नोव्हेंबर 1960
प्रत्यभिज्ञा-उपनिषद
ज्ञानाचे स्वरूप ओळखून आत्म-ज्ञान कैवल्य किंवा ब्रह्म-साक्षात्कार घडवणारी अभ्यसनीय विचार-प्रणालि.
सर्व जात मात्र हें मूर्तिमंत मांगल्य आहे. प्रत्येक वस्तु ही सच्चिदानंद तत्त्वाचे स्वरुप-सौभाग्य आहे.
सर्वं खल्विदं ब्रह्म। हे अथर्व वेदाचे महावाक्य सुप्रसिध्द आहे.
आनंद मायोहिसः। अभ्यासात हे बादरायण व्यासांचे ब्रह्मसूत्र देखील या सत्याला व्यक्तविणारा एक वाक्यदीप आहे.
आता वस्तू व तिची प्रतिती या दोन पदांचे दार्शनिक दृष्टया थोडे विवेचन करु म्हणजे विश्व हे एक 'मंगळ' विधान आहे व प्रत्येक वस्तुज्ञान हे ब्रह्मज्ञान आहे, प्रत्येक अनुभव हे अनुभवाभृत आहे हे सत्य सुस्पष्टपणे ध्यानात येईल. प्रतीति म्हणजे वस्तूचा प्रत्यक्ष प्रत्यय.
वस्तुचे ज्या क्षणी आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होते असे वाटते त्या क्षणाला मूळ प्रत्यय अस्तंगत झालेला असतो.
प्रत्यय असतो तेव्हा ज्ञान नसते व ज्ञान असते त्यावेळी प्रत्यय मावळलेला असतो.
म्हणून ज्ञान हे प्रत्ययावरचे आवरण आहें.
प्रत्यय होतो तेव्हा ज्ञान नसते; मग असते तरी काय? अज्ञान असतें काय? अन्धकार असतो काय? कीं अभाव असतो? नव्हे, अज्ञान नसते, अन्धकार नसतो, व अभावही नसतो.
मग ज्ञान प्रकाश व भाव तरी असतो काय?
अन्धकार नसतो, ज्ञान नसते हे आपण म्हटलेच आहे. साक्षात प्रत्ययाच्या क्षणी ज्ञान नसते.
प्रश्न खरोखरीच गंभीर, गहन आणि गढूळ आहे. पण प्रश्नाच्या अंत:स्वरूपात त्याचे उत्तर असते; हा सिध्दांत सर्व प्रसिध्द आहे.
प्रत्ययात ज्ञान व अज्ञान काहीही नसते.
प्रत्यय म्हणजे अनुभूती. अनुभूती आणि स्मृती असे दोन ज्ञानाचे प्रकार न्यायदर्शनात सांगितले आहेत. हे दोन प्रकार निरनिराळे आहेत. म्हणजेच अनुभवांचा अर्थ स्मृती नव्हे व स्मृतींचा अर्थ अनुभव नव्हे.
प्रत्ययांत अनुभूती असते, स्मृती नसते. आपण वर म्हंटले आहे की, सर्व ज्ञान म्हणजे स्मृती आहे.
प्रत्यय शब्दाचा अर्थ अनुभूती असा आहे, हे सहज स्पष्ट आहे. पण तेथे ज्ञान नसते, असा आपला दृष्टीकोन आपण स्वीकारला आहे. प्रत्यय म्हणजे अनुभूति म्हंटल्यावर प्रत्ययाप्रमाणे अनुभूतिलाही ज्ञानाचा आकार व अर्थ नसतो.
साक्षात् प्रत्यय व साक्षात् अनुभूती या निर्गुण व निराकार असतात. त्यांचे ज्ञान व्हावयास बुद्धि व स्थल-काल यांची आवश्यकता असते.याचा अर्थ, प्रत्येक प्रत्यय किंवा अनुभूति ही बुद्धिच्या पलीकडे व स्थलकालांनी अमर्यादित अशी असते.
मग बुद्धि व स्थल-काल यांची आवश्यकता काय व ती येते कोठून?
स्थल-काल हे द्वन्द्व बुद्धिव्यापारातून निर्माण होते. प्रत्येक बुद्धिव्यापार स्थल कालांना निर्माण करीत करीत अविर्भूत होत असतो.
