भारताचे राजकारण शांतिनिष्ठ, शांति-प्रचूर व शांति-प्रचारक आहे, हे सर्वमान्य सत्य आहे. पण शांति म्हणजे काय, याचा सूक्ष्म विचार करणे आवश्यक आहे.
शांतिच्या पोटांत स्वसंरक्षणासाठी युद्ध हे निश्चितपणे समाविष्ट आहे.
युद्ध सुरू असतानाही शा्ति असू शकते. शांतिच्या विशाल वितानात आक्रमणाचे काळे वादळ आणि स्वसंरक्षणाचे शुभ्र मेघ एक समयाने वावरू शकतात.
युद्धाय विगतज्वर:।।
हे गीतेचे महावाक्य माझ्या सिद्धांताला पोषक आहे. विगत-ज्वर-त्व हे शांतिचे मुख्य लक्षण आहे.
ज्वर म्हणजे ताप, संताप, समशीतोष्ण अवस्थेचा अभाव, समतेचा अभाव, तमोगुणाचा अतिरेक, सत्त्वगुणांचा विलोप इत्यादी अर्थ भाष्यकारांनी दिले आहेत.
अर्जुना देवोनी समाधी।सवेची घातला महायुद्धी।।
श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रथम समाधी दिली व नंतरच निर्वाणीच्या घनघोर युद्धांत त्याला प्रविष्ट केले. शांतियोगात, समाधी-योगांत राहून, अर्जुन १८ दिवस युद्ध करीत होता, असे एकनाथ म्हणतात.
युद्ध हे एक शांतिकर्म आहे. धर्मकृत्ये जशी शांति-युक्त मनाने करावयाची असते, तसे युद्ध देखील शांत बुद्धीने करता येते. करावयाचे असते; तरच अंतिम विजय मिळविता येतो.
शांतिरस हा सर्व रसांचे अधिष्ठान आहे, सर्व रसांचा राजा आहे.
शांत, निर्विकार मनाने जशी प्रार्थना, विश्वेश्वराची पूजा करावयाची, अगदी त्याच प्रकारे समत्व बुद्धीने प्रशांत मनाने शस्त्रसंपात करणे अगदी शक्य आहे.
युधिष्ठिर हा शब्द हा महान अर्थ विशद करीत आहे. युधि स्थिर म्हणजे युद्धामध्ये स्थिर, अचल, गंभीर स्थितधी असतो.
शस्त्रसंपात सुरू असताना जो अंत:करणांत स्थिर असतो, रहातो, तोच महावीर होय.
भारतीय युद्धाच्या घनघोर रणकंदनांत युधिष्ठिर जसा शांतगंभीर राहू शकला, त्याप्रमाणे शांतिचे अधिष्ठान न सोडता सर्व रणधीरांनी हुतात्म्यांनी, सैनिकांनी व सेनांनींनी अंत:शांतीचा समाधि भंग न करता समरांगणांत आपली धीरता व वीरता प्रकट केली पाहिजे.
मी स्वत:ला शांतिदूत व शांति-सैनिक समजतो.
शांति ही मनाची, अंत:करणाची सु-संकलीत व्यक्तित्वाची अवस्था आहे, भूमिका आहे.
शांति म्हणजे युद्धाचा अभाव नव्हे. धीरतेचा शूरतेचा, वीरतेचा अभाव म्हणजे तर शांति नव्हेच नव्हे.
२)
केवळ कर्तव्य बुद्धीने, निर्मल मनाने ईशसंकल्पनाचे निमित्तमात्र होऊन आणि सत्यासाठी, शीलासाठी, जीवनाला अधिष्ठानभूत असणाया सांस्कृतिक मूल्यांसाठी, जी हत्या केली जाते, ती हत्या म्हणजे शांतिदेवतेचा एक पूजाविधी आहे, तो एक शांतियज्ञ आहे.
युगानुयुपूर्वी जेव्हा शांती शब्द प्रथम वापरला गेला, त्या क्षणाचे स्मरण आज करू या. ब्रह्मदेवाचा मानसपूत्र कर्दम त्याची जी कन्या तिचे नाव ब्रह्मदेवाने शांति, असे ठेवले. या नामकरणापूर्वी शांति हा शब्द जन्मला नव्हता.
अथर्व वेदाचे प्रणेते अथर्वा ऋषी यांची शांती ही धर्मपत्नी होय.
