[प्रवाचक - न्या. विनोद.(रोहीणी मे - १९६२),पश्यन्ती (१८)]
----------------------------------------
स्वयंवर या शब्दाचा अर्थ स्वयं निर्णय असा असतो. स्वयंवर म्हणजे व्यक्ती - स्वातंत्र्य व लोकशाही यांचा विवाहसंस्थेच्या क्षेत्रामध्ये केलेला विनीयोग.
सामान्यत: स्वयंवर शब्द स्त्रियांसाठी उपयोजिला जातो. रूक्मिणी-स्वयंवर, सीता-स्वयंवर असे आपण म्हणतो. वर हा शब्द ''वृ`` या संस्कृत धातूपासून निघाला आहे, वृ धातूचा अर्थ अनेकांतून एक निवडणे असा आहे.
भारतीय संस्कृतीने स्त्रियांना स्वयंनिर्णयाचा हक्क दिला आहे. यावरूनच स्त्रियांना किती महत्त्वाचे स्थान भारतीय संस्कृतीने दिले होते. व आहे, याचा स्पष्ट बोध होतो.
पाश्चिमात्य संस्कृतीत पुरूष हा स्त्रीला प्रथम मागणी घालतो. स्त्री त्याच्या मागणीला होकार किंवा नकार देते.
या प्रकारांत थोडा 'उपचार` असतो.
पुरूषाने मागणी घालणे ही एक औपचारिक प्रथा आहे. उपचार म्हणजे शिष्टसंमत आचार उपचारांत थोडी कृत्रिमता असते हे खरे, पण कोणताही नियम, कोणतेही तत्त्व हेतुपुर:सर आचरणांत आणण्यामध्ये थोडी कृत्रिमता साहजिकच येते.
सहजतेलाच नियमनिष्ठ आकार देणे याचे नाव संस्कृती.
भारतीय संस्कृतीत स्त्री पुरूषाला निवडते. पाश्चिमात्य संस्कृतीत पुरूष स्त्रीला निवडतो.
खरे पाहिले तर, दोघेही एकमेकांना निवडतात. स्वयंवर शब्द हा दोघांनाही लावणे योग्य, यथार्थ आहे.
वृ म्हणजे वरणे. हा शब्द विवाहेतर सर्व धर्मकृत्यांतही उपयोजिला जातो. उपनयन संस्कारात मोठमोठ्या वाजपेयादी यज्ञक्रियेत प्रत्येक धर्मकृ त्यांत पुरोहित, गुरू, आचार, अध्वर्यु, होता, ब्रम्ह इत्यादी सर्व अधिकारी वरले जात असतात. गृहस्थ धर्मकृत्यांसाठी पुरोहिताला `वरतो'. शिष्य आचार्याला 'वरतो`, यज्ञकर्ता यजमानही अध्वर्युला व ब्रम्ह्याला 'वरीत` असतो.
'वर` या शब्दांत श्रेष्ठता दर्शविणारी एक अर्थच्छटा आहे. जी व्यक्ती निवडली जाते, वरली जाते, ती श्रेष्ठ असते. म्हणून वधू वराला 'वरते` कारण वर हा तिला श्रेष्ठ वाटतो.
पण वरही वधूला 'वरीतच` असतो. वराला वधूही श्रेष्ठच वाटत असते.
श्रेष्ठता किंवा गुणवत्ता ही बहुमुखी असणारच.
पुरूष हा, काही गुणांनी वर म्हणजे श्रेष्ठ असतो. वधु देखील, दुसऱ्या काही 'पुरक` गुणांमुळे वरालाही श्रेष्ठ तर वाटते. म्हणूनच तिलाही तो 'वरतो`.
पूरकता, पारस्पर्श हा संबंध विवाहसंस्थेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे.
स्त्रियांचे पुंसीकरण मानवसमाजाच्या प्रगतीतीला अत्यंत घातूक आहे. पुरूषांचेही काही प्रमाणांत स्त्रीकरण आज अनेक वेळा दृष्टोत्पत्तीस आहे. पण, दोघांचीही व्यावर्तक वैशिष्ट्ये केव्हाह नष्ट होता कामा नये.
वधूने आणि वराते निवड करिताना 'पूरक` गुणांकडेच अधिक लक्ष द्यावे.
समानयंस्तुल्य गुणं वधुवरम्।
चिरस्य वाच्यं न गत: प्रजापति:।।
कालिदासेन वधूवर हे तुल्य गुण असावेत असे म्हंटले आहे. तुल्यगुण हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. तुल्य म्हणजे तुलना करता येण्याजोगे. तुला म्हणजे तागडी. तागडीच्या दोन्ही पात्रांत एकच जिन्नस कधीही नसतो. एकांत माप असते व दुसऱ्यांत पदार्थ असतो. अगदी तसेच, पती व पत्नी या दोन्ही पारड्यांत निरनिराळे गुण असावेत. त्यांचे प्रमाण आणि परिणाम जीवनाचा तराजू समतोल राहील असे असावे. दोघांची ध्येये आणि आवडीनिवडी अगदी एकच असणे हे विवाहितांच्या यशस्वीतेला तितकेसे उपकारक नाही. त्याचप्रमाणे दोघांच्या व्यक्तीमत्वामध्ये दक्षिणोत्तर ध्रूवांमधले अंतर नसावे.
दोघांमध्ये असलेल्या द्वैतामधून अद्वैत सिद्धी करावयाची असते.
भिन्न स्वरांतूनच संगीत निर्माण होते. जीवनाचे साम-गान सिद्धविण्यासाठी एकत्र आलेल्या दोन जीवांमध्ये भेद तर हवेतच, ते असतातही, पण त्या भेदांतून अभेद, एकात्मता व अद्वैत निर्मिण्याचे शास्त्र आणि कला म्हणजेच वैवाहिक जीवन होय.