अज्ञानाचे कारण:
आत्म्याने आपल्या इच्छेने जो आत्मसंकोच केला त्यालाच मूळ अज्ञान म्हणतात. अज्ञानाच्या प्रभावाने आत्म्याला मायेच्या अधीन होऊन देह धारण करणे भाग पडते. कुंडलिनी शक्तीचे अंतर्मुख, सुप्त अथबा बध्द असल्यामुळे, जीवाला खरोखरीच आपण कोण आहोत ते कळत नाही. त्याच्या ठिकाणी अंतर्ज्ञान किंवा आत्मज्ञान वा ब्रह्मज्ञान याचा अभाव असतो. लीला करण्याच्या बहाण्याने आत्मा स्वेच्छेने आपल्याला संकुचित करतॊ. त्यामुळे त्याचे सर्व स्वाभाविक धर्म संकुचित होतात. परिच्छिन्न शक्तीमुळे क्षुद्र झालेला आत्मा मायेच्या अधीन होऊन आपणच कर्ता आहोत असे मानू लागतो. तो कर्म जंगलामध्ये प्रवेश करतो. कर्म करणे व केलेल्या कर्माची फळे भोगणे या दोन व्यापारात गुंतून जाऊन एका योनीतून दुसर्या योनीत जाऊन भिन्न भिन्न शरीरे धारण करून भटकत रहातो. शाब्दिक ज्ञानाने शाब्दिक अज्ञान नष्ट होते हे खरे आहे पण त्यामुळे मूळ अज्ञान नष्ट होत नाही. त्या अज्ञानाची निवृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आत्म्याचा नैसर्गिक असा शिवस्वरूप धर्म प्रकट होत नाही. शिव शवरूप होऊन निष्क्रिय अवस्थेत असतो. या स्थितीत मिथ्या गोष्टींचे अवडंबर माजते. मायेचे तीव्र प्रलोभन असते व विचित्र अशा प्रपंचाची मोहिनीशक्ती सतत प्रकट होत राहते.