श्रीवात्सायनांनी तत्त्वज्ञानाची व्याख्या अशी केली आहे - मिथ्याज्ञान नव्हे ते तत्त्वज्ञान.
वस्तूंतले `ते-पण' म्हणजे तत्+त्व प्रकट करणारे ते तत्त्वज्ञान होय.
या तत्त्वज्ञानाचा उदय कसा होता?
प्रशस्तपाद हा वैशेषिक सूत्राचा भाष्यकार म्हणतो :- तच्च् ईश्वरनोदनाभिव्यक्तात धर्मादेव।।
ईश्वरनोदना म्हणजे ईश्वराचा उपदेश.
हा `उपदेश' वेदान्तगीत आहे व वेदांमध्ये अभिव्यक्त झाला आहे.
वेद हे धर्माचे मूळ म्हणजे उगमस्थान होय.
धर्म हे तत्त्वज्ञानाचे मूळ होय.
तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने धर्म प्रकट होतो व धर्माच्या प्रकर्षाने ईश्वर प्राप्ति, जीवशिवैक्य व अद्वैत सिद्धी यांचा उगम होतो.
पाश्चिमात्य व आधुनिक तत्त्वज्ञानाचा हेतू व व्याप्ती थोडी निराळी आहे.
शुद्ध विचार शक्तीच्या साध्याने अनेकविध शास्त्रांत व वैयक्तीक जीवनांत अधिकाधिक संग्रह व संगती निर्माण करणे हे तत्त्वज्ञानाचे ध्येय आहे, असे आधुनिक तत्त्वज्ञ समजतात.
मोक्ष ही कल्पना अजूनही त्यांच्या विचार कक्षेत आलेली नाही.
मोक्ष म्हणजे व्यक्ती, विश्व व विश्वेश्वर यांच्या परस्पर संबंधाची अंतिम संगती होय.
वैदिक तत्त्वज्ञान व धर्म यांच्या अभ्यासाने व अनुभवाने ही संगती सिद्ध होते.
वेदांत हे वेदांतर्गत धर्मावर आधारलेले तत्त्व-शास्त्र आहे.
वेदांचा अंत म्हणजे चरम् किंवा शेवटला भाग तो वेदांत.
उपनिषदे ही वेदांचा अंत, शेवटचा भाग होय.
अंत या शब्दाचा अर्थ निर्णय असाही आहे.
वेदांतील अर्थाचा निर्णय ज्यांत आहे तो वेदांत.
वेदातले अर्थ उपनिषदांनी निश्चित केलेले आहेत.
बादरायण व्यासांनी लिहीलेल्या ब्रह्मसूत्रांत उपनिषदांतील अर्थाचीच चर्चा व संगती आहे, म्हणून उपनिषदे व ब्रह्मसूत्रे ही वेदांतास अधिष्ठानभूत मानली जातात.
एकंदर २१ भाष्यकारांनी ब्रह्मसूत्रावर भाष्ये केली आहेत.
या भाष्यकारात अद्वैतवादी आद्य शंकराचार्य हे वेदांतविद्येला प्रकाशविणारे कोटी भास्कर तेजाचे महादर्शनिक होत.
उपनिषदाव्य, शारीर भाष्य व गीता भाष्य या तीन `शांकर’ भाष्यांत अद्वैत वेदांताचे दर्शन पूर्णत: प्रकट झाले आहे.
भारतीय तत्त्वज्ञानाचा मेरूमणी म्हणजे हा अद्वैत वेदांत होय.
- धुं.गो.विनोद