साधना सूत्रे

दृष्टी-सृष्टीवाद

कार्ल मार्क्सच्या मते उदरांतर्गत क्षुधा एवढीच खरी भूक. इतर सर्व भूकेचे प्रकार ही उदरक्षुधेची रुपांतरे आहेत. बहुतांशी ही रुपांतरे आभासमय आहेत. खरी भूक एकच व ती अन्नाची. अन्नाची साधने हाती ठेवणे, म्हणजे सर्व मानवी क्षुधा, मानवी देह, मानवी कल्पना व मानवी संस्कृती हातात ठेवणे होय असे कार्ल मार्क्स म्हणतो.

उलटपक्षी हेगेल म्हणतो की, बुद्धीची व मनाची भूक, मानवी विचार, प्रतिभा व कल्पना यांना आद्यस्थान असून उदरींची क्षुधा, शारीरिक व्यापार आणि एकंदर बाह्य सृष्टी यांचे नियमन व अस्तित्व देखील, मानवी मनावर व बुद्धीवर अवलंबून आहे.

भारतीय दर्शन ग्रंथांत काहीशी हेगेलच्या भूमिकेसारखी `दृष्टी-सृष्टीवाद' ही भूमिका आहे. कार्ल मार्क्सच्या भूमिकेचा सृष्टी-दृष्टीवाद म्हणता येईल. अर्थात ही तुलना स्थूलमानाने घ्यावयाची.

या परिभाषेंत हेगेलचा `आयडियॅलिसम' म्हणजे दृष्टी-सृष्टीवाद किंवा `दृष्टी तशी सृष्टी' ही भूमिका होय.

कार्ल मार्क्सचा जडवाद म्हणजे सृष्टी-दृष्टीवाद किंवा `सृष्टी तशी दृष्टी' ही भूमिका होय.

दृष्टीवर सृष्टी उभारली जाते की सृष्टीवर दृष्टी अवलंबून असते, या प्रश्नावर हेगेल व कार्ल मार्क्स यांनी दिलेली ही पूर्णत: विरोधी अशी उत्तरे होत. तथापि, त्यांचीच प्रक्रिया, त्यांच्या परस्परविरोधी दोन उत्तरांना लावता येईल.

हेगेलचे म्हणणें, हा `थेसिस'; कार्ल मार्क्सचे म्हणणे, हा `ऍंण्टिथेसिस-प्रतिधान' या दोन्ही पदांचा समन्वय करणारें तृतीयपद किंवा सं-धान असू शकेल.

`स्फूर्ति' हा शब्द किंवा श्री ज्ञानेश्वरांचा `स्फुरण' शब्द वरील दोन्ही दृष्टीकोनांचा समन्वय करणारा आहे.

उत्तेज्य व उत्तेजक, ज्ञान व वस्तु, चैतन्य आणि दृष्टी आणि सृष्टी ही दोन्ही अंगे `स्फूर्ति' या तत्त्वांत होतात.

पुरुष व प्रकृति, चैतन्य व जड या दोहोंचीही उपस्थिती, स्फूर्ति किंवा स्फुरण या तत्त्वांत आहे.

स्फुरणांत गति व स्थिती या दोहोंचा प्रत्यय येतो. स्फुरण हे विशुद्ध गति नव्हे व विशुद्ध स्थिती नव्हे. मानवी जीवनांत व विश्वसंस्थितीत स्फुरण हे मूलतत्त्व आहे.

दृष्टी किंवा सृष्टी या द्वंद्वातील कोणत्याही एका पदाला अग्रस्थान नाही. त्या दोहोंचा समावेश करणारे स्फुरण हे अंतिम तत्वांचे स्वरुप आहे.

- धुं.गो.विनोद

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search