उन्मनी वाङमय

नामदेव, महाराज

नामदेवमहाराजांबद्दल महर्षींनी लिहिलेले वाचताना कितीतरी कोडी उलगडतात.

 

पश्यन्ती-१०: नामदेवाच्या एका कूट अभंगाचा अन्वयार्थ

 

तेरा माजी तीन-सात साक्षात्कार।

आठवा निर्धार असीपद।।१।।

 

नवमापासूनि दशमाचे अन्ती।

बारावा निश्चिती योग जाणा।।२।।

 

प्रथम अक्षरी मध्यमा सूचना।

नाम नारायणा अन्तकाळी।।३।।

 

नामा म्हणे तुम्ही नाम स्मरा मनी।

वैकुंठ भुवनी वास होय।।४।।

 

नाम-जपाचे असाधारण महत्त्व सांगताना श्रीनामदेव ‘श्रीराम जयराम जय जय राम’ य तेरा अक्षरी मंत्राची महती सांगतात.

“वैकुंठपदाच्या प्राप्तीसाठी, लाभासाठी तुम्ही तेरा कोटी मंत्र जप करा. ज्यांचा तीव्र संवेग आहे, त्यांना पहिल्या तीन कोटी जपानंतर साक्षात्कार होईल. तुलनेने ज्यांची तीव्रता कमी आहे, त्यांना सात कोटी जपा नंतर अनुभूती येईल.

“आठ कोटी जपानंतर निश्तितपणे ‘तत् त्वम् असि’ - ‘ते ब्रह्म तूंच आहे’, या दिव्य सिद्ध अनुभूतीचा प्रत्यय येईल.

“नऊ कोटीपासून दहा कोटी जपापर्यंत आणि पुढे तर बारा कोटि जपापर्यंत योगसिद्धि होतेच यांत संशय नाही. ‘श्रीराम जयराम जय जय राम’ या तेरा अक्षरी मंत्राचे पहिले अक्षर ‘श्री’ हे आहे. नाम-जपांत केवळ वैखरींतून निघालेले अक्षर मंत्र-साधनेत उत्कटता आणू शकत नाही. हे प्रथमाक्षर मध्यमेतून निघावे. मध्यमा हे हृदय, प्रेमाची भक्तीची भावना हृदयांतच उदित होते. तेव्हा ‘श्री’ हे पहिले अक्षर नामजपाच्या वेळी हृदयाच्या अंतर्हृदयांतून निघाले पाहिजे. ‘हृंदिस्था मध्यमा ज्ञेया।’ अशी मध्यमेची व्याख्या आहे.

“अंतकाळी नारायणाचे नाम तुम्हांला भवसागराच्या पार नेईल, तुम्हाला तारील.

“असे नामस्मरण तुम्ही करा. मनांत उत्कटतेने नामजप करा. ते नाम तुम्हाला वैकुंठातील निवासाची प्रतीति देईल, अमृतानुभव देईल.”

*****

 

पश्यंती-३: ‘आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा’

 

(१)

श्रीकृष्ण व उद्धव, श्री ज्ञानेश्वर व नामदेव, जीझस व सेंट फ्रँसिस हे तीन अध्यात्मशास्त्रातले ऐतिहासिक द्वंद्वसमास आहेत.

अन्योन्याश्रय संबंधाची किंबहुना तादात्म्य संबंधाची ही तीन प्रतीके अनन्य सामान्य होत. 

नामदेवांनी श्री ज्ञानेश्वरांचे चरित्र प्रथमत: प्रकाशिले व त्यांच्या अवतार-कार्याचा सुगंध आसेतुहिमाचल पसरविला.