प्रत्ययाला बुद्धिची जरुरी नाही. प्रत्ययाच्या 'ज्ञाना'ला बुद्धिची जरुरी आहे.
प्रत्ययाचा प्रकाश परावर्तित करण्यासाठी निरनिराळी ज्ञाने उत्पन्न होतात.
वस्तुज्ञाने व वृत्तिज्ञाने या एक प्रकारच्या काचा आहेत.
'भेद' ही कल्पना या काचांमुळे निर्माण झालेली आहे.
प्रत्ययांत भेद नाही, निरनिराळ्या ज्ञानांमुळे ज्ञानांच्या काचांमुळे भेद उत्पन्न होतो. सर्व वस्तूंचा प्रत्यय किंवा प्रत्यक्ष अनुभूती ही खरोखर एक स्वरुप आहेत.
निरनिराळी ज्ञाने उत्पन्न झाली म्हणजे भेद भासू लागतात. ज्ञानाच्या निरनिराळ्या तुकड्यांमध्ये प्रथमत: स्थल आणि काल यांच्या भेदामुळे भेदनिष्पत्ति होते. निरनिराळी ज्ञाने निरनिराळ्या स्थळी व काळी होत असतात. एकाच स्थळी व एकाच क्षणी सर्व ज्ञाने उत्पन्न होत नाहीत.
प्रत्यक्ष प्रतीतिचे, साक्षात अनुभूतीचे निरनिराळे photographs फोटोग्रॅफ्स बुद्धि काढत असते. प्रत्ययाहून वृत्ति-ज्ञानाचे स्वरुप वेगळे असल्याने अनन्त फोटोग्राफ्स चिंत्रे ज्ञानाने काढली तशी प्रत्ययांचे 'साक्षीत्व' त्या ज्ञानांच्या हाती लागत नाही. याचा सरळ निष्कर्ष असा की, प्रत्ययांची अनुभूतींची वस्तु एकच आहे. किंबहुना वस्तु आणि प्रत्यय एकच आहेत. ते 'ज्ञानां'त दोन झाल्यासारखे वाटतात. खुद्द प्रत्ययांत ज्ञान आणि वस्तु एकरुपच असतात. त्यांना निराळेपण येते, ते ज्ञानानंतर येते. सर्व ज्ञान हे स्मृती रुप आहे, असा आपला सिध्दांत.अनुभूती व स्मृती असे ज्ञानाचे दोन प्रकार नैय्यायिक मानतात. ते मर्यादित अर्थाने खरे म्हणता येतील.
सामान्यत: आपण ज्याला ज्ञान म्हणतो, ते ज्ञान अनुभूतीहुन अगदी 'निराळे' आहे. ते ज्ञान प्रतीतीची, प्रकृतीची विकृती आहे. प्रत्यक्ष प्रत्यय हा स्थलकालातीत असतो.
प्रत्ययाचे विपर्यस्त सापेक्षाजन्य स्वरुप म्हणजे वृत्तिज्ञान.
अर्थातच त्याचे स्वरुप स्मृतींचे असणार, हे स्मृतीरुप ज्ञान प्रत्ययाच्या प्रकृतीची 'विकृती' असणार. वृत्तिज्ञानाला जे कधीही गवसत नाही तो प्रत्यय.
प्रत्ययाचे अनन्त काल फोटो काढीत बसणारा कॅमेरा म्हणजे 'ज्ञानशक्ति' होय.
चित्रात प्रत्यक्षता व चैतन्य कसे असणार? तसेंच ज्ञानात प्रत्यक्षतेचे चैतन्य कोठून येणार?
'ज्ञान हे स्मृती स्वरुप' आहे. या सिध्दांताचे ज्ञान झाले कीं, ईश्वराचे केवलत्व समजते.
पण, हे ज्ञान देखील स्मृती-रुप आहे काय? नव्हे. हे ज्ञान स्मृतीरुप नाही. कारण, ज्ञानत्वाचा नाश करणारे असे ते ज्ञान आहे. 'अभावा'चा 'अभाव' म्हणजे जसा भाव, तसे ज्ञानाचे ज्ञान म्हणजे प्रत्यय.
ज्ञानाचे ज्ञान होणे, याचा अर्थ ज्ञानाचा विषय हाही ज्ञानच. ज्ञाता हा ज्ञान, ज्ञेय हे ज्ञान - या दोन्ही पदांमधील संबंध हे अर्थात ज्ञानच. येथे प्रत्यक्ष प्रतीतित काय आले? ज्ञान आले. कोणाच्या प्रतीतीत आले? ज्ञात्याच्या.
