साधना सूत्रे

उपनिषदांतील ब्रह्मविद्येविषयी

आर्यांच्या वेदग्रंथांतले तत्त्वज्ञान स्फूर्तीनिष्ठ, काव्यमय व गूढगहन भाषेत अवतीर्ण झाले आहे. त्या तत्त्वज्ञानाचा प्रज्ञाप्रधान, सुस्पष्ट आविष्कार उपनिषद् ग्रंथांत उपलब्ध होतो.

 

उपनिषदांतील तत्त्वविद्या ही भारतीय संस्कृतीचा मेरू-दंड, पृष्ठवंश आहे.

 

वेदांचे उगमस्थान उत्तरध्रुव असेल पण उपनिषदांची जन्मभूमी मात्र आर्यावर्तच आहे. आत्म-तत्त्वाचा स्पष्ट शोध व बोध उपनिषदांत आहे. अवस्थात्रयाचे विश्लेषण व अवस्थातीत आत्म-तत्त्वाचा स्पष्ट शोध व बोध उपनिषदांत आहे.

अवस्थात्रयाचे विश्लेषण व अवस्थातीत आत्मतत्त्वाचा आविष्कार प्रथम मांडुक्य उपनिषदाने केला. प्रणवाचे, ओंकाराचे विवेचन अवस्थात्रयाशी त्याचे समीकरण मांडुक्य उपनिषदानेच प्रथम केले.

सर्व विश्वाचे ईशावास्यत्व, सर्व विश्व हे परमात्मतत्त्वाचे आवास्य म्हणजे वसतीस्थान आहे, हा महान सिद्धांत `ईश' उपनिषदाने प्रथम सुस्पष्ट स्वरूपात सांगितला.

ब्रह्मवर्चस्वाची प्राप्ती ही मानवी जीवनाच्या साफल्याची गुरूकिल्ली आहे. ब्रह्म-वर्चस् (द्वंद्व) म्हणजे ज्ञान व तेज, विद्या व पराक्रम, ब्रह्म हेच वर्चस्, ज्ञान हेच तेज, व विद्या हाच पराक्रम, असाही ब्रह्मवर्चस् शब्दाचा दुसरा अर्थ आहे. (कर्मधारय).

उपनिषदांचे अध्ययन ही ब्रह्मवर्चस् प्राप्त् करण्याची सर्वोत्कृष्ट साधना होय.

उपनिषद् या शब्दाचे रहस्य आद्य श्रीशंकराचार्यांनी कठोपनिषदावरील आपल्या भाष्याच्या आरंभी दिले आहे. उपनिषद् या शब्दांत आरंभी दिले आहे. उपनिषद् या शब्दांत सत्, नि व उप असे तीन अवयव आहेत. सत् या धातूचे गती, अवसादन व विशरण असे तीन प्रमुख अर्थ आहेत.

उपनिषद् म्हणजे आत्मतत्त्वाच्या जवळ देणारी `गती' हा एक अर्थ आहे.

अवसादन म्हणजे निवारण, जन्म, मृत्यू, कर्मबंध, यांचे `निवारण' करणारी विद्या, हा उपनिषद् शब्दाचा दुसरा अर्थ.

विशरण म्हणजे विध्वंस, अविद्येचा विध्वंस करणारी शक्ती हा तिसरा अर्थ.

अविद्येचा नाश करणारी व आत्मतत्त्वाजवळ नेणारी अशी विद्या व ती सांगणारे ग्रंथ, हा उपनिषद् शब्दाचा गोलार्थ व स्पष्टार्थ होय.

एकंदर उपनिषदे २५० आहेत. पण त्यांत अल्ला उपनिषद्, खंडोपनिषद् इ. आधुनिक उपनिषदांचाही अंतर्भाव होतो. १०८ उपनिषदांची संख्या ही प्रसिद्ध आहे. श्रीशंकराचार्यांनी ११ उपनिषदांचा आपल्या भाष्यातून उल्लेख केला आहे. पण खालील दहा उपनिषदे मूळ उपनिषदे म्हणून मानली जातात.

ईश, केन, कठ, प्रश्न, छांदोग्य, तैत्तिरीय, मांडुक्य, मुंडक, बृहदारण्यक, ऐतरेय.

श्रीशंकराचार्य, रामानुज, रंगरामानुज, मध्व व दुसरे अनेक आचार्य यांची या दशोपनिषदांवर स्वतंत्र भाष्ये आहेत. ही सर्व भाष्ये आज मुद्रित नाहीत. काही उपलब्ध व्हावयाची आहेत.

*****

गीता, ब्रह्मसूत्रे व दशोपनिषदे या प्रस्थानत्रयींवर स्वतंत्र भाष्ये लिहील्याशिवाय `आचार्य' ही पदवी प्राप्त होत नसे.

उपनिषदे पाश्चिमात्य संस्कृतीत कशी गेली हा इतिहास विस्मयजनक आहे. शहाजहानचा मुलगा दारा याने पर्शियन भाषेत इ.स. १६५६ व १६५७ मध्ये, आपल्या दरबारी पंडितांकरवी उपनिषदांचे प्रथम भाषांतर केले. उपनिषदांचे परकीय भाषेतले भाषांतर प्रथम एका यवन राजाच्या प्रेरणेने व्हावे हे एक वैदिक संस्कृतीच्या विश्वविजयी प्रभावशक्तीचे प्रमाणच नव्हे काय?

उपनिषदांच्या या पर्शियन भाषतील रूपांतरावरून अन् क्वेटिल डू पेरॉन या पंडिताने इ.स. १८०१ ते १८०२ साली लॅटिनमध्ये स्ट्रासबर्ग येथे उपनिषदांचे अत्यंत मार्मिक व रसग्राही रूपांतर केले.

या लॅटीन रूपांतरावरून जे.डी. लान् ज्वि नाइस (J.D. Languinais) या फ्रेंच पंडिताने १८३२ साली फ्रेंच भाषेत उपनिषदांचे अवतरण केले. याच साली सुप्रसिद्ध बंगाली पंडित राजा राममोहन राय यांनी ईश, केन, कठ आणि मंडुक या उपनिषदांचे इंग्रजीत प्रथम भाषांतर केले. इ.स. १७३२ हे उपनिषद्विद्येच्या पश्चिमेकडील प्रवासांत व प्रचारात अत्यंत महत्त्वपूर्ण असे संवत्सर आहे.

त्यानंतर बरोबर ५० वर्षांनी म्हणजे १८८२ साली ड्रेसडन येथे जर्मन भाषेत उपनिषदे अवतीर्ण झाली.

थिऑसफीच्या प्रस्थापक मॅडम ब्लॅव्हॅट्स्की, कर्नल आलकॉट व सुप्रसिद्ध पंडित ऍनी बेझंट यांनी १७७५ पासून १९२० पर्यंत सर्व पाश्चात्य राष्ट्रांत थिऑसफीबरोबर उपनिषदांतील ब्रह्मविद्येचा प्रचार केला. थिऑसफी या शब्दाचे भाषांतरही ब्रह्मविद्या या उपनिषदांतील शब्दानेच केले जाते.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search