उन्मनी वाङमय

अनासकवृत्तीने जो कर्मयोग आचरतो त्याची योग्यता विशेष आहे!

(६)

श्री आऊबाईंच्या व्यक्तित्वाला उज्ज्वल परंपरेचा पाठिंबा होता. या पूर्वसंस्कारांच्या तेजोवलयाने त्यांचे सर्वश: संरक्षण केले. त्यांची कर्तव्यनिष्ठा स्थिर ठेवली. त्यांचा विशुद्ध कर्मयोग अंती यशस्वी केला. कर्मयोग हे असिधाराव्रत आहे. 

‘तुल्यं तु दर्शनम्’ सूत्रकार बादरायण म्हणतात की, ज्ञानयोग व कर्मयोग दोन्हीही तुल्यबल आहेत. पण, एका दृष्टीने - ज्ञानयोग सोपा; कर्मयोग अति दुष्कर! मनाने इंद्रियांचे नियमन करून कर्मेंद्रियांनी सर्व कर्मे करीत असता अनासकवृत्तीने जो कर्मयोग आचरतो त्याची योग्यता विशेष आहे!

यास्त्विंद्रियाणी मनसा नियभ्यारभतेऽर्जुन।

कर्मेंद्रियै: कर्मयोगमसक्त: स विशिष्यते।। -(गीता ३, ७)

श्री ज्ञानदेवांनी या श्लोकावरील भाष्यांत फारच बहार केली आहे-

तो कर्मेंद्रिये कर्मी। राहटता तरी न नियमी।

परि तेथिचेनि उर्मी। झाकोळेना।।

तो कामनामात्रे न घेणे। मोहमले न लिंपे।

जैसे जळी जळे न शिंपे। पद्मपत्र।।

कर्मेंद्रियांनी, कर्मामध्ये राहात असता कर्मासक्तीने जो आच्छादित होत नाही (झाकोळेना); कामनेने झडपला जात नाही (घेणे); जलामधील कमल पत्राप्रमाणे जो अलिप्त असतो त्याचे वैशिष्ट्य काही और आहे!

म्हणूनच उपनिषत्कार सांगतात -

उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत।

क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया।

दुर्गं पथं तत्कवयो वदन्ति। -(कठोपनिषद्)

उठा, जागे व्हा व श्रेयस्कर ध्येयाचे आकलन करा. क्षुरधारेप्रमाणे अमोघ असा मार्ग आहे असे पंडित सांगतात.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search