श्री नामदेवरायांची सार्थ गाथा (भाग ३ रा)
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा।
माझियां सकलां हरिच्या दासा ।।१।।
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ।
ही संतमंडळी सुखी असो।।२।।
अहंकाराचा वारा न लागो राजसा।
माझ्या विष्णुदासा भाविकांसी।।३।।
नामा म्हणे तयां असावे कल्याण।
ज्या मुखी निधान पांडुरंग।।४।।
‘कुत्ना थमाल रे थमाल आपुल्या गाई’ हा बोबडा बोल श्रीनामदेवांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान हळुवारपणे महाराष्ट्राच्या अंत:करणात गेली साडेसहाशे वर्षे विशद करीत आहे.
सर्व गाई म्हणजे इंद्रिय-ग्राम. कुलाच्या म्हणजे गोविंदाच्या हाती सुपूर्त करून ‘आपुल्या घराला’ म्हणजे निजस्थानाकडे स्वस्वरूपाकडे जाण्यास नामदेव सदैव सिद्ध आहेत व जीवमात्राने असेच सदैव सिद्ध असावे असा ऊर्जस्वल संदेश नामदेवांनी महाराष्ट्राला निवेदिला आहे.
महाराष्ट्रीयांच्या श्रुतिप्रांगणांत ‘कुत्ना थमाल रे’ हा बोबडा बोल आज साडेसहाशे वर्षे बागडत आहे; त्याचा लक्ष्यार्थहि आत्मसात करणे हे आपले व सर्वांचे, आजचे आणि आकल्पपर्यंतचे, भव्य कर्तव्य नाही काय?
(कुत्ना थमाल रे -)
कुत्ना थमाल रे थमाल आपुल्या गाई ।
आम्ही आपल्या घलासि जातो भाई ।।धृ.।।
तुम्ही थोलल्या पातलाचे लोक
तुम्हांमधी ले मी गलीब आहे एक।
मदला म्हणतां ले जाई गाई लाख।
किती मी धावूं ले कांता लागला पायी ।। कुत्ना १।।
काली पिवली ले गाय आहे तान्हेली।
मदला देखुनी तो गवली हाका माली।
काली कांबली हिलुनि घेतली थाली ।।कुत्ना २।।
काल बलाचि ले बलाचि खलवस केला।
तुम्ही सर्ल्वांनी फाल फाल घेतला।
मी गलीब ले म्हणून थोलका दिला।
तू म्हनसिल ले याला कलतीच नाही।। कुत्ना ३।।
कृष्ण म्हणे रे ‘उगा राहि बोबड्या’ गा।
तुझ्या गायी रे मीच वळवितो गड्या।
नाहितर धाडिन रे गोपाळांच्या जोड्या।
नामा म्हणे रे गोष्ट रोकडी पाही ।। ४।।
श्री. प्रल्हादबुवा यांनी डोळस बुद्धिवादाच्या भूमिकेवरून श्रीनामदेवगाथेची मीमांसा करण्याचा इष्ट व स्तुत्य संकल्प केला आहे. नामवाणीच्या व नामयोगाच्या अखंड अभ्यासामुळे त्यांना मिळालेली संकल्प-सिद्धी अभिनंदनीय व अभिमानास्पद आहे.
नैष्ठिक ब्रह्मचर्य, संतवाणीची अहोरात्र सांगात व ज्ञानभक्तीची एकांतिक आवडी या त्रैगुण्याने अलंकृत असलेल्या कर्मयोगी भक्तप्रल्हादावर जनता जनार्दनाने सुवर्णाक्षरात उधळावी हीच प्रार्थना.
- <b>धुं. गो. विनोद</b>
सोमवार वद्य १०
८६४ सदाशिव
दि. २४ ऑगस्ट १९५४
ॐ ॐ ॐ