(१)
भारतीय यज्ञसंस्थेचा रहस्यार्थ विशद करणार्या, ऐतरेय ब्राह्मणाचें यथासांग संशोधन, भारत भूमीतच होऊ शकेल असे प्रोफेसर मॅक्समु्ल्लर म्हणतात. वैदिक यज्ञसंस्थेची अंगोपांगे इतकी जटिल आहेत की आर्य परंपरेत परिणत झालेल्या भारतीय अभ्यासकालाच त्यांचा योग्य उकल होईल. परकीय संस्कृतीत वाढलेल्या पंडितास यज्ञविधीतील मर्मस्थाने समजणे सर्वथैव अशक्य आहे. मातृभूमीच्या नि:सीम कृपेमुळे एका ऋषिपुत्राला लाभलेले यज्ञशास्त्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण होय.
सती इतरा नामक विदुषी व तिचा पुत्र ऐतरेय महिदास यांनी भारतभू्देवीची उत्कटतेने प्रार्थना करून हे महान् यज्ञदर्शन प्राप्त करून घेतले असे वेदभाष्यकार सायणाचार्य सांगतात. मातृभूमीच्या अर्थात मातृसंस्कृतीच्या निष्ठावंत उपासकाला विमुक्तिदायक विद्येचा लाभ होत असतो - सा विद्या या विमुक्तये। ऐतरेय ब्राह्मणाचा भाष्यकार, भारतीय मातृसंस्कृतीचा अभिमानी अभ्यासक असणे युक्त आहे. श्रौताचार्य धुंडिराजशास्त्री बापट यांचे आंतरजीवन शैशवास्थेपासून श्रुतिमाऊलीच्या अंकावर खिळून, खेळून राहिले आहे. यज्ञ संस्कृतीविषयी आदरवृत्ती हे भरत खंडाच्या भविष्य भाग्यश्रीचे प्रवेशद्वार होय अशा त्यांची दृढ धारणा आहे. ऎतरेय ब्राह्मणाचे मराठी भाषांतर करण्यास अवतरलेला महिदासाचा जणू काय महाराष्ट्रीय अंशावतार म्हणजे श्रौताचार्य बापट. ‘स्वाध्याय’ या वैदिक विषयास वाहिलेल्या मासिकांचे संपादन त्यांनी दोन वर्षे केले. शुक्ल यजुर्वेदाचे सान्वय मराठी भाषांतर त्यांनी केले असून औंधचे राजेसाहेब श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्यासारख्या राजर्षीने ते प्रकाशित केले आहे. अशा रीतीने श्रुतिसृष्टीत दीर्घकाल रमलेल्या एका दीक्षित वेदोपासकाच्या स्तुत्य कृतीचा पुरस्कार करताना कोणालाही धन्यताच वाटेल.
- धुं.गो.विनोद
--------------------
पुस्तकाचं नाव: ऐतरेय ब्राह्मण भाषांतर
लेखक : श्रौताचार्य धुंडिराजशास्त्री बापट
प्रस्तावना : न्यायरत्न प्रो. धुं. गो. विनोद
------------------------------------