(मार्च - १९६५)
ध्यान-योग हे केवळ ईश्वर प्राप्तीचे साधन नसून व्यक्तित्व विकासाचीही ती एक उपयुक्त प्रक्रिया किंवा पद्धती आहे.
चित्त-प्रसाद हा योग्य तऱ्हेने निवडलेल्या कोणत्याही विषयांचे ध्यान केल्याने प्राप्त होतो असे भगवान पंतजलीचे एक योगसूत्र आहे, `` यथाभिमत् ध्यानात् वा'' म्हणजे सम्यक विषयाच्या शास्त्रीय ध्यानामुळे देखील चित्तप्रसाद उपलब्ध होतो.
ध्यान हा संकल्पशक्तीचा अभ्यास आहे.
इष्ट प्रतीकाची सर्वांगीण रुपरेषा संकल्पून तेथे सर्व मनोगती स्थिरविणे, स्थिरविण्याचा प्रयत्न करीत रहाणे, याचा अर्थ ध्यान-साधना.
कल्पनाशक्ती व संकल्पशक्ती या दोन वेगवेगळया शक्ती आहेत. कल्पनाशक्ती नुसत्या स्थूल चित्ररेषा काढते.
संकल्पशक्ती त्या चित्तरेषांमध्ये एखादा हेतू प्रकट करते.
ध्यानयोग आत्मविकासाचे एक अत्यंत प्रभावी साधन आहे. कोठल्याही विषयाच्या ध्यानाने त्या विषयाबद्दल आसक्ती निर्माण होते. हा भगवद्वीतेचा सिद्धांत, साधकांना ध्यान-योगात अतीव उपयुक्त आहे.
ध्येय व ध्याना यामधले अंतर नाहीसे करणारी प्रक्रिया म्हणजे ध्यान.
ध्यानामुळे ध्यानाचा ध्येयांत लय होतो.
कोणत्याही इष्ट गुणाचे ध्यान केले की, तो गुण हळूहळू ध्यान करणाऱ्याच्या अंगी बिंबू लागतो.
यम-नियमांचे शब्दध्यान, अर्थध्यान व प्रयुक्तिध्यान केल्याने ते सहज अंगी बाणतात. एकदा नियम स्वीकारल्यावर तो लिहावा. त्याचे शब्द मन:पटलावर व बाह्य क्षितीजावर, सुवर्णाक्षरांनी कोरलेलं न्याहाळावे.
नंतर त्या नियमांचा अभिप्राय, अर्थ, हेतु यांचे मनन करावे व शेवटी प्रयुक्ती-ध्यान म्हणजे ते नियम प्रयुक्त केल्यावर स्वत:चे जीवन व आचरण कसे दिसेल, सजेल, शोभेल याचे संकल्पित चित्र पहात रहावे.
प्रयुक्ति ध्यान करण्यासाठी तो नियम किंवा गुण ज्या व्यक्तिच्या आचरणांत उमटला असेल त्या व्यक्तिचे, किंवा प्रतीकाचे चित्र पुन: पुन: मनात आणावे. व्यक्तित्व-विकास म्हणजे अनिष्ट प्रवृत्तीचा त्याग व इष्ट प्रवृत्तीचा संग्रह व संवर्धन.यम-नियम आचरल्याशिवाय व्यक्तित्वाचा विकास साधणे शक्य नसते.
यम-नियम आचरणात आणण्याचा सोपा उपाय म्हणजे संयत-नियत अशा महापुरुषांच्या जीवनाचे ध्यान.
नुसते बौद्धिक निश्चय करून यम-नियम तडीस जात नाहीत.
यमनियम सत्पुरूषांच्या जीवनाचे आचाराचे ध्यान केल्याने यम-नियमांच्या ठिकाणी संग, आसक्ती निर्माण होते, संयत जीवनाबद्दल एक गोडी उत्पन्न होते. सत्पुरूषांचे ध्यान नव्हे तर त्यांच्या विशिष्ट गुण प्रधान जीवनाचे-आचाराचे ध्यान.
कोणतेही दुर्व्यसन सोडावयाचे असेल तर त्या दुष्प्रवृत्तीशी मनाने प्रत्यक्ष झगडत बसणे हा उपाय कधीच यशस्वी होत नाही. कारण त्या दुष्प्रवृत्तींशी झगडतांना तिचे ध्यान होत रहाते व नकळत तेथे आसक्ति मात्र वाढते. दुर्व्यसन सोडण्यास, निर्व्यसनी जीवनाचे, सदाचाराचे, सत्पुरूषांच्या आचरणाचे ध्यान हा खरा विधायक उपाय आहे.
अज्ञानजन्य व्यसने, अविध्येच्या सर्व वृत्ती व दुष्ट प्रवृत्ती, विधायक ध्यानाने नाहीशी होतात.
भगवान् पतंजलि म्हणतात -
ध्यान हेया: तद् वृत्तय: ।।
त्या अज्ञ वृत्ती नाहीशा होतात.
- धुं.गो.विनोद