साधना सूत्रे

न्याय आणि तर्क

`न्यायदर्शन' हे अत्यंत जटील `दर्शन' आहे. `वैशेषिक' व `न्याय' ही दोनही दर्शने जुळी भावंडे आहेत. मोक्ष हा दोहोंचा अंतिम हेतू आहे. दोघांच्या प्रक्रियेत मात्र पुष्कळसा फरक आहे. ही दर्शने प्रथमावस्थेत निरीश्वरवादी होती; पण त्यांच्या पुढील विकासक्रमांत शिव व पशुपति ही प्रतीके समाविष्ट झाली.

न्यायदर्शनाचे आद्य प्रणेते भगवान गौतममुनी हे होत. सोळा मूळ पदार्थांच्या तत्त्वांचे ज्ञान झाले म्हणजे मोक्ष-प्राप्ती होते, हा गौतमप्रणीत न्यायदर्शनाचा आद्य सिद्धांत आहे. येथे पदार्थ म्हणजे वस्तू नव्हे, तर वस्तूवाचक नाम होय. या सोळा नामांचे अर्थ यथावत् समजणे, हे मोक्षाचे मुख्य साधन आहे. विचार-शास्त्र (ङसिळल),  शब्दार्थ शास्त्र (डशारिळींली)  व अध्यात्म यांचा भव्य समन्वय करणारे न्याय हे एकमात्र दर्शन आहे.

न्यायदर्शनाला शब्दार्थ-शास्त्र व विचार शास्त्र ही दोन शास्त्रे उपांगभूत आहेत. न्यायसूत्राचे भाष्यकार वात्स्यायन यांनी या शास्त्राच्या तीन मूल-प्रवृत्ती सांगितल्या आहेत. उद्देश, लक्षण आणि परीक्षा.

उद्देश म्हणजे वस्तूंचे नाव सांगणे. लक्षण म्हणजे वस्तूचा असाधारण धर्म सांगणे. हे लक्षण योग्य आहे किंवा नाही हे पहाणे म्हणजे परीक्षा. या तीन पद्धतींनी प्रमाणादि सोळा पदार्थांचे विवरण न्यायदर्शनात झाले आहे.

न्यायदर्शनाला `आन्वीक्षिकी' ही यथार्थ संज्ञा आहे. अन्वेक्षा म्हणजे शोध. न्याय हे संशोधन-शास्त्र आहे. सत्याचा शोध कसा हे न्यायदर्शन शिकल्याने समजते.

रामायणांत (२-१००-३६) व महाभारतांत (शांतीपर्व १८०-४७-४९) धर्मशास्त्राच्या आज्ञा उल्लंघिण्यास प्रवृत्त करणारी अशी ही आन्वीक्षिकी विद्या आहे, असा निंदाव्यजक  उल्लेख आढळतो. मनूनेही (२-११) आन्वीक्षिकी किंवा हेतूशास्त्राची निंदा केली आहे.

हेतूशास्त्र म्हणजे कार्याचे `कारण' दर्शविणारे अन्वीक्षा शास्त्र. हेतू म्हणजे कारण. विश्वाच्या मूल कारणांची अन्वीक्षा करणा‍या शास्त्राला `आन्वीक्षिकी' हे समर्पक नाव आहे. मनूने राजांच्या व राजपुत्रांच्या शिक्षणांत आन्वीक्षिकीचा अंतर्भाव केला आहे. आन्वीक्षिकीच्या आधारानेच व्यासांनी वेदव्यवस्था केली, असा न्यायसूत्रवृत्तींत (१-१-१) उल्लेख केला आहे.

अन्वीक्षा ही अनुभवाला धरून असावी. स्वैर व स्वच्छंद वृत्तीने मूलाधार तत्त्वांचा उच्छेद करू पाहणारा, तर्कट बुद्धि-व्यापार म्हणजे अन्वीक्षा नव्हे. वाल्मिकी, व्यास व मनू यांनी विधायक अन्वीक्षेची महती गायिली असून केवळ बेछूट, बे-लगाम तर्कटांची निंदा केली आहे. हे ध्यानांत घेतले पाहिजे.

वेदत्रयी, वार्ता (व्यापार) व दंडनीती (राजकारण) यांच्याकडून निराळा, पण त्यांनाही सर्वथैव उपकारक अशी ही आन्वीक्षिकी विद्या आहे, असा कौटिल्याने अर्थशास्त्रांत (१-२) स्पष्ट उल्लेख केला आहे.

