कुंडलिनी शक्ती
नागिणीचे पिले कुंकुमे नाहले। वळण घेऊनी आले सेजे जैसे।
तैसी हे कुंडलिनी मोटकी औटवळणी। अधोमुख सर्पिणी निदेली असे॥
ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा। जया विश्वबीजाचिया कोंभा माउली केली।
ते शून्यलिंगाची पिंडी जे परमात्मया शिवाची करंडी। जे प्रणवाची उघडी जन्मभूमि॥
- ज्ञानेश्वरी (६/२२२-२७३)
कुंडलिनीला पर्यायी शब्द: चित्शक्ती, पराशक्ती, शब्दब्रह्मामिका स्फूर्ती, सरस्वती, महामाया, महादेवी, महालक्ष्मी
वर्ण: कोटी विजेप्रमाणे तेजस्वी
आकार: कमलाच्या तंतूप्रमाणे सूक्ष्म, कुंडलाप्रमाणे, साडे तीन वेटोळे
लक्षणार्थ: प्रणवाच्या साडे तीन मात्रा अ, ऊ. म , ँ
अवस्था: सुप्त (निजलेली)
श्रीमदशंकराचार्य - ‘प्रकृतिः निश्चला परावात्रूपिणी परप्रणवात्मिका कुण्डलिनी शक्ति’ - ‘प्रकृती ही अत्यंत निश्चल आहे. परावाणी हे तिचे स्वरूप आहे. ही प्रकृती ओंकारमंत्राशी एकरूप झालेली कुंडलिनी शक्ती आहे.’
ती सर्व वृत्तींचे बीज आहे.
ती वायवी म्हणजे प्राणशक्ती आहे (रूद्रयामलतंत्र). म्हणजे जीवाची जीवनीशक्ती आहे.
या शक्तीपासून ‘अ’ कारापासून ‘क्ष’ कारापर्यंत सर्व अक्षरांची आणि अक्षरयुक्त मंत्रांची शक्तीसह उत्पत्ती होत असते.
ती सामानी आहे - सर्वांना साधारण असलेली आहे.
चैतन्य मूलाधारात परिच्छिन्न व परिमित होऊन रहाते.
भूततन्मात्रांच्या योगाने कुंडलिनीचा उदय होतो.
कुंडलिनी ही नित्यानंद स्वरूपाची परमप्रकृति आहे.
तिला दोन तोंडे आहेत - अंतर्मुख व बहिर्मुख
ती एका मुखाने ब्रह्मद्वार (सुषुम्ना नाडीचे मुख) अडवून निद्रा घेते. - महानारायणोपनिषद
दुसर्या मुखाने ती नेहमी जागृत असते. ती या मुखाने श्वास-प्रश्वास करते.
या जागृतीमुळे जीवाला बाह्यज्ञान होते. जीवाला एकत्वाची जाणीव न होता भिन्नतेची जाणीव होते.