पुस्तकाचे नाव: ऋग्वेद दर्शन
लेखक: रा. गो. कोलंगडे. प्र
स्तावना: डॉ. धुंडिराज विनोद.
स्वस्तिवाचन:
वैदिक संस्कृतीचे व्युप्तन्न विवेचक श्री.रा.गो.कोलंगडे यांच्या ‘ऋग्वेददर्शन’ या अभिनव ग्रंथाचे स्वस्तिवाचन करताना मला आज विशेष समाधान होत आहे. या ग्रंथांत ऋग्वेदाचे अंतरंग विशद करून श्री.कोलंगडे यांना मानवी समाजाच्या व संस्कृतीच्या अतीत, अनागत व वर्तमानकालांचे एक स्थायी चित्र रेखाटले आहे.
तात्विक विचार:
‘ऋग्वेददर्शना’त मानवतेच्या पूर्वेतिहास कालही समाविष्ट आहे; इतकेच नव्हे तर विद्यमान वस्तुस्थितीची व आगामी ध्येय-युगाची यथार्थ रूपरेषा येथे सहजसिद्ध आहे. दाशराज्ञ युद्धाची परिस्थिती आजही उपस्थित आहे. मात्र आजचे युद्ध आर्य व अनार्य यांचेमध्ये नसून सर्व सर्व गोंधळ बहुसंख्यांक अनार्यामध्येच आहे. ‘आर्य’ या संज्ञेवर अधिकार असलेले मानवी समूह किंवा राष्ट्रे आजच्या जगात आहेत कोठे? आशास्थान हेच की, एखादा हुतात्मा, अनेक द्रष्टे, काही संत सत्पुरूष व त्यागैक वृत्तीचे हुतात्मे आजही आहेत. केवळ युद्धनिर्मलूनच नव्हे तर यथार्थ व स्थायी अशी विश्वशांती निर्माण करण्याची समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय प्रक्रिया या ऋग्वेददर्शनात आढळून येईल. मानवी विकासक्रमास आधारभूत असलेल्या सनातन सत्याचे आकलन व उपयोजन करणे हाच आजच्या आत्मविध्वंसक अणुयुगावरील प्रत्यक्ष प्रतिकाराचा एकमात्र मार्ग होय. ‘ऋग्वेददर्शन’ हे सर्वदर्शी व सर्वस्पर्शी आहे. मानव्याची भविष्यद्विकास, मानवी जीवनाची पूर्णता, मनुष्यमात्रांत सुप्त असलेल्या अतीद्रिंय शक्तींची परिणती इत्यादी ध्येयांच्या पूर्ततेसाठी लागणारी स्फूर्ति, गति व शक्ती ऋग्वेदाच्या अंतरंग अध्ययनानेच उपलब्ध होईल. श्रीयुत कोलंगडे यांचा प्रस्तुत ग्रंथ ऋग्वेदाच्या आंतररहस्यावरील मीमांसक पद्धतीने लिहिलेले सुलभ ‘सायणभाष्य’च होय. ऋग्वेदातील सुसूक्ष्म अंगोपांगांचे निर्वचन, निवेदन व निरूपण करण्यात शब्दसरस्वतीचा त्यांच्यावर झालेला प्रसाद त्यांच्या एकनिष्ठ व एकाग्र वेदोपासनेचे फलित होय. महाराष्ट्राने व महाभारताने त्यांच्या सोज्वळ व्यक्तिमत्त्वाचे आणि त्रयोदशगुणी ग्रंथ-सारस्वताचे, लक्ष्मीपूजन करावे, एवढीच प्रार्थना.
- धुं.गो. विनोद
पुणे
आषाढ शु. ।। १५, व्यासपौर्णिमा शके १८७६
ॐ ॐ ॐ