होय असेही तैत्तरीय उपनिषदांत म्हटले आहे.     वरील गोष्टीचा उल्लेख अन्नाचे सर्वंकष महत्त्व निसंदेहत: सिद्ध करतो. व्यक्ति-जीवन हेच राष्ट्रीय व जागतिक जीवनाचे आधारकेंद्र होय. व्यक्तिमात्राच्या बुद्धीत व मनोरचनेत क्रांती झाली पाहिजे.     मानवाचे मन व बुदधी बदलणे, हे त्याच्या अन्नात बदल केल्यानेच सुशक्य होईल. किंबहुना, दुसरा मार्गच उपलब्ध नाही.     डॉ. आ. कृ. भागवत यांनी आपले सर्व जीवन पूर्णान्न-योगाला वाहून घेतले आहे. पूर्णान्न-योग हा सर्व योगांचा पाया आहे. ज्ञान-कर्म-भक्ति-राज-योग हे पूर्णान्न खाल्ल्यानेच सिद्ध होऊ शकतील.     औंधचे स्वातंत्र्य-संस्थापक महाराज बाळासाहेब पंत यांनी डॉ. भागवतांचा मला प्रथम परिचय करून दिला होता. गेली वीस वर्षे मी आत्मारामाला ओळ्खत आहे. त्यांचे जीवन सेवामय, त्यागमय व प्रेममय आहे. देवी दरिद्रता हे त्यांचे आराध्य दैवत आहे.     सेंट फ्रॅन्सिस असिसि म्हणे की, “लेडी पॉव्हर्टी, श्रीमंत सौभाग्यवती दरिद्रता ही माझी प्रेयसी आहे. तिच्या कृपेशिवाय माझी व मानवसमाजाची आध्यात्मिक प्रगति होणार नाही.”     डॉ. भागवतांनी देवी दरिद्रतेबरोबर आपला सुखाचा संसार गेली पन्नास वर्षे केला आहे. महात्माजी व विनोबा यांचे जीवन व तत्त्वज्ञान डॉ. भागवतांनी आत्मसात केले आहे. प्रस्तुत ग्रंथात त्यांनी आपल्या समाजशास्त्र विषयक सिद्धांताची मांडणी मोठ्या चिकित्सक व स्वतंत्र दृष्टीने केली आहे. त्यांची विचारसरणी पुरुषसू्क्ताच्या वैदिक वेदीवर आधारली असल्यामुळे ती सनातन सत्यांचा स्वरूपाविष्कार करीत आहे.     सर्वोदय आंदोलनाचे उद्दिष्ट विश्वमानवाला विश्वेदेव करण्याचे आहे. सर्व मानवांना सर्वेश्वर करण्याचे आहे. दानवाचा मानव करणे, मानवाचा महादेव करणे, ही स्वरूपांतर प्रक्रिया एकाच तत्त्वावर अधिष्ठित आहे - ते तत्त्व म्हणजे मनोबीजाची शुद्धि.     मनोबीज हे दानव्य, मानव्य व दैव्य याचा कारण देह आहे आणि मनोबीज? अन्नमयं हि सोम्य, मन:। मनोबीज अन्नमय आहे.     अन्नपालट हे हृदयपालट करण्याचे पहिले उपकरण आहे. सर्वोदय सर्वांचा हृदयपालट करू पहात आहे. सर्वाचा अन्नपालट प्रथम करणे हे सर्वादय आन्दोलनाचे क्रमप्राप्त व स्वांगभूत विधान आहे.     विनोबांच्या व्यास-विशाल प्रतिभेला प्रत्येक अन्वयात्मक क्रिया सहजच आकर्षक वाटते. त्यांची संग्रहशक्ती खरोखरीच सर्वव्यापक आहे. कोठल्याही सत्प्रवृत्तीचा अंतर्भाव सर्वोदयांत स्वयंसिद्धतेने व सह्जतेने होऊ शकतो. पूर्णान्न योग हा सर्वोदयात अंतर्भूत आहेच. डॉ. भागवत पूर्णान्न योगाच्याद्वारे, जे सर्वांच्या समुदयाचे मह्त्कार्य करीत आहेत, त्यामुळे सर्वोदय आंदोलनातले त्यांचे स्थान स्थिर झाले आहे.     त्यांच्या विश्वप्रयत्नांना आदिनाथाचे उदंड आशीर्वाद लाभावे अशी प्रार्थना करून हे चार शब्द संपवितो.

- धुं. गो. विनोद

ॐ ॐ ॐ

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search