महाराष्ट्रांत उगविलेल्या उद्गीथ धर्माची, म्हणजे नामयोगाची ध्वजा उभवून भीमा-चंद्रभागेच्या वैशिष्ट्यपूर्ण व तेजाळ अध्यात्मलहरींना भारतीय तत्त्वशास्त्राच्या गंगायमुनेत मिसळविणार्‍या महायात्रिकाचा यथोचित मधुपर्क अजूनही व्हावयाचा आहे. त्यांच्या  अभंग वाग्वैजयंतीच्या मनोज्ञ सौंदर्याची, अंतरंगाची  व अंत:सुगंधाची ओळख अजून आपणास करून घ्यावयाची आहे.

नामदेव हे विठ्ठलाचे लडिवाळ व लाडके तान्हुले होते. त्यांच्या जिव्हाग्रावर श्रीशारदेचा अधिवास होता आणि विठ्ठलाईने आपल्या हाताने हे नामसारस्वत लिहून काढले आहे, अशी त्यांची स्वत:चीही भक्तिवेल्हाळ श्रद्धा होती.

(२)

स्वत: ज्ञानेश्वरांनी नामदेवास ‘भक्तशिरोमणी’ म्हणून संबोधिले होते.

श्री निवृत्ती-प्रभावळीतल्या या भक्तशिरोमणीच्या वाङ्‍मयपूर्तीकडे भक्तिसलील नेत्रांनी पहाणारी महाराष्ट्रीय जनता असंख्य आहे, पण ज्ञानचक्षूंनी त्या मनोज्ञ मंगलमूर्तीचे अवलोकन करताना प्रत्ययाला येणारा नेत्रोत्सव फारच थोड्यांच्या परिचयाचा असेल.

हरिदासांच्या कुलपरंपरेला ‘आकल्प आयुष्य’ याचिणार्‍या या बालसंताने महाराष्ट्राला कायमचे ऋणाईत केले आहे. कारण त्यांची याचना पांडुरंगाने सफल केली आहे. महाराष्ट्रांत ही परंपरा आजही ठळकपणे चमकत आहे.

तत्त्वज्ञसंत रामभाऊ रानडे व तत्त्वज्ञभक्त सोनोपंत दांडेकर, श्री दासगणू, श्री चौंडे महाराज, गाडगे महाराज, संत तुकडोजी या व दुसर्‍या अनेक सत्पुरूषांनी आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण विकासाने ही महाराष्ट्रीय भागवत-कुळाची परंपरा अखंड व तेज:पुंज ठेविली आहे. वरील नामनिर्देश अर्थातच गुणानुक्रमाने नाही. प्रत्येक सत्पुरूष-संत स्वयंप्रकाश व तत्त्वत: अतुलनीय असतो.

हरिच्या दासांनी, कल्पनेची बाधा, संशय-पिशाच्चाचा स्पर्श, मनाला होऊ देऊ नये. ह्या राजस भाविकांना अहंकाराचा वारा जराही लागू नये. पांडुरंगाचे नाव ज्याचे ज्याचे मुखांत असेल त्यांना चिरकल्याणाची प्राप्ति व्हावी, ही नामदेवांची प्रार्थना प्रत्येक मुमु‍क्षुला स्वत:मधील ढोबळ दोषस्थळे निर्देशित करील.

संशय व अहंकार हे दोन महादोष नाहीसे झाले पाहिजेत. तेव्हा हरिदासांच्या अमर कुळपरंपरेत मानाचे स्थान मिळू शकते.

‘आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा’ - ह्या एकाच अभंगाने नामदेवांनी, महाराष्ट्राचे अन्त:करण चिरवंश केले आहे. आपणा सर्वांच्या नित्य प्रार्थनेत हा अभंग अवश्य असावा.

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा।

माझिया सकलां हरिच्या दासा ।।१।।

कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ।

ही संत मंडळी सुखी असो ।।२।।

अहंकाराचा वारा न लागो राजसा ।

माझ्या विष्णुदासा भाविकांसी ।।३।।

नामा म्हणे तया असावे कल्याण ।

ज्या मुखी निधान पांडुरंग ।।४।।

 

*****

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search