अथर्वा व शांति या दम्पतीने, युद्धविद्या अस्त्रविद्या, शस्त्रविद्या, मंत्रविद्या, तंत्रविद्या व यंत्रविद्या यांची निर्मिती केली.
`शांतिदेवी' ने शस्त्रे निर्माण केली, हे विधान हा वदतो-व्याघात, एक ऐतिहासिक सत्य आहे.
`शांतिरस्तू पुष्टीरस्तु तुष्टीरस्तु' वैदिक उदकशांती नंतरचा आशीर्वाद हा असा आहे. त्यांतला अनुक्रम नीट लक्षात घेवू या. शांतिच्या अधिष्ठानावर सुस्थिर असणाया पुष्टी आणि तुष्टीसाठी, म्हणजेच विकासासाठीच व संतोषासाठी हा आशीर्वाद देण्यांत येतो.
नुसती शांती इष्ट नव्हे, तर तिच्यावर आधारलेली पुष्टी पाहिजे, पोषण पाहिजे, वर्धन व विकास पाहिजे आणि नंतर संतोष असावा, तृप्ती असावी.
अर्थातच शांति व विकास यांच्यामध्ये विरोध नाही. शांति म्हणजे कर्तृत्त्वाचा पूर्णविराम नसून प्रारंभ आहे.
निष्क्रियता, निश्चलता आणि निश्चेष्टता ही शांतिची स्वरूपे नव्हेत.
दगडाची, प्रेताची, क्लीबतेची अवस्था हिला काय शांती म्हणावयाचे?
३)
आक्रमण आणि संरक्षण हे शब्द नेहेमीच सापेक्षतेने ध्यानांत घेतले पाहिजेत. संरक्षणांत, काही वेळा आक्रमणाचा अंतर्भाव होतो; हा सिद्धांत आज लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. काही मर्यादेपर्यंत आक्रमणासाठी प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राजवळ नेहमीच असली पाहिजे, तरच स्व-संरक्षणाची खरी शक्यता असते.
केवळ आक्रमण व केवळ स्व-संरक्षण स्वयंपूर्ण व निश्चित अर्थाने घेणे, हे अत्यंत धोक्याचे आहे. स्व-संरक्षण जो पर्यंत आवश्यक आहे. तो पर्यंत आक्रमण करण्याची सिद्धता अवश्यमेव असली पाहिजे. अनेक प्रसंगी, आक्रमण शक्ती असेल तेव्हाच खरे स्वसंरक्षण होऊ शकेल.
आक्रमण व शांती हे प्रतियोगी शब्द नाहीत. आक्रमण आणि संरक्षण हे प्रतियोगी शब्द आहेत.
आक्रमण व्हावयाचे असेल तरच स्व-संरक्षण आवश्यक आहे. कोठून काहीही धोकाच नसेल तर स्व-संरक्षणाची गरजच काय?
स्व-संरक्षण आणि आक्रमण या शब्दांचे अर्थ तारतम्याने घ्यावयाचे आहेत.
अनेक वेळा आक्रमण हे स्व-संरक्षणाचे प्रमुख अंग असते.
स्व-संरक्षणाची योजना ही भावी काल लक्षांत घेऊन करावयाची असते.
भावी कालांत कोणत्या देशाकडून व कोणत्या दिशेने आक्रमण होण्याची शक्यता आहे. ह्याची निश्चिती करून स्व-संरक्षणाची योजना व व्याप्ती ठरवावयाची असते.
अशा विशाल दृष्टिकोनातून भारनाने आज स्व-संरक्षणाचा कार्यक्रम आखला पाहिजे.
४)
जिजीविषा, विजिगिषा, रिरंसा, जिज्ञासा आणि मुमुज्ञा या प्रवृत्ती जीवनाला आधारभूत आहेत. किंबहुना, हे पंचक मानवी जीवनाचे सहजसिद्ध लक्षण आहे. जगण्याची जिंकत रहाण्याची इच्छा, रमण्याची व सुखाचा शोध घेण्याची प्रवृत्ती, जाणण्याची व मुक्त होण्याची इच्छा, या पंच रंगांनी, जीवनाची रंगपंचमी अखंडतेने साजरी होत असते.
जगणे व जिंकणे या गोष्टी एकमेकांत अनुस्युत आहेत.
जगावयाचे तर जिंकीत जिंकीत जगावे लागते. कोणावर तरी विजय मिळवीत रहावे लागते. याचाच अर्थ आपण क्षणाक्षणाला झुंज दिली पाहिजे, झगडा स्वीकारला पाहिजे.
