पात्रान्न वोपूं अतिथीचे मुखी।
‘समानाश्रू’ होऊं अश्रुलांचे शोकीं।
स्वर्गमार्ग देखूं जेथ पतित पातकी।
तिष्ठले कर्मविपाकें! ।। ।।११।।
न व्हा वैभव कर्दमींचे किडे।
न मिरवा नटलेले फाकडे।
क्षण सफेतलेले अजाण बापडे।
खलनायक शोकांती! ।। ।।१२।।
नाट्यांत नका देखू वस्तुता।
राजकीयांत नका मानू सत्ता।
लौकिकांत केउती परमार्थता!।
“ ‘लोकविरूद्धं’ तदेव शुद्धम्”! ।। ।।१३।।
दिगंबर आम्ही महावस्त्रांकित।
अकिंचन आम्ही सर्व श्रियालंकृत।
कारटे आम्ही श्रीवंश परंपरागत।
“ ‘लोकविरूद्धं’ तदेव सत्यम्”! ।। ।।१४।।
आमुचा निखारा पल्लववील वठेल वृक्ष।
आमुचा वेध स्फुटवीन उत्थान पंख।
आमुची कुऱ्हाड सावरील मोडता मंचक।
“ ‘लोकविरूद्धं’ तदेव शुद्धम्”!।। ।।१५।।
जेथ जेथ दिसेल उन्मत्त सत्ता।
तेथ तेथ वावरे ठेचाळणारी लत्ता।
महावस्त्र आमुचें दारिद्र्य कंथा।
“ ‘लोकविरूद्धं’ तदेव शुभम्”!! ।। ।।१६।।
‘निरक्षर’ आम्ही लीलया ठेचणार।
विद्वत्प्रतिष्ठेचे फुगलेले आकार।
पढत गर्दभांचा शास्त्र संभार।
लाथाळूनि देऊ! ।। ।।१७।।
थोरा थोरा शास्त्रज्ञांचा संमर्द।
मोठ्या मोठ्या मनन मूर्खांचा संवाद।
मर्कटलेल्या शब्दगोंधळयांचा उन्माद।
वमन वत् त्याज्य आम्हा! ।। ।।१८।।
आम्ही चाखू जीवनाचे सहजकल्लोळ।
आम्ही बोलूं महानुभूतीचे ज्वलंत बोल।
आम्ही प्रगतवू फुलल्या चिद्भानाचा हिंदोल।
नव बालक मी - आम्ही! ।। ।।१९।।
मत्स्य मी महाजीवनीं मिळलेला।
अवधूत मी आदिवंशीं कुळलेला।
मी श्री वृक्ष शीर्षीं फळलेला।
तीर्थ देह प्रकाशक! ।। ।।२०।।