'प्रणय` या शब्दाचा अर्थ 'जवळ नेणे` असा आहे. 'प्रणय` या शब्दांत मूळ धातू 'नी` आहे. त्याचा अर्थ 'नेणे` असा आहे.
'नी` पासून 'नय` एक धातूसाधित होते.
'प्र` या उपपदाचे अर्थ अतीशयित्व, आधिक्य उत्कटत्व, पुढे असे आहेत. उदा. प्र + मत्त (अतीशयित्व), प्र + वाद (आधिक्य), प्र + गूढ (उत्कटत्व) प्र + गति (पुढे).
'प्रणय` हा शब्द 'प्र` या उपपदाचे सर्व अर्थ, (अतीशयित्व, आधिक्य, उत्कटता, पुढे) समन्वित करणारा आहे.
वधूवरांनी परस्परांकडे, परस्परांपुढे भावनेच्या आधिक्याने, उत्कटत्वाने जाणे.
'प्र` या पदामध्ये पावित्र्य, आदर, संपूर्णत्व या आणखी तीन अर्थांच्या छटा आहेत.
उदा. प्र + अर्थना अथवा प्रार्थना, प्र + साद तसाच प्र + नय - प्रणय.
प्रणयाच्या उत्कटतेत केवळ कामुकतेचे आधिक्य, अतिरिक्तता नसून, ती उत्कटता पावित्र्य, आदर, संपूर्र्णता या गुणांनी युक्त आहे. 'प्रणय` शब्दांत समर्पण, निवेदन हा मुख्य भाव आहे. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचे, संपूर्ण 'स्व` त्वाचे दुसऱ्या व्यक्तीला पवित्र भावाने, आदर बुद्धीने समर्पण करणे.
या वृत्तीला व कृतीला 'प्रणय` ही समुचित संज्ञा आहे. प्रणय भावनेत कामुक वृत्तीला भागमात्र, अंशमात्र स्थान आहे.
प्रणय-भावाच्या बिंबातील 'काम` हा एक किरण आहे, एवढेच. कामुकता ही संपूर्ण प्रणयबिंबाची व्यािप्त् करीत नाही. किंबहुना कामुकतेशिवायदेखील प्रणय असू शकतो.
'कोणतीही इच्छा` या अर्थाने 'काम` या शब्दाचा उपयोग केला जातो.
'काम` हा शब्द कम् - आवडणे, या धातू पासून निष्पन्न झाला आहे. कमनीय, कान्त, कान्ता हे शब्द आवडण्याच्या क्रियेचे ज्ञापक आहेत.
'इच्छा` या शब्दाने आवड, ओढ हे अर्थ सूचित होतात.
'इच्छा` या शब्दाचा निरूक्त अर्थ देखील, त्या वस्तूकडे वृत्ती जाणे असा होतो. ( इत् + छा)
वधू व वर, प्रेयसी व प्रियकर यांच्यामधील प्रेम कामुकतेने मर्यादित नसावे. कामुकता हा प्रणयसंबंधाचा मूलार्थ नव्हे. मुख्यार्थ नव्हे, अंतिम अर्थ तर नव्हेच नव्हे.
प्रीती (प्र + ईती) हा शब्ददेखील अगदी 'प्रणय` या शब्दासारखाच आहे. 'प्र` या उपपदाने व्यक्त होणारे आदर, पावित्र्य, समर्पण हे भाव 'प्रीती` या शब्दाने दर्शविले जातात.
प्रेम (प्र + इम्) हा शब्दसुद्धा अगदी तसाच आहे. प्रणय, प्रेम, प्रीती या तीनही शब्दांनी 'सर्वस्व - समर्पण` हा एकच अर्थ व्यक्तविला जातो. प्रणय ही एक 'प्रणति` आहे. प्रणयांत स्वत:ला वाकविणे आहे. अहं वृत्तीला मुरड घालणे आहे.
'प्रणय` हे मुख्यत: दान आहे. 'हरण` नव्हे. 'प्रणय` या भावनेत स्वामित्व बुद्धीचा अन्त व अस्त यांचे नांव प्रणय.
विशिष्ट हेतूने, पद्धतीने व विशिष्ट परिणामासाठी जवळ जाणे, नेणे किंवा येणे हे प्रणयाचे स्वरूप आहे.
प्रणय वृत्तीला विवाह पूर्व काली नुसती सुरुवात होते. विवाहाच्या मंगल क्षणी प्रणयवृत्ती मूळ धरते. विवाहानंतर शेवयपर्यंत प्रणयाचा अखंड विकास व्हावयाचा असतो.
अलीकडे विवाहाने प्रणयाच्यापुढे पूर्णविराम पडतो. असे न होता तो मंगल क्षण प्रणय - प्रधान जीवनाचे मंगलाचरण ठरला पाहिजे.
एकमेकांचे संपूर्ण समर्पण झाले की एका नवीन, असीम क्षितीजाचा - अभिनव विश्वाचा उदय होतो.
त्या क्षितीजाकडे, त्या विश्वाकडे व विश्वेश्वराकडे हातांत हात घालून प्रणय - बुद्ध वधुवरांनी जावयाचे असते.
'गृहामि ते सौभगाय हस्तम्!`
'''तुझा हस्त मी एका दिव्य सौभाग्यासाठी ग्रहण करीत आहे. आपण दोघे ते सौभाग्य, ते जीवनाचे परममांगल्य, त्या दिव्य अनुभूती प्राप्त् करून घेण्यासाठी सह-योगाचे हे पवित्र व्रत अंगीकृत करू या.``
धर्म हे आत्म-विकासाचे शास्त्र आहे.
धर्मासाठी प्रणय, विवाह, गृहस्थाश्रम करावंयाचा असतो.
सर्व प्रकारच्या आत्म - विकासाचे साधन व उपकरण म्हणून गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावयाचा असतो.
सन्तति हे देखील आत्म - विकासाचे एक महान् साधन आहे. मुलांना शिकविताना व शिकविण्यासाठी आई वडिलांचा सहजासहजी बौद्धिक, नैतिक व आत्मिक विकास होत राहतो.
नि:स्वार्थता, शुचिता, नीतिनिष्ठा, ध्येयदृष्टि इत्यादी सद्गुणांच्या विकासाला गृहस्थाश्रमाचे जीवन, क्षणोक्षणी प्रत्यक्ष वस्तुपाठ देत असते.
क्षणाक्षणाला समर्पण - बुद्धीला गृहस्थाश्रमांत सन्धी मिळते.
समर्पण - बुद्धी हे मांगल्यमय, शान्तिमय, विकासमय अशा वैवाहिक जीवनाचे रहस्य आहे.
-धुं.गो.विनोद