[पश्यन्ती (११)]
----------
स्वत:च्या अनुभवाचे अवलोकन, पृथक्करण, संकलन व महत्त्व-मापन ही आत्म-विकासाची चतु:सूत्री आहे. आत्मविकासाच्या महा-मन्दिराचा हा चतुष्कोण आहे.
स्वत:च्या अनुभवाचे अवलोकन करणे, हे अत्यन्त अवघड आहे. याचे कारण स्पष्टच आहे. येथे द्रष्टा व दृष्ट, ज्ञाता व ज्ञेय ही एकच असल्यामुळे सत्यदर्शन यथार्थदर्शन निदान संपूर्णतया दर्शन सर्वथा अशक्य आहे.
अनुभव येत असताना त्याचे दर्शन किंवा पृथक्करण शक्यच नसते.
उपमान, अनुमान इत्यादी प्रमाणांच्या साहाय्याने भूतकालात जमा झालेल्या अनुभवांचे दर्शन व पृथक्करण करता येते.
पृथकृत झालेल्या, वेगवेगळया झालेल्या अनुभव खंडांना एकत्र आणणे यांचे नाव संकलन.
हे संयोजन अथवा संकलन झाल्यानंतर त्या अनुभवांची महती, अर्थवत्ता, उपयुक्तता ठरविणे म्हणजे महत्त्व-मापन.
या चारी क्रिया परस्परांपासून सर्वथैव भिन्न नाहीत. एक दुसरीत मिसळलेली असते. आणि पुन्हा प्रत्येक क्रियेत उरलेल्या तीन्ही क्रियांचा अस्पष्ट अंतर्भाव असतोच.
उदा. अवलोकनक्रियेत मूल्यमापक प्रवृत्तीचा किंचित् मात्र अन्तर्भाव असतोच. अनुभवाचे अवलोकन करताना विशिष्ट दृष्टीने ते केले जाते. आणि ही दृष्टि मूल्यमापक प्रवृत्तींची निदर्शक असते.
ज्या दृष्टिकोनाने आपण मूल्य-मापन करू तो दृष्टिकोन अभ्यासकाच्या विशिष्ट दृष्टीमुळे निर्माण होतो.
जागृतीतल्या अनुभवांचे अवलोकन, पृथक्करण, संकलन व महत्व-मापन करणे हे तत्त्वज्ञानाचे उद्दिष्ट आहे.
विशेषत: पाश्चिमात्य तत्त्वज्ञ जागृतीतल्या अनुभवांच्या शास्त्रालाच तत्त्वज्ञान म्हणतात.
पाश्चात्य तत्त्वज्ञानांत स्वप्न व सुषुप्ति या अनुभवांना विशेष अर्थवत्ता नाही. अर्थात पाश्चात्य तत्त्वज्ञानांत या दोन्ही अनुभवांचा विचार होऊ शकतो. पण ती घटक अंगे नव्हेत.
भारतीय तत्त्वज्ञानांत जागृती, सुषुप्ति, स्वप्न या तीन्ही अवस्था तत्त्वज्ञानाची घटक व कारक अंगे समजली जातात.
केवळ जागृती या अवस्थेतील अनुभव एवढेच तत्त्वशास्त्राचे घटक क्षेत्र नव्हे.
स्वप्न व सुषुप्ति या अवस्थांचा 'जागृति` या अवस्थेइतकाच विचार केल्याशिवाय भारतीय तत्त्वशास्त्र परिपूर्ण होत नाही.
त्या तीन्ही अवस्थांना समन्वित करणारी सार्थ, सुसूत्रित करणारी अशी चवथी 'तुरीय` अवस्था भारतीय तत्त्वशास्त्राने प्रकल्पिली आहे. पण 'तुरीय` ही एक अवस्था नव्हे.
केवळ 'लक्ष्या` चा निर्देश करण्यासाठी 'अवस्था` हा शब्द येथे उपयोजिला जातो.