स्व-संरक्षेला शस्त्रास्त्रांच्या बलापेक्षाही अनेकानेक बौद्धिक मानसीक गुणांची अपेक्षा असते.
काही अवगुण स्वभावसिद्ध असतात आणि दुसरे काही पुढे प्राप्त् झालेले म्हणजे उपार्जित असतात. त्यांचे निर्मूलन आवश्यक असते.
भारतीय जनतेत आलस्य दीर्घसूत्रीपणा, गतानुगतिकत्त्व, विक्षेप, स्वकीयांचा मत्सर इत्यादी अनेक दुर्गुणांचे प्राबल्य आहे.
आजच्या भारतीय जनतेत एकाग्रता, एक सूत्रत्व अभावानेच तळपत आहे.
जनता एकाग्र असेल तरच पुढारी हे जनतेचे, जनतेच्या गुणावगुणांचे प्रतिनिधी असतात.
नेत्यांमधले बहुतेक गुणदोष हे जनतेमध्ये दृढमूल झालेले असतात.
एखाद्या पुढाऱ्याला दोष देणे, हे जितके सोपे तितकेच निष्फल असते. राष्ट्राच्या नेत्याला निवडून देणे, त्याला कार्यप्रवण ठेवणे, जागृत ठेवणे हे सर्वस्वी जनतेच्या हातात असते.
आज मुख्य प्रश्न हा आहे की, भारतीय जनता अधिक दक्ष, अधिक कार्यक्षम, अधिक तेजस्वी व मनस्वी कशी होईल? चीन भारतावर आक्रमण का करू शकला?
भारतीय जनता ढिली आहे, दीर्धसूत्री आहे, परावलंबी आहे, हे चीनने ओळखले म्हणून.
६)
अध्यात्मांत व व्यवहारांत, मिळतील तेथून ज्ञानाचे सुवर्णकण आपण टिपून घेतले पाहिजेत. शत्रूला ही गुरूत्व देणे प्रसंगी आवशक असते.
भगवान दत्तात्रेय यांनी एकवीस गुरू केले. मार्कंडेय, ब्रम्हवैवर्त इत्यादी पुराणांत तर असे लिहीले आहे की, एका वेश्येलाही गुरूपद देऊन श्रीदत्तात्रेयांनी तिच्यापासून आध्यात्मिक उपदेश घेतला होता.
डशीाििी ळि ींहश ीींिशिी म्हणजे दगडाधोंड्यांतून धार्मिक प्रवचने पाझरत असतात. असे शेक्सपियद म्हणतो. या दृष्टीने आपल्या शत्रूला गुरू करण्यात काहीही वावगे नाही. आपला शत्रू हा आपला उत्तमोत्तम उपदेशक होय.
चीन देश हा भारताचा शत्रू आहे. चीनपासून ही भारतीव जनतेने अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
प्रदीर्घकाल टिकणाऱ्या आयोजना आखणे, व पूर्वतयारी करणे, आपल्या गुप्त् हेतूंबद्दल कोणास केव्हाही संशय येऊ न देणे व मुख्य हेतू स्थिरतेने डोळयांपुढे ठेवून गौण हेतू, गौण भूमिका यांच्यामध्ये यथाकाल फेर बदल करणे अशा अनेकानेक गोष्टी, आपर चीनकडून शिकू या. अर्थात हे युद्धतंत्र आहे.
चीनला भारतावर आक्रमण करावयाचे होते म्हणून जे जे त्यांनी केले ते ते भारताने स्व संरक्षणासाठी, पूर्वीच दक्षतेने करण्याची आवश्यकता होती, व त्या करीत रहाण्याची अजूनही दीर्घ कालपर्यंत आवश्यकताही आहे.
७)
नेपोलियन शस्त्रबलाला अवघे शेकडा १०% मार्क देत असे व शेकडा ९० % मार्क तो धीरतेला नैतिक बलाला व सैनिकांच्या अंत:सामर्थ्याला देत असे.
बोमडी - ला पडले, या नुसत्या वार्तेने, तेजपूर येथील काही अधिकाऱ्यांनी स्वत:चा व स्वत:च्या मुलाबाळांचा जीव वाचविण्यासाठी तेथून पळ काढला.
समरांगणावर प्रत्यक्ष लढणाऱ्या सैनिकांनी मात्र आदर्श कोटीचे धर्य दाखविले यात संशय नाही. प्रत्यक्ष लढणाऱ्या लोकांपेक्षा अधिक शौर्य, ध्येयनिष्ठा, त्याग, सर्वसामान्य जनतेत निर्माण झाला पाहिजे, तरच खरी स्वसंरक्षा सिद्ध होईल.
