साधना सूत्रे

स्फुरण-उपनिषद (२)

[ प्रवाचक - श्रीजगद्गुरू, केवल अवधूत न्यायरत्न विनोद. माऊली (१९५० आषाढी)]

-------

सर्वथैव योग्य परिस्थिती, उत्तेजक वातावरण, स्फूर्तीदायक स्थलकाल या गोष्टी प्रभा-तरल प्रतिभेच्या आविष्काराला आवश्यक असतात.

सर्व सृष्टीत व जीवनात एक नियती आहे. सुसंगती आहे. सुव्यवस्था आहे. म्हणून समुचित पूर्वस्थिती असल्याशिवाय उच्चोदात्त कृति उदित होणे अशक्य असते.

वस्तुत: पूर्वस्थिती व पश्यात्-स्थिती हा भेद, आकलन-क्रियेच्या सुलभतेसाठी केला आहे.

कार्यकारणभावाची सिद्धी ही जीवनाच्या व सृष्टिच्या सुसूत्रतेवर, सुसंगतीवर अवलंबून आहे. अनियत वस्तू व अवस्था यांच्याबद्दल कार्यकारणभाव उपलब्ध होणार नाही. कारण, ही एक प्रकारची पूर्वतयारी किंवा सम्यक्-पूर्व-स्थिती होय.

कारणे अनेक प्रकारची आहेत. समवायिकारण, असमवायिकारण, निमित्त-कारण ही कारणे दर्शन-ग्रंथात प्रसिद्धच आहेत. समुचित स्थल-काल हे सामान्य किंवा साधारण कारण म्हणून समजले जाते.

संपूर्ण कारण परंपरा व समुचित स्थल-काल या सर्वांची संप्राति म्हणजे सम्यक् पूर्वस्थिती (conditioning) होय.

कार्यकारणभावाच्या प्रश्नांत अनंत-सूक्ष्म विचार आहेत. कारण कालत: अगोदर असलेच पाहिजे काय? कारण हे कार्यापासून पूर्णत: भिन्न असते की अंशत:? कारण हे स्वत: दुसऱ्या कारणाचे कार्य असल्यामुळे `कारण' ही संज्ञा अतीव सापेक्ष आहे किंवा नाही?

सर्व कारण परंपरेला आदि-कारण असणे आवश्यक आहे काय? मे असण्याचा संभव जवळजवळ अशक्यच आहे. कारण `आदि' म्हणजे केव्हा? आणि त्या `आदि' ला सुद्धा कारण म्हणून दुसरा आदि आवश्यक आहेच.

कालप्रवाहाच्या आधारे, कार्य-कारण भावाची सिद्धी शक्य आहे काय? स्थल संदर्भाशिवाय कालाची प्रतीती येईल काय? कोणत्याही क्षणाला, कितीही लहान काल-बिंदूला कल्पनेत तरी स्थान-संदर्भ लागतोच.

कालाची कल्पना प्रवाह, पुंज किंवा रेषा, कोणत्याही तऱ्हेने काल व्यवहार होत असताना स्थलनिर्देश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आधुनिक विज्ञाने काल आणि स्थल असे दोन पद-अर्थ न मानता, काल-स्थल किंवा स्थल-काल  असा एकमात्र पदार्थ मानतात.

प्राचीन भारतीय नैय्यायिक `दिक्काल आदि एकमेव -दिक्कालाद्येकमेव' असा सिद्धांत पहिले गृहीत कृत्य म्हणून संस्थापिला होता. 

स्थल काल एक मानले तरी कार्यकारणभावाच्या अनेक समस्या तशाच राहतात.

कार्यकारणभावाची रचना व सिद्धी ह्या बहिर्मुख आहेत. घडलेल्या गोष्टींची ती एक मांडणी आहे. व्यवस्था आहे. कार्यकारणभावाचे नियम वाचून कोणत्याही गोष्टी घडन नसतात. त्या घडून गेल्यावर स्वत:च्या ज्ञानासाठी किंवा व्यवहारासाठी त्यांची विशिष्ट मांडणी, रचना म्हणजे कार्यकारणभाव.

कार्यकारणभाव हा एक शवविच्छेद आहे. ते भव-निर्माणाचे शास्त्र नव्हे.

आधुनिक विज्ञानांतील कार्यकारणभाव अत्यंत मर्यादित आहे. पण तसा तो असला तरी विज्ञानाच्या संदर्भात त्याची उपयुक्तता फारच फारच मोठी आहे.

कार्यकारणभाव हा एक सर्व शक्तीमान परमेश्वर नव्हे. त्याचा उपयोग व विनियोग अत्यंत महत्त्वाचा आहे. पण तो त्या मर्यादित क्षेत्रापुरताच.

लक्षांत ठेवण्यासारख्या गोष्टी दोन, त्या म्हणजे कार्यकारणभावाची बहिर्मुखता व त्याच्या मर्यादा.

आधुनिक व विज्ञान त्यांचे उत्तमांग जो कार्यकारणभाव यांचे स्वरूप मुद्रणकलेसारखे आहे. अंत:स्फूर्ती शब्दप्रविष्ट होते. त्या स्फूर्तीचे व शब्दांचे समष्टिकरण होण्यासाठी लेखन व मुद्रण या कला अवतरल्या आहेत. कागद लेखणी व मुद्रिते ही साक्षात स्फूर्तीची स्वरूपे नव्हेत. स्फूर्तीच्या प्रकटनाची उपकरणे आहेत.

स्फूर्तीबद्दल कार्यकारणभाव आपणांस ठरविता येतील काय? बाह्य परिस्थिती स्फूर्तीचला उप-कारक होईल, पण कारक होऊ शकणार नाही.

स्फूर्तीला कारक असे तत्त्व म्हणजे स्मृती पूर्वसंस्काराचे प्रभावी स्मरण झाले की, स्फूर्ती उदित होते.

स्फूर्ती म्हणजे स्फूरण. एक जुना संस्कार पुन्हा उदय पावला, म्हणजे त्याला `स्फूरण' म्हणतात. स्फूरण हे पूर्णत: नवीन नसते.

स्फूरणाचे किंवा स्फूर्तीचे बीज म्हणजे पूर्व संस्कार होय.

प्रचीती किंवा प्रत्यक्ष ज्ञान हे मनोभूमिकेत बीजासारखे लपून बसलेले असते. त्यालाच संस्कार असे म्हणतात. योग्य उत्तेजक मिळाल्यावर या मूल प्रतीतीरूपी, प्रत्यक्ष-ज्ञानरूपी बीजांचा संस्कारांचा स्फोट होतो.

अतएव, स्मृती-स्फोट किंवा संस्कार स्फोट म्हणजे स्फूर्ती.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

Dr. Samprasad Vinod - 09373686537

Dr. Mrs. Rujuta Vinod - 09371934520

Copyright 2019. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search