मन ही मोहरलेली माती आहे. माती म्हणजे माळवलेले मन.सचेतन व अचेतन, जीवन व मरण एकाच तत्वाची, एकाच अर्थाची, अवस्थांतरे, वेषांतरे व भाषांतरे आहेत.
सजीव देहांतून निर्जीव नखे व केस उत्पन्न होतात! निर्जीव मातीतून व शेणांतून कृमि-कीटक उत्पन्न झालेले दिसतात!! अचेतनांत सचेतन सुप्त् असते.
सचेतनांत जडत्वाचा बीजभाव असतो.
निद्रेचा अनुभव घेणे म्हणजे मृत्यूची चव चाखणे होय. निद्रित मनुष्य प्रेक्षकाला भयानक दिसतो. पण स्वत:च्या ठिकाणी तो पूर्णानंदात असतो.
मनुष्याला स्वत: निद्रित अवस्थेत जाण्याची भीती वाटणे शक्य आहे व पुष्कळ वेळा आजारी असताना ती वाटतेही.
तसेच मृत्यूपूर्वी, जिवंत माणसाला मृत्यूची भीती वाटते - कारण मृत्यूची `कल्पना' तो मनांत आणतो व निद्रेच्या कल्पनेप्रमाणे ती भेसूर व परावर्तक वाटते. प्रत्यक्ष मृत्यूची भेट, जिवलगाच्या आलिंगनाप्रमाणे स्नेहशील व प्रेममधूर आहे.
शरीराच्या वेदना, काही मर्यादेनंतर, जीवाला प्रतीत होत नाहीत; प्रेक्षकांना मात्र त्या भयानक व असह्य दिसतात. मानवाच्या संवेदनाशक्तीला, निसर्गनिश्चित सीमा आहेत. पहाणारा पहातो व `कल्पना' करतो तितक्या त्या वेदना जीवाला होऊच शकत नाहीत.
मृत्यूच्या महाद्वारापासून आनंदाच्या गर्भागारांत जीवाचा प्रवेश होत असतो.
मृत्यूच्या अनुभवांत परमानंद आहे, हे ओळखणे तितकेसे कठीण नाही.
मृत्यूच्या कल्पनेत मात्र भेसूरता आहे.
लहान बालके आईला निजलेली पाहू शकत नाहीत. तिला उठवल्या खेरीज त्यांचे मन स्वस्थ होत नाही.
निद्रा व मृत्यू ही जुळी भावंडे आहेत.