या तीन्ही अवस्था एकमेकींशी संलग्न आहेत, हा तर आपला प्रत्ययच आहे. परंतू ही संलग्नता, संबद्धता कशामुळे सिद्ध होते, हे लक्षांत येणे तितकेसे सुलभ नाही. त्यांना एकत्र गुंतविणारे सूत्र ते या तीन्ही अवस्थांच्या पलीकडे असले पाहिजे. निदान त्या तीन अवस्थांपैकी एकाही अवस्थेच्या उदरांत त्याचा संपूर्णत: समावेश होऊ शकत नाही, हे स्वयंस्पष्ट आहे.
या तीन्ही अवस्थांचे 'ते` समान-अधिकरण` आहे. तीन्ही अवस्थांमध्ये 'ते` आहे. पण तिहींपैकी कोणत्याही एका अवस्थेत, 'ते` संपूर्णत: समाविष्ट नाही.
आत्मतत्त्व म्हणजे काय? या प्रश्नाचे एक सुलभ उत्तर येथे उपलब्ध होते. जागृति-सुषुप्ति स्वप्न या तीन्ही अवस्थांना समान असणारे अधिष्ठान, समानाधिकरण असणारे ते 'आत्मतत्त्व` होय.
हे तत्त्व कोणत्याही वृत्तिज्ञानांत येऊ शकत नाही. याचे कारण वृत्तिज्ञानांचे, ज्ञानखंडाचे ते अधिष्ठान आहे. त्याच्या शिवाय ज्ञानक्रियेची शक्यताच नाही.
आत्म-तत्त्व , सुषुप्ति , गाढझोप या अवस्थेच्या पृथक्करणाने सिद्ध होते. असा भारतीय तत्त्वशास्त्राचा सिद्धांत आहे. सुषुप्तीचे स्वरूप सघन आण सजड आणि अज्ञानाचे आहे. असे आपण समजतो.
त्या अनुभवाला अज्ञानाचा अनुभव म्हणण्याचे कारण, तेथे वृत्तिज्ञानाचा, ज्ञानखंडांचा अभाव असतो.
जागृति या अवस्थेत ही वृत्तिज्ञाने स्थलकालाच्या मर्यादेने संकुचित होत नाहीत.
सुषुप्तीमध्ये या वृत्तिज्ञानाचा संपूर्ण अभाव असतो.
सुषुप्तीत ज्ञानक्ति असते, पण ज्ञानवृत्ति नसते, 'तुरीय` अवस्थेत आत्मज्ञानाच्या अनुभवांतील वृत्तिज्ञानाचा अभाव असतो, स्थलकालाचा अभाव असतो. स्थलकालाच्या मर्यादा तेथे नसतात.
अनंत आणि अमर्याद अशी विशुद्ध ज्ञानशक्ति तेथे स्वयंप्रकाशाने तळपत असते.
सुषुप्तीत हा स्वयंप्रकाश नसतो. आत्मज्ञानात हा स्वयंप्रकाश असतो. सुषुप्तीला जागृतावस्थेने 'बाध` येतो. आत्मज्ञानाला 'बाध` संभवतच नाही. कारण वृत्ति व स्थल-काल यांच्यामुळे निष्पन्न होणाऱ्या मर्यादा तेथे नसतात.
आपल्या जागृत अवस्थेतील अनुभवांना मर्यादांची विलक्षण सवय जडलेली असते. मर्यादा नाहीत, म्हणजे अनुभवच नाहीत. असा चुकीचा सिद्धान्त आपण एकदा स्थिरवून घेतलेला असतो.
सुषुप्त्यैक सिद्ध: शिव: केवलोSहम्।
- ही आद्य श्री शंकराचार्यांची पंक्ति या संदर्भात एक विमोचक शक्तीच आहे. या संदर्भात आत्मतत्त्वाचे साक्षात् दर्शन आहे.