प्रस्तावना

याज्ञवल्क्य: आत्मतत्व व समन्वयशास्त्र यांचे संशोधक

    ‘याज्ञवल्क्य’ हे भारतीय तत्त्वज्ञानाचे ‘पितृ-तीर्थ’ आहे. ‘अहं ब्रह्मास्मि’ या वैदिक महावाक्याचे द्रष्टे, शुक्ल युजर्वेदाचे व शतपथ ब्राह्मणाचे प्रणेते आणि यज्ञसंस्थेचे संशोधक याज्ञवल्क्य, यांच्या तत्त्व-स्थण्डिलावर भारतीय वैदिक संस्कृति सु-स्थिरलेली आहे.    

याज्ञवल्क्यांच्या तत्त्वशास्त्रातला मेरुमणि म्हणजे आत्मतत्व.     आ

त्मतत्वाचे संशोधक म्हणूनच त्यांना भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अग्रस्थान आहे. अर्थात त्यांच्यापूर्वी ऋग्वेदकालीन द्रष्ट्यांनीही आत्मतत्वाचा साक्षात्कार, उच्चार, विचार व प्रचार केला आहे. परंतु याज्ञवल्क्यांनी आत्मतत्त्वाला तत्त्वशास्त्रीय संदर्भात प्रतिष्ठित केले.

    ‘अन्तर्यामी’ हे आत्मतत्वाचे स्वरूपत्व विशद करण्यात याज्ञवल्क्यांच्या प्रतिभेचे अलौकिकत्व आहे. आत्मतत्वाचा प्रत्यय कसा येतो? आत्मतत्वाची ओळख कशी करून घ्यावयाची? याज्ञवक्ल्य सांगतात की आत्मतत्व ही नेत्राचे नेत्र, श्रवणाचे श्रवण व मनाचे मनन करणारी आदिशक्ती आहे. सर्व इंद्रियांना आत्मतत्वामुळेच शक्ती उपलब्ध होत असते.    

‘अन्तर्यामी’ म्हणजे आंतराचे, आंतर-इंद्रियांचे, ज्ञानेंद्रियांचे नियमन करणारा आत्मा. आत्मतत्वाचे इतके सुबोध स्पष्टीकारक याज्ञवल्क्यांनीच प्रथम केले. - शतपथ (१४,६,७)

    मैत्रेयीला केलेल्या आत्मतत्वाच्या उपदेशात (बृहदारण्यक) आत्म्यासाठी-आत्मकामासाठी, पति-पत्नी परस्परांना प्रिय होतात असे म्हटले आहे. सामान्यत: याचा अर्थ, सर्व प्रेम स्वार्थपरायण आहे. असा केला जातो, परंतु याज्ञवल्क्यांचा आशय अधिक गंभीर व आधात्मशास्त्रातील संदर्भात समजावून घेतला पाहिजे.    

बृहदारण्यक उपनिषदांतील (अध्याय ४, ब्राह्मण ५) ‘आत्मनस्तु कामाय सर्वप्रियत्व’ या सुप्रसिद्ध पदांचा अर्थ पाहू या. आत्मतत्व हे विभु म्हणजे सर्वत्र एकत्वाने स्वयंसिद्ध असे तत्व असल्यामुळे आत्मतत्व धारकांचे सदेह जीवाचे एकमेकांसाठी साहजिक आकर्षण असते. असा ‘प्रियत्वाचा’ आध्यात्मिक अर्थ आहे. दोन व्यक्तींतले प्रेम म्हणजे खरोखर, त्यांच्यामध्ये असलेल्या आत्मरूप एकत्वाची साक्ष होय. दोनही देहात व जीवात एकच आत्मतत्व असते. म्हणून प्रेमाची शक्यता निर्माण होते.    

