[प्रवाचक - न्या. विनोद. रोहिणी दिवाळी अंक (१९६२), पश्यंती (२१)]
----------------------------------
''वैराग्याव्यतिरिक्त मानवी बुद्धीचा विकास शक्य असावा.``
हा एकच वर सैतानाने, नरकासुराने परमेश्वराजवळ मागितला, व मिळविला असावा.
आजच्या असुरी अणु-युगाची उभारणी ही सैतानाच्या विश्वविजयाची पताकाच होय.
विकसित पण विकार-दृष्ट बुद्धीच्या मायकुशीत जगातले सर्व अत्याचार, हिंसा, पापे व महायुद्धे यांचा जन्म होतो.
वैराग्यवृत्ती विकसित होत राहतो तर बुद्धीचा विकासही, इष्ट स्वरूपांत व प्रमाणांत अवश्य होत राहतो.
बुद्धीचा विकास झपाट्याने झाला तर, वैराग्याचीही वृद्धी होते, पण ती होईलच असा नियम नाही. किंबहुना, पहिल्या पहिल्या विकासाच्या अवस्थांमध्ये बुद्धि व वैराग्य यांच्यात तीव्र विरोधच असतो.
'रसवर्ज` (गीता) स्वरूपाचे वैराग्य, केवळ पुरूषार्थाने, पुरूष-प्रयत्नाने सिद्द होत नसते. वैराग्यशील सत्पुरूष व ईश्वरकृपा यांचा सहाय्य-हस्त असेल तरच, 'परवैराग्याच्या` मार्गावर पहिले पाऊल पडेल.
बुद्धी ही अनेक वेळा, वैराग्याची प्रदर्शने कशी करावी, सोंगे कशी आणावी, आत्मवंचना व पर-वंचना कशी करावी याचे मार्ग सुचविण्यांत पटाईत ठरते. पुस्तकी 'पढत` ही तर खर्या वैराग्याशी सदैव 'लढत` करीत रहाते.
बुद्धीचे खरे कार्य म्हणजे वास्तवतेवर प्रकाश पाडते.
वासनांचे वास्तविक म्हणजे यथायोग्य यथायोग्य महत्त्वमापन करणे, ही बुद्धीची क्रियाशक्ती आहे.
पण केवळ वासनांच्या निष्ठेत विळविळणाऱ्या लंपट व लाचार जीवांना, जर परवैराग्याची एकदा, अगदी एकदाच रूचि मिळाली, चटक लागली तर, बुद्धीचे ठिकाणी असेलेली दिशाभूल करण्याची आसुरी शक्ती, पूर्णपणे विनष्ट होते.