महर्षींची उन्मनी अवस्था:
१९८३ सालानंतर शांतिमंदिरमध्ये जुनी कागदपत्रे यांचा शोध घेत असताना एका लाकडी पेटीमध्ये काही जुने बिन आखलेले कागद सापडले. या कागदांवर पेन्सिलने लिहिलेले, वळणदार, सुस्पष्ट, सुंदर अक्षरांतील हजारो श्लोक मला सापडले होते.
पुढे १९८४ या वर्षी ‘महर्षि विनोद जीवन दर्शन’ या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. त्यामध्ये दुसरा लेख श्री.ज्ञाननाथजी रानडे यांनी कथन केलेला आणि सुमन महादेवकर यांनी लिहून घेतलेला असा आहे. त्यात महर्षि विनोद सरदार मेहेंदळयांना श्लोक सांगताना आलेल्या उत्कट अनुभवाचा संदर्भ सापडला. काही विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी, पुण्यातील सरदार मेहेंदळेंच्या घरी महर्षि विनोद जात असत आणि अतीन्द्रिय अवस्थेमध्ये स्फुरलेल्या काव्यपंक्ती टिपून घ्यायला ते रावसाहेब मेहेंदळेंना सांगत असत. त्याचे विलक्षण वर्णन ज्ञाननाथजी रानडेंनी कथन केले आहे.
त्याच कालामध्ये त्यांचा प.पू. अवलिया श्री शंकरमहाराज यांच्याशी अगदी जवळून संबंध आला होता.
श्री. रावसाहेब मेहेंदळे यांना श्लोक सांगत असताना महर्षींनी अनेक वेळेला विविध नाथांच्या संचाराचा-आगमनाचा उल्लेख दिनांक-वेळेसह केलेला आहे.
नाथसंप्रदायावरही महर्षींनी बरेच लेख लिहिलेले आहेत.(साधनासूत्र-भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभू्मी, संतांविषयी कृतज्ञता)
हे सर्व वाचूनच मी खूप भारावून गेले होते. पेटीतल्या त्या कागदांना स्पर्श करतानाच मी रोमांचित झाले होते आणि डोळयांमध्ये अश्रू आले होते. आता यापुढे हे धन आपल्यालाच जतन करायचे आहे आणि शक्य झाल्यास प्रकाशित करायचे आहे, अशी खूणगाठ मी त्यावेळेला बांधली होती. गेली कित्येक वर्षे मी या अतींद्रिय अनुभवाचे वर्णन केलेल्या संत-साहित्याचा, नवनाथचरित्राचा, सिध्द-संप्रदायातील श्री मुक्तानंद बाबा, लाहिरी महाशय, श्री. योगानंद, श्री रामकृष्ण परमहंस यांच्या साहित्याचा अभ्यास करीत आहे. गेल्या वर्षभरात, अनेक वेळा नर्मदा परिक्रमा केलेल्या व अवधूतानंद हे संन्यासाश्रमातील नाम घेतलेल्या, श्री. जगन्नाथ कुंटे या परिचितांची पुस्तके वाचण्याचा योग आला आणि मी पुन्हा महर्षींचे (आम्ही कुटुंबीय त्यांना अप्पा म्हणतॊ) श्लोक वाचायला घेतले आणि एका वेगळ्याच भावविश्वात गेले. योगायोगाने या वर्षी ही वेबसाईट करण्याचे ठरविले आणि सर्व अप्पांच्या कृपेने जमून आले.
एका लोकविलक्षण अनुभवाचे धन वेबवर प्रकाशित करताना मला कृतकृत्य वाटत आहे.