वित्तादि जड वस्तूंच्या ठिकाणी प्रेम असते म्हणून प्रेमाची शक्यता निर्माण होते. वित्तादि जड वस्तूंच्या ठिकाणी प्रेम असते. त्याचे कारणही हे ‘विभु’ आत्मतत्व होय. ‘प्रियत्व हा आत्म्याच्या एकत्वप्रतीतीचा आविर्भाव आहे’, असे सांगणारे आद्य श्रीशंकराचार्य हे याज्ञवल्क्यांच्या या तात्त्विक भूमिकेचाच आधार घेत असावेत. प्रेम व आत्मा यांचा अर्थान्वय विशद करणारे, त्यांचा जन्यजनक संबंध डोळविणारे याज्ञवल्क्य हे आद्य द्रष्टे आहेत. आदित्य, चंद्र व अग्नी अस्तमित झाले, तरीही पुरुषाला आत्मज्योति उपलब्ध असते, असे याज्ञवल्क्य प्रतिपादतात. (बृहदारण्यक अ.५ द्वा. ३ मं.२६)    

आत्मा हे सर्व तेजांचे अधिष्ठान सर्व व्यक्तींचे, जातींचे व अस्तिमात्राचे मूलाधार तत्त्व आहे. हा त्यांचा सिद्धांत अत्यंत सु-सूक्ष्म व इतका विशालतम व्याप्तीचा आहे की त्याला अव्याप्ति व अतिव्याप्ति हे प्रकार कुठेही व केव्हाही संभवतच नाहीत. सर्वत: सिद्ध असे हे महासत्य आहे.    

समन्वय प्रक्रिया:    

‘तत्तु समन्वयात्।’ हे ब्रह्मसूत्र लिहून बादरायणांनी समन्वय-प्रक्रियेची शास्त्रीय उप-योजना केली. श्रीशंकराचार्यांच्या शारीरिक भाष्यांतल्या चतु:सूत्रीतले हे चवथे कलश सूत्र होय. पण आचार्यांच्याही पूर्वी समन्वय प्रक्रियेचे प्रतिष्ठापक म्हणून याज्ञवल्क्यांचे नाव घ्यावे लागेल.    

प्रमाण-भेद, अंश-भेद मान्य करूनही विविधतेत असलेली एकात्मता प्रकटविणे हे समन्वय प्रक्रियेचे लक्षण होय.    

बृहदारण्यकांचा (अ.४) जनकाने सुचविलेल्या सहा आध्यात्मिक उपपत्तींचा याज्ञवल्क्यांनी जो समन्वय सिद्धविला आहे, त्यावरून त्यांच्या अलौकिक समन्वयक प्रतिभेची कल्पना येते.    

प्रश्नोपनिषदातही पिप्पलाद महर्षींनी सहा मानसशास्त्रीय दृष्टीकोनाचा असाच समन्वय सिद्धविला आहे. पिप्पलाद हे याज्ञवल्क्यांचे भगिनीपुत्र व लाडके शिष्य होते. याज्ञवल्क्यांनी संस्थापिलेली ही समन्वय प्रक्रिया पुढे आद्य श्रीशंकराचार्यांनी अत्यंत यशस्वितेने व तेजस्वितेने नियोजिली आहे.

    प्रियत्व-प्रापक व ज्योतिस्वरूप अशा आत्मतत्वाचे आद्य द्रष्टे म्हणून श्री याज्ञवल्क्य हे जागतिक तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अमर आहेत. समन्वय-प्रक्रियेची प्रतिष्ठापना हे त्यांचे महत्कार्य दार्शनिक व वैज्ञानिक चिकित्सेला किती उपकारक ठरले आहे याची साक्ष श्रीशंकराचार्यांचे शारीरभाष्यच देत आहे.     असो, हा उद्‌बोधक ग्रंथ लिहून श्री. कोलंगडे यांनी उच्च वाङ्‌मयात फ़ार मौलिक भर घातली, म्हणून आम्ही त्यांचे सप्रेम अभिनंदन करतो.

----------------------------------------

पुस्तकाचे नाव - याज्ञवल्क्य: आत्मतत्व व समन्वयशास्त्र यांचे संशोधक

लेखकाचे नाव - श्री. कोलंगडे

-------------------------------------------

- धुं. गो. विनोद

पुणे,

दि. २४-४-१९६०

ॐ ॐ ॐ

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search