लष्करी शिक्षणाबरोबरच राष्ट्रियतेची नैतिक धैर्याची समर्पण बुद्धीची शिकवण जनतेला मिळाली पाहिजे.
शस्त्रास्त्रांच्या निर्मितीप्रमाणेच राष्ट्रिय मनोवृत्तीची निर्मिती फार मोठ्या प्रमाणांत झाली पाहिजे. राष्ट्रनिष्ठा आणि नैतिक धैर्य यांचे वस्तुपाठ सर्वत्र दिले गेले पाहिजेत.
८)
यशवंतरावजींसारख्या पाईकाला पाठीशी घालून, जवाहरलाल नेहरू भारताच्या स्वातंत्र्याचे, संस्कृतीचे सारथ्य करीत आहेत.
यावेळी ज्ञानेश्वरींतील सोज्जल शब्दांचे स्मरण होत आहे,
पायिकू पाठिशी घातला।
आपण पुढा राहिला।
तेणे पांचजन्यू आस्फुरिला ।
अवलीळाची।।
ज्ञानेश्वरी अ.१
पांजजन्य म्हणजे पंच जनांचा आवाज - स्मृती - ग्रंथाप्रमाणे, पंचजन म्हणजे समाजाचे पाच घटक - ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र व पंचम. आजच्या संदर्भात पंचजन्य म्हणजे शिक्षण व्यवसायी, सैनिक, उद्योगपती, मजूर व कर्मचारी इत्यादी सर्व प्रकारच्या जनतेचा प्रभावी प्रतिनिधी म्हणून पंडीत जवाहरलाल नेहरू समरांगणावर उभे आहेत.
एकदा जवाहरलाल नेहरूंनी पाठीशी घातल्यावर, यशवंतरावांचे संरक्षण कार्य प्रभावी आणि ओजस्वी होणार यांत संशय काय? शिवाय यशवंतरावांसारखा मर्द व मुत्सद्दी मराठा प्राप्त् झाल्यावर जवाहरलाल नेहरूंचे संरक्षण खाते किती बळकट झाले याची कल्पना करणे कठीण नाही.
९)
लोकशाहीच्या सर्व संकेतानुसार भारतीय जनतेने मान्य केलेले महामंत्री व संरक्षण मंत्री यांच्या विरूद्ध वैयक्तीक टीका करण्याचा हा क्षण नव्हे. नेहरू किंवा चव्हाण या व्यक्ती आजच्या प्रसंगी, भारताची र्नतृत्व केंद्रे, अधिकार केंद्रे आहेत. त्या व्यक्ती राहील्या नाहीत. या लोकशाहीच्या संस्था आहेत. आजच्या नाजूक परिस्थितीत वैयक्तीक गुणदोषांची काकदृष्टीने चिकित्सा करणे संयुक्तीक नव्हे.
खऱ्या लोकशाहीत व्यक्तीचे स्वातंत्र्य खरोखर मर्यादीत असते. या मर्यादा ही बंधने व्यक्तीमात्राने स्वत: स्विकारली असतात. ती बंधने झुगारून देणे हा आत्मविरोध आहे. क्वचित आत्महत्त्याही होऊ शकते.
हुकूमशाहीतील बंधने दुसऱ्याने लादलेली असतात.
आपणांस ती पटत नसली तरी ती सक्तीने पाळावी लागतात. म्हणून ती झुगारून देणे क्षम्य व कदाचित आवश्यकही ठरेल. पण लोकशाहींत स्वत: स्विकारलेली बंधने पाळलीच पाहिजेत.
लोकशाहींतील नेते या लोकशाहीच्या अधिष्ठानभूत संस्था होत. या संस्था विदारक, विनाशक टीकेने खिळखिळया करणे हे कृत्य लढाई सुरू असताना तर आत्मघातक राष्ट्रविघातक ठरेल.
१०)
सुमारे पाच हजार वर्षांपुर्वी, म्हणजे भारतीय सुद्धापुर्वी भारताच्या विस्तारात भारतचाच्या सीमेलगतच्या अनेक देशांचा समावेश होतो.
