१४ डिसेंबर:
एकूण श्लोक: ८
संध्याकाळी ०५.०७
आतां दक्षिण आचार विवरूं।
अष्टस्वरींचा जो पंचम स्वरू।
भावपुष्पावरीचा दृश्य केसरू।
‘दक्षिण तत्त्व’ हें ।। ।।१।।
आदिबीज हें दक्षिणामूर्तीचें।
प्रथम आवर्तन `शं' स्फूर्तीचें।
पूर्णाहुति तर्पण संयुक्तिपूर्तीचें।
स्वभाव संकलनाचा पूर्णविराम ।। ।।२।।
‘दक्षिणेंत’ ग्रह-ग्रह कला आविर्भवे।
येथ पदवृत्ति अर्थवृत्तींत एकावे।
पदार्थाचें मूलस्वरूप स्वच्छावें।
भोगरूप त्यागीं ।। ।।३।।
संध्याकाळी ०५.३०
भोग हे नवयुगाचे धर्मतत्त्व।
योग म्हणजे समन्वयाचें अंत:स्वरूपत्व।
याग म्हणजे समृद्धलेलें व्यक्तिसत्त्व।
अर्थन्यासें पद ज्ञानें ।। ।।४।।
संध्याकाळी ०५.४५
भोग म्हणजे स्वरूपैक्याचा साक्षात्कार।
योग म्हणजे अंत:संगतीचा स्पष्टाविष्कार।
याग म्हणजे निरवस्थ भानाचा स्फुरत्कार।
वृत्ति बिंबांचा तिरोभाव ।। ।।५।।
इंद्रियें इंद्रियस्यार्थ अंतर्यामी।
भोगबिंदु हे स्फुरणले संयद् - वामीं।
त्यांचे योगप्रतियोग श्यामधामीं।
प्रवर्तले स्वरूपसत्तेनें ।। ।।६।।
भोग हा स्वरूपतेचा सहज धर्म ।
निग्रह मूढग्राह हा स्ववंचक संभ्रम।
वृत्तिप्रकटन हें महानुभवाचें वर्म।
संयद्वृत्ति अभिप्रेता! ।। ।।७।।
संध्याकाळी ०६.०८
प्रकर्षवा संयद् - वाम अनुभव।
ओळखा वृत्तिवृत्तींचें स्वभाव सौष्ठव।
साधा सूक्ष्मस्थूलगतींचा मेळव।
अनुभवा प्रीतिरसायन! ।। ।।८।।