दगडाला ठेचले, तर त्याची त्याला प्रतीति होत नाही. पशूला वस्तु संपर्काची प्रतीति येते, पण ती प्रतीति वृत्तिज्ञानाचा आकार घेत नाही.
सामान्य मानवाला प्रतीति येते. ती प्रतीति ज्ञानाचा आकार घेते. पण हे ज्ञान प्रतीतिचे विकृत स्वरुप असते.
जीवनमुक्ताला ज्ञानाच्या स्वरुपाचे ज्ञान असते. त्याला ज्ञानाचे विकृत स्वरुप दाखविण्याची शक्ति ठाऊक असते.
'ज्ञानाच्या' मर्यादा, प्रतीतीशी असणारा 'ज्ञानाचा' दूरान्वय त्याला माहित असतो. कारण, त्याला ज्ञानाचे ज्ञान झालेले असते.
सामान्य वस्तु-ज्ञाने सापेक्ष असतात. एका ज्ञानखंडाची दुसऱ्या ज्ञानखंडास मदत होण्यासाठी ही ज्ञानखंडाची परंपरा सुरु राहते. अर्थात ही ज्ञाने सर्वथैव निरुपयोगी असतात, असा येथे अभिप्राय नाही.
सान्त, मर्यादित, विविध वस्तूंचे संबंध जोडण्यास या ज्ञानाचा उपयोग अवश्यमेव आहे. पण, या सर्व ज्ञानांचे स्वरुप ओळखणे, त्याहूनही आवश्यक नव्हे काय?
वर आपण म्हटले की, सर्व वस्तूंचा प्रत्यय एकस्वरुप असतो. विविधता, वैचित्र्य गुणविशेष हे बुद्धिव्यापारजन्य आहेत. बुद्धिव्यापारापलीकडे प्रतीति एकच आहे. ज्ञेय वस्तू ही एकच आहे. पण अनुभूती हा केवलत्वाचा प्रत्यय बुद्धिव्यापारापलीकडे आहे. बुद्धिव्यापाराच्या अलीकडे जी परिस्थिती आहे, त्या जड सृष्टीत जी वस्तुस्थिती आहे, त्याहून केवलत्वाचा अनुभव अगदी निराळा आहे.
सर्व ज्ञानांचे मूळस्वरूप प्रत्यय आहे, हे आपण पाहिलेच. प्रथम प्रत्यय, नंतर त्याचे ज्ञान, नंतर त्या ज्ञानाची स्मृती हा सर्व सामान्य अनुक्रम झाला. पण आपण सिध्द केल्याप्रमाणे सर्व ज्ञान हे स्मृतीच असल्यामुळे, प्रत्यक्षाची, प्रतीतीची, अनुभूतीची भेट करवून देणारे ज्ञानाचे ज्ञान तिचे नाव प्रत्यभिज्ञा.
'प्रत्यभिज्ञा' या शब्दाचा अर्थ सामान्यत: 'स्मृति' असा आहे. पण, ही सामान्य स्मृती नव्हे. मूलप्रत्ययाची, मूलस्वरुपाची, केवलत्वाची, ज्ञानाने दुरावलेल्या स्वरुपाची ओळख करुन देणारी स्मृती आहे. ही स्मृती ज्ञानाचे ज्ञान आल्यावर प्रतीतीत येते किंवा प्रतीतिस्वरुप होते.
'साक्षात् प्रत्यय' या अर्थाचा वाचक असा वेदान्त शास्त्रांतला परिभाषिक शब्द 'अपरोक्ष' हा शब्द आहे.
मराठीत 'अपरोक्ष' हा शब्द अगदी उलट अर्थाने वापरला जातो. 'माझ्या अपरोक्ष' म्हणजे 'माझ्या नकळत','माझ्या परोक्ष' म्हणजे माझ्यादेखत, माझ्यासमोर, प्रत्यक्ष.
अर्थात मूळ संस्कृत अर्थानेच 'अपरोक्षा'ची अनुभूती घ्यावयाची असते व त्याची 'साधना' म्हणून प्रत्यभिज्ञेचा अभ्यास आवश्यक आहे.
धुं.गो.विनोद
*****