मृत्तिकेचे ते झिरपणारे घट।
शब्दामागचे पालवणारे ओठ।
ब्रम्हजीवनाचे जणुं षोडशकाठ।
षोडश शक्ति त्या! ।। ।।२१।।
यात्रिकास दावा तुमच्या फाटल्या कथा।
तुमच्या आंतरीच्या यथार्थ व्यथा।
एकंकारा अनुभवीचा निर्गाठला - गुंता।
आणि त्याच्या झोळींत टाका! ।। ।।२२।।
पेठकरी यात्रिक हा अद्भुत।
घेऊनि लतक् रे देई महावस्त्र।
खड्या खड्यासि रत्नें मोजीत।
वाढलें भांडवल बेपाऱ्याचें ।। ।।२३।।
आंतर्व्यापार बढत चालला।
उतरता भाव मागणी - मालाला।
लाभविशेष किरकोळ ग्राहकाला।
व्यक्तित्त्व हेंचि व्यापार केंद्र ।। ।।२४।।
घाउकी, न त्याचा व्यवहार।
रोकडा न कधीं, सर्वदा उधार।
क्रेता तो जो, मूल्य जाणणार।
मूल्य ग्रह अनवश्यक।। ।।२५।।
यथार्थ करा हिऱ्यांची पारख।
आणि ते घेऊनी चला बेशक।
आनंदवी यदि या रत्नमण्यांची झाक।
हसा! आणि घेऊनी जा! ।। ।।२६।।
सुखेनैव ल्या एक एक अलंकार।
यथाशक्ति चालवा ‘श्रेष्ठीचा’ या व्यापार।
याचक जे डोळस, त्यांस हा रत्न संभार।
बळें बळेंच द्या! ।। ।।२७।।
येथ न मागत्या पहिला आहेर।
येथ शिलोदरीं पहिली बीजपेर।
येथ सजावटलें मायेचें माहेर।
विमुखल्या विरोधकांसी।। ।।२८।।
पळत्या पायांस येथें थांबवा।
पाठिमोरल्या वावदूकास शांतवा।
हिर्मुसल्या विद्वद्व्याह्यांस लोडाशी बैसवा।
मूढ मानकरी हे भोपळयाचे! ।। ।।२९।।
स्कंधीं घेऊनी रिकामे भोपळें।
मिरवती हे लाकडी ठोकळे।
निष्प्रज्ञ ते वृषभ मोकळे।
बोकाळले इतस्तत: ।। ।।३०।।