वायव्य दिशेकडील काबूल, कंदाहार किंवा गांधार, बलुचिस्तान अफगाणीस्तान हे देश, उत्तरेकडील तिबेट व दक्षिण चीन, ईशान्येकडील तिबेट व ब्रम्हदेश, इंडोनेशिया, मलाया, जावा, सुमात्रा व बोर्नियो आणि दक्षिणेकडील सिलोन हे सर्व देश भारताच्या विस्तीर्ण साम्राज्यात समाविष्ठ झालेले होते.
वैदिक व महाभारतीय संस्कृतीची वैशिष्ठ्ये व अवशिष्ठे आज देखील या सर्व देशांतून उपलब्ध होतात. भारत व महाभारत यातील भेत लक्षात घेणे आवश्यक आहे. कौरव पांडवांच्या युद्धानंतर गेल्या पाच हजार वर्षात महाभारताच्या सीमा संकुचीत होऊन सध्याचा भारत आकारला.
जय किंवा महाभारत हा ग्रंथ लिहीण्यापुर्वी सुमारे तीन हजार वर्षे, आपल्या या आर्यवर्ताची व्याप्ती फार विशाल होती. पाश्चिमात्य पंडीत वॉडेल (ुरववशश्रश्र) यांच्या सुमेरियन संस्कृतीवरील ग्रंथामध्ये व दुसऱ्या काही लेखांत भारताच्या ह्या विशाल व्याप्तीची निदर्शक अशी प्रमाणे सापडतात.
उपनिषत्काळात तिबेट हे तत्कालीन भारतात अंतर्भूत असल्याचे एक नि:संदेह प्रमाण उपलब्ध आहे.
उत्तर कुरव व उत्तर मद्र हे भारतीय लोक हिमालया पलीकडे रहात होते असा स्पष्ट उल्लेख, ऐतरेय ब्राम्हण (इ.स. पुर्वी १००० वर्षे) या ग्रंथात सापडतो.
हिमवंतं परेर उत्तरकुरव: उत्तरमद्रा:
-ऐतरेय ब्राम्हण ८-१४
या पंक्तीतील ``हिमवंतम्'' हा शब्द हिमालयांचा द्योतक आहे. असे कीथ व त्झिमर या आधुनिक पाश्चात्य पंडितांचे निश्चित मत आहे. काराकोरम पर्वताला ते हिमालय म्हणतात. पण सायणाचार्य व हौ मार्टिन 'हिमवंत परेण' यांतील `हिमवंतम्' म्हणजे नेपाळ सिक्कीमच्या पलीकडच्या भारताच्या उत्तरेचा हिमालय असे मानतात. `परेण' म्हणजे तिबेट (त्रिविष्टप) व दक्षिण चीन हे प्रांत होत. असे त्यांचे स्पष्ट मत आहे.
भारतीय युद्धानंतर भारतावर अनेकाअनेक आक्रमणे झाली भारताच्या सीमा हळूहळू मर्यादीत होऊ लागल्या व आजचे हिंदूस्तान निर्माण झाले.
माझ्या मते आर्यावर्त हे नाव सुमारे सात हजार वर्षापुर्वीच्या विशाल आर्य देशाचे असावे. अलीकडचे इंग्रज पंडीत म्हणतात त्याप्रमाणे पंजाब व विंध्याद्रि पलीकडचे काही प्रांत एवढाच आर्यावर्त नव्हे.
या विषयांत अजून पुष्कळ संशोधन होणे आवश्यक आहे.
तिबेटशी संलग्न असलेला चीनचा पुष्कळसा दक्षिण भाग हा प्राचीन आर्यदेशाचा किंवा महाभारचाचा एक विभाग असला पाहिजे हे क्रमप्राप्त् ऐतिहासीक व भौगोलीक सत्य आहे.
चेंगीझखानासारख्या आसुरी रक्तपिपासूला आदर्शवीर मानणाऱ्या आजच्या चिनी आक्रमकांनी ज्या तथाकथिक ऐतिहासीक सीमा नव्या नकाशांतून छापल्या आहेत, त्या पाहिल्यावर, प्राचीन आर्यावर्ताच्या व महाभारताच्या सीमा आजच्या भारतीयांच्या स्मरणांत येणे साहजिक नव्हे काय? ती विचारसरणी अवलंबून भारताने आसपासच्या चीनसह तिबेट व काबूल गांधार पासून बोर्नियो पर्यंतच्या सर्व देशांवर आक्रमण करणे योग्य ठरेल काय?
आज भारताजवळ एवढे आक्रमक सामर्थ्य नाही, पण उद्या ते आपण मिळवणार हे निश्चित. म्हणून काय, हे सर्व देश जिंकणे योग्य समजावयाचे काय?