गायत्री मंत्र हा अखिल वैदिक संस्कृतीचे एक स्वयंप्रकाश व स्वयंपूर्ण प्रतीक आहे.
गायत्री मंत्राची दीक्षा ही सर्व-पाप विमोचन आहे.
गायत्री मंत्राने व्यक्तीचे व समाजाचे `मेधा-जनन' होते. गायत्री मंत्राने इच्छा शक्ती प्रबल व प्रखर होते. व्यसनाच्या पाशातून गायत्री जपाने मुक्तता झाल्याची अनेक उदाहरणे माझ्या अनुभवांत आहेत.
गायत्री मंत्राने इष्ट फलप्राप्ती होते.
कोठल्याही मानवामध्ये ऊर्जस्वल ब्रह्मतेज, प्रभावी प्रज्ञा व ऐहिक ऐश्वर्य गायत्री मंत्राच्या जपाने नि:संशय उदीप्त होईल.
गायत्री ही यजुर्वेद व पंचकोश यांच्या विकासक्रमाची आत्मविकासाच्या तंत्राची `रोहिणी' शक्ती आहे. राहिणी म्हणजे आरोहिणी किंवा ऊर्ध्वगामिनी शक्ती. तंत्रशास्त्रातल्या सप्तशक्तीपैकी रोहिणी-शक्ती ही केंद्र शक्ती आहे.
(२)
गायत्री मंत्राच्या जपयोगाचे उच्चारप्रधान व अर्थप्रधान असे दोन प्रकार आहेत.
अर्थप्रधान जप-योगांत उच्चाराचे प्रमाद व त्रुटीने क्षम्य आहेत.
उच्चारदोष राहिला तरी गायत्री मंत्राच्या जपाने व त्यातील अर्थ-शक्तीने आत्मांचे संरक्षण व विकास होतोच होतो.
जगज्जननी सीता संध्यावंदन व गायत्री जप नित्य करीत असल्याचे प्रमाण रामायणात मिळते.
व्योम-संहिता, यम-स्मृती, वसिष्ठ स्मृती इ. अनेक ग्रंथात स्त्रियांना गायत्री जपाचा अधिकार असल्याची प्रमाणे आहेत.
प्रत्येक मानवमात्राला गायत्रीजप करण्याचा स्वयंसिद्ध अधिकार आहे. कारण गायत्री ही सूर्यदेवतेची प्रार्थना आहे. सूर्यदेवतेची, सवितृशक्तीची, सृजनशक्तीची उपासना करण्यास कुणाला व कसा प्रत्यवाय असू शकेल? शिवाय आत्मसूर्याची प्रार्थना आहे. आत्मतत्त्वाचा निषेध कुणालाही अशक्य आहे.
(३)
विश्वामित्र महर्षिंचे महनीय दर्शन जी विश्वविख्यात गायत्री तिचा अक्षर देह असा आहे.
ॐ भू: भुव: स्व:।
तत्सवितुर् वरेण्यं।
भर्गो देवस्य धीमही।
धियो, यो न: प्रचोदयात्।।
तिन्ही लोकाना व्यापणाऱ्या सूर्यदेवाच्या श्रेष्ठ तेजाचे आम्ही ध्यान करतो.
या ध्यानाने आमच्या बुद्धीला चेतना मिळावी.
हा गायत्री मंत्र राज सकाळी, दुपारी, संध्याकाळी व मध्यरात्री अर्थ भावना करून म्हणावा. जपसंख्या ८, २८, १०८, ३३, १००१, ५००१ अश्या सांगितल्या आहेत. अकरा हजार, एकवीस हजार, चोवीस हजार, सव्वा लक्ष, अकरा लक्ष, एकवीस लक्ष, एक कोटी, सव्वा कोटी इ. मोठ्या संख्यांची पुरश्चरणे शास्त्रांत सांगितली आहेत.
जिज्ञासूंचे मार्गदर्शन मी आनंदाने करीन.
(४)
काही आधुनिक महापुरूषांचे गायत्रीविषयक अभिप्राय व उल्लेख खाली देत आहे.
`केवल राजनैतिक उत्थान करून भारताची बहुमुखी परतंत्रता नष्ट होणार नाही. जनतेच्या हृदयांत प्रकाश उत्पन्न झाला पाहिजे. श्रेष्ठ जीवनाची प्रेरणा मिळाली पाहिजे. गायत्री मंत्रात ही प्रेरणाशक्ती आहे.'
लो. टिळक
`गायत्री मंत्राने आत्मोन्नती होते - रोगदेखील बरे होतात.'
महात्मा गांधी
`गायत्री-मंत्र ही बुद्धीला पवित्र करणारी शक्ती आहे. ऋषींनी भारताला दिलेले हे एक अनुपम अस्त्र आहे. न्यायरत्न विनोद गात्रत्री मंत्राचे अधिकारी उपदेशक आहेत.'
पं. मालवीयजी (१९३१)
`भारतवर्षाला जागृत करण्याची शक्ती गायत्री मंत्रात आहे.'
- रवींद्रनाथ ठाकूर
`गायत्री मंत्राच्या जपाने महान सिद्धी मिळतात.'
रामकृष्ण परमहंस
`गायत्री हा मंत्रांचा मुकूटमणी आहे.'
- विवेकानंद
-धुं.गो.विनोद