[शान्ति-सम्राट, महर्षि विनोद यांचे मूलगामी विचार. पश्यन्ती (६)]
------
आयुर्वेद म्हणजे शरीरांतला साम्य-वाद आहे. असे मला वाटते. शरीरांतल्या जीवपेशी, सप्तधातू व उपधातू, एकादश इन्दिये व आत्मा, यांच्या गती, स्थिती व कृती या सर्वांमध्ये विधायक सह-योग निर्माण करणे, हे आयुर्वेदाचे उद्दिष्ट आहे.
शरीरांतल्या अनंत जीवपेशी व इतर सर्व घटक मिळून एक समाज आहे. एक समष्टि संस्था आहे. त्या घटकांमध्ये सहयोग व शान्ति असणे याचे नाव स्वस्थता किंवा स्वास्थ्य.
आयुर्वेदात 'स्वास्थ्य` ही केंद्र-वस्तू आहे. 'रोग` नव्हे. सप्त्धातूंचे म्हणजे सप्तधातूंचे म्हणजे देहाच्या धारणाशक्तींचे साम्य ही मूलभूत आवश्यकता आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र हे देहाचे धारक धातू आहेत. पुरीष, मूत्र व स्वेद हे तीन मल आहेत. पुरीष हा मल वायु व अग्नि यांचे धारण करतो. मूत्र व स्वेद यांचेकडेही विधायक कार्य आहे. ते शरीरांत असताना व बाहेर पडूनही, शरीरांतील साम्य स्थितीला उपकारक कार्य करीत असतात. रोगयापन हे त्याचे कार्य आहे.
आयुर्वेदीय चिकित्सा शास्त्राप्रमाणे रोगपरिहारक औषधे देताना दोष, दूष्य, बल, काल, अनन्त, सात्म्य इत्यादींचा विचार आवश्यक आहे.
दोषांची विषमावस्था व रूग्णांची प्राणशक्ती किंवा धातूबल (तळींरश्रळीं) यांवर आयुर्वेदाचा विशेष भर आहे. केवळ रोग एवढाच एक विचारात घेण्याचा विषय आहे, असे आयुर्वेद मानीत नाही. रोगाची लक्षणे व रोग यांचेपेक्षा त्याच्या मुळाशी असलेले दोष-वैषम्य किंवा धातू-विकृती यांबद्दल आयुर्वेदीय चिकित्सा विशेष जागृत असते.
याभि: क्रियाभि: जायन्ते शरीरे धातव: सम:।
सा चिकित्सा विकाराणाम् कर्म तत् भिषजाम् स्मृतम्।
त्यागात् विशम् हेतू नाम् समानाम् च उपसेवनात्।
विषमा न अनुबध्नन्ति जायन्ते धातव: समा:।
(चरक सूत्रस्थान)
ज्या क्रियांनी शरीरांतले धातू सम राहतात. त्या क्रिया म्हणजे व्याधीवरील उपचार होत.
समत्व बिघडवणाया, विषमत्व उत्पन्न करणाया हेतूंचा (कारणांचा) त्याग केला व समत्व उत्पन्न करणाऱ्या वस्तूंचे सेवन केले की वैषम्य उत्पन्न होत नाही. व धातुसाम्य अढळ रहाते. (चरक सूत्रस्थान)
रोग किंवा विकार कसा होतो?
शरीरांत संचरणारा दोष प्रथम कुपित होतो. नंतर शरीरांत जेथे वैगुण्य असेल तेथे व्याधि उत्पन्न होते. कुपित होणे, प्रकोप होणे म्हणजे, उन्मार्गगामी होणे. स्वत:चे स्थान सोडून, मार्ग सोडून, दुसया ठिकाणी जाणे, 'प्रकोपस्तु उन्मार्गगामिता`
कुपिताम् ही दोषाणाम् शरीरे परिधाविताम्।
यत्र संग: स्ववैगुण्यान् व्याधिस्तत्रोपजायते।
आयुर्वेद ही स्वतंत्र स्वयंपूर्ण व सर्व समावेशक महाविद्या आहे.
आंग्ल वैद्यकाप्रमाणे बहुतेक सर्व रोग जन्तूजन्य आहेत. असे मानले जाते.
आयुर्वेदाप्रमाणे जन्तू-जनन हा धातू वैषम्याचा प्रकार आहे. वात-पित्त आणि कफ यांची साम्यावस्था ढळली, की दुसऱ्या विकृतीप्रमाणे जन्तू-जनन ही निर्माण होते.
जन्तूंचा निर्देश चरक-सुश्रुतांत सुस्पष्ट आहे. जन्तू-जनन हे रोग होण्याचे उपान्त्य कारण असू शकेल, पण अन्त्य कारण नव्हे. सूक्ष्मतम जन्तूंचा उल्लेख चरक व सुश्रुत दोघांनीही केला आहे खरा. पण, तो रोगाचे कारण म्हणून नव्हे. कोणत्याही रोगाचे अन्त्य म्हणजे अखेरीचे, मुख्य, प्रवर्तक कारण त्रिधातू वैषम्य किंवा त्रिदोष-प्रक्षोभ हे होय.
द्वादश-क्षार चिकित्सा, होमिओपथि इत्यादी सर्व वैद्यक-पद्धतीमध्ये वापरण्यात आलेली निदान-तन्त्रे आयुर्वेदांतील निदान तंत्राइतकी मूलगामी नाहीत. रोगाचे मूळ कारण शोधणे हे निदान शास्त्राचे उद्दिष्ट होमिओपथीमध्ये लक्षणांवरून रोगाचे निदान करण्याची पद्धती प्रचलीत आहे. लिंगैर्व्याधिं उपाचरेत्। हा आर्यवैद्यकांतील सिद्धांन्त विचारांत घेतला की होमिओपथीच्या काही मूलतत्त्वांचा अंतर्भाव भारतीय आयुर्वेदाने आपल्या चिकित्साशास्त्रात केला होता हे स्पष्ट दिसते.
आयुर्वेदीय चिकित्सा-शास्त्रांत औषधामध्ये पांच तत्त्वे कल्पिली असून त्यांचे भेद व परस्पर संबंध याबद्दल पुष्कळ चर्चा केली आहे. गुण, रस, वीर्य, विपाक व प्रभाव ही औषधामधली पांच तत्त्वे होत.
अतएव; आयुर्वेद ही स्वतंत्र व स्वयपूर्ण स्वयंप्रकाश, व सर्व-समावेशक अशी एक आणि एक मात्र महा-विद्या आहे.
- धुं.गो.विनोद