इ.स.पूर्वी सहाव्या शतकांत आन्वीक्षिकीच्या मूळ तत्त्वांचा व प्रक्रियांचा उदय झाला असावा. इ.स. पूर्वी पहिल्या शतकांत `दर्शन' हा शब्द प्रचारांत आला व त्या शब्दाने `आन्वीक्षिकी' या शास्त्राचाही निर्देश होऊ लागला. विश्वविषयक सर्व प्रश्नांचे बौद्धिक दृष्टिकोनातूनच विवेचन करणे, तो दृष्टिकोन स्थिरावणे हा दर्शन ग्रंथाचा विशेष आहे, असे माधवाचार्यांनी त्याच्या सर्व दर्शन-संग्रहात सांगितले आहे. आता `तर्कभाषा' या ग्रंथाचे मूलतत्त्व जो `तर्क' त्याचा हा अर्थ पाहू या. न्यायदर्शन हे विश्वविषयक सर्व प्रश्नांचे बौद्धिक दृष्ट्या विवेचन करणारे शास्त्र आहे. `तर्क ' हा सिद्ध-सफल झाला की, व झालाच तरच, तो `न्याय' होतो. तर्क हा प्रत्यक्ष प्रतीतीवर आधारलेला नसतो. त्याचे स्वरूप, कल्पित गृहीत-कृत्यांवर आधारलेल्या अनुमानासारखे असते. वात्स्यायन (न्यायभाष्य १-१४०) असे सांगतो की, तर्काने आपल्याला `निश्चित' व एखाद्या वस्तूंच्या प्रतीतीसारखे इन्द्रियगम्य ज्ञान मिळत नाही. तरीही तर्कित केलेले अनुमान-चित्र अग्राह्य मानल्यास, जो परिणाम, जी फलश्रुती निेष्पन्न होईल, ती किती विकृत, हास्यास्पद व असंभवनीय आहे, हे तर्कक्रियेने स्पष्ट होते. आधुनिक विज्ञानांत ज्याला हायपॉथेसिस (hypothesis)  म्हणतात, तसा काहीसा अर्थ तर्काने अभिव्यक्त होतो. तर्क हे `अप्रत्यक्ष प्रमाण' आहे. त्याला साक्षात् प्रचीतीचा, प्रत्यक्षाचा आधार नसतो.

`समजा' `कल्पना करा' अशा स्वरूपाचे तर्क हे एक विधान आहे.

तर्कामुळे `प्रभे`ला अथवा यथार्थ ज्ञानाला केवळ पुष्टी मिळते.`प्रभा अनुग्राहका: तर्का:।' (सर्व-सिद्धांत-सार-संग्रह' ६-२५) उदा.  स मजा, तर्क करा की, आत्मा मर्त्य आहे. पण मग पूर्व-पुनर्जन्म असंभवनीय होईल. पूर्व-पुनर्जन्म नसेल, तर कर्ता व कर्मफल यांची न्याय-संगती लावता येणार नाही. दोन दोष तेथे उद्भवतील. आद्य श्रीशंकराचार्य सांगतात, त्याप्रमाणे, अकृत-अभ्युपगम व कृत-अनभ्युपगम, म्हणजे स्वत: न केलेल्या कर्माचे फळ कोणलाही मिळेल व केलेल्या कर्माचे फळ कर्त्याला मिळणार नाही. 

न्यायवार्तिककार उद्योतकर (१-१-४०) असे सुचवितात की, वरील स्वरूपाच्या तर्काने `आत्मा अमर आहे, चिरंतन आहे.' हा सिद्धांत सिद्ध होत नाही. फार फार तर, आत्मा अमर असावा त्याचे अमरत्व इष्ट आहे'. एवढे स्पष्ट होईल. तर्काचे कार्य तेवढेच आहे. तर्क हा `सिद्धी' करीत नाही. फक्त पुष्टी देतो.

प्राचीन न्यायदर्शनांत तर्काचे किंवा तर्कयोजनेने होणाऱ्या दूरवस्थेचे अकरा प्रकार सांगितले आहेत. नवीन न्यायांत फक्त पांच प्रकार सांगितले असून, त्यामध्ये अकरा प्रकारांचा अंतर्भाव केला आहे. ते पांच प्रकार - १) प्रमाण-बाधित-अर्थ प्रसंग, 

२) आत्माश्रय ३) अन्योन्याश्रय ४) चक्रिका व ५) अनवस्था प्रसंग. असे आहेत.

हे सर्व तर्क `प्रभा' उत्पन्न करीत नाहीत. प्रभेला ते पोषक व उपबृंहक आहेत. त्यांच्या योजनेमुळे प्रमाणित सिद्धांत ग्राह्य न मानल्यास जी दूरवस्था होईल ती स्पष्टविली जाते.

तर्काच्या उपयोजनेला, कल्पकतेचा चांगलाच विकास व्हावा लागतो. पण ही कल्पकता सत्यज्ञानाला पोषक ठरावयाची असेल, तर ती स्वैर, उच्छृंखल असता कामा नये. सत्यशोधनाला व विशुद्ध ज्ञानप्राप्तीला जी विचाराक्ती इष्ट  व आवश्यक आहे, तिचा उदय होण्यासाठी, कल्पना प्राचुर्याची जोड हवी. याचाच अर्थ तर्कशास्त्र अवगत हवे. येथे तर्क या शब्दाचा जो पारिभाषिक अर्थ, कल्पना चालविणे, प्रकल्प प्रस्थापित करणे असा आहे, तोच अभिप्रेत आहे.

-धुं.गो